५७वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा काल, २२ फेब्रुवारीला पार पडला. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणार राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना सुरेश वाडकर भावुक झाले. त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्व मान्यवारांचे आभार व्यक्त करून ‘ये जिंदगी गले लगा ले’ या गाण्याच्या दोन ओळी गायल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर म्हणाले, “व्यासपिठावर सर्वच माझे मित्र, आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि माझे रसिक मायबाप आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मी खूप भाग्यशाली आहे, माझी मां स्वरसरस्वती लताबाई मंगेशकरांच्या नावाचा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आज मला मिळतोय. याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो. मी खूप भावुक झालोय. आताच दोन वर्ष होता आहेत. पण जाणे हा शब्द अजूनही त्यांच्यासाठी खलतो. कारण त्या कधी जाणार नाहीयेत. रोजच त्यांना ऐकण्याचं वेड आहे मला आणि आपल्या सगळ्यांचं. पुन्हा एकदा शासनाचा खूप खूप आभारी आहे.” यानंतर सुरेश वाडकरांनी ‘ये जिंदगी गले लगा ले’ या गाण्याची काही ओळी गायल्या.

हेही वाचा – “अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रतिपादन, म्हणाले, “अमृताहूनी गोड…”

हा एक विलक्षण योगायोग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तसेच पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरेश वाडकरांबद्दल म्हणाले,”सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी हिंदी नव्हे तर गुजराती, बंगाली, भोजपूरी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो. जागेवर खिळवून ठेवतो. वाडकर आणि लता मंगेशकर यांचं ‘क्रोधी’ चित्रपटातील ‘चल चमेली बाग में’ हे पहिलं गाणं प्रचंड गाजलं आणि लतादीदींनी त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार सुरेश वाडकरांना मिळतोय. हा एक विलक्षण योगायोग आहे.”

हेही वाचा – “मराठी चित्रपटाचा चेहरा…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र भूषण अशोक सराफांवर स्तुतीसुमने, म्हणाले…

दरम्यान, राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी, २०२१चा ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि २०२२चा ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना देण्यात आला. तसेच राजकपूर विशेष योगदान पुरस्कार २०२० ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, २०२१चा गायक सोनू निगम आणि २०२२चा विधू विनोद चोप्रा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी यांचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२० (मरणोत्तर) हा पुरस्कार मुलगा, अभिनेता गश्मीर महाजनीने स्वीकारला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran playback singer suresh wadkar receives gansamragini lata mangeshkar award pps
First published on: 23-02-2024 at 10:00 IST