Jiyaa Shankar Engagement Photos: रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आणि बिग बॉस ओटीटी फेम लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकर हिने अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. जियाने तिच्या स्वप्नवत प्रपोजलचे खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. त्याचबरोबर जियाने तिच्या होणाऱ्या पतीचा चेहराही दाखवला आहे. जिया शंकरच्या होणाऱ्या पतीचं नाव करण आहे. जियाने केलेल्या या पोस्टवर जिनिलीया देशमुखने खास कमेंट केली आहे.
जियाला करणने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. जियाची हिऱ्यांची अंगठीही खूपच सुंदर आहे. तिने अंगठीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच एकमेकांना किस करतानाचा एक फोटो जियाने शेअर केला आहे. एका फोटोमध्ये ते मिठी मारताना दिसत आहेत, तर काहींमध्ये ते रोमँटिक पोज देत आहेत. जियाने या फोटोंबरोबर एक सुंदर कॅप्शन लिहिलं आहे.
जिया शंकरची खास पोस्ट
“जेव्हा तुम्हाला अगदीच अपेक्षा नसते, तेव्हाच तुम्हाला प्रेम गवसतं हे कदाचित खरं असावं… पण देवाने माझ्या संयमाची खरोखरच मोठी परीक्षा घेतली.
हे अजिबात सोपं नव्हतं, पण तरीही कुठेतरी ते सहज वाटत गेलं. तू माझ्यापासून हजारो मैल दूर असतानाही तुझ्याशी झालेला प्रत्येक संवाद मला शांतता देणारा वाटायचा. हा प्रवास सोपा नव्हता, पण तरीही आपण रोज एकमेकांना निवडलं. आयुष्यभर मी ज्या प्रेमाची वाट पाहत होते, ते प्रेम तू मला दिलंस. माझ्या अत्यंत कठीण दिवसांतही तू मला हसवलंस. विमानतळावर गुडबाय करताना दरवेळी तू मला इतक्या घट्ट जवळ घ्यायचास, की जणू तुझ्या हृदयाचे तुकडे होत आहेत. आपण जगात कुठेही असलो, तरी ‘घर’ ही माझ्यासाठी कधीच कोणती जागा नव्हती… घर म्हणजे नेहमीच फक्त तू होतास.
माझा गूफबॉल, माझा बेस्टफ्रेंड, माझा ABCD,
तुझ्यासोबतचे आयुष्य म्हणजे एक सुंदर अॅडव्हेंचर आहे आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. आता माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवण्यासाठी आणि तू जसं माझ्यावर नेहमी प्रेम केलंस, तसंच आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही.
आय लव्ह यु, करण!” अशी पोस्ट जिया शंकरने केली आहे.
जिया शंकरच्या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ‘वेड’मधील जियाची को-स्टार जिनिलीया देशमुखने अभिनंदन जिया अशी कमेंट केली आहे. त्याबरोबर रीम शेख, अभिषेक बजाज, अविनाश मिश्रा, तन्वी ठक्कर, माही विज, पलक पुरस्वानी, अमित टंडन, युक्ती कपूर यांनी कमेंट करून जियाचं अभिनंदन केलं आहे.
