Chetan Dalvi On his brain stroke and recovery: ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी मराठी सिनेमा व नाटकांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. सगळं करून भागले, देखणी बायको नाम्याची, येऊ का घरात, चांदी, जावईबापू जिंदाबाद, जाऊ तिथे खाऊ, फेका फेकी अशा अनेक सिनेमांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवींना आलेला ब्रेन स्ट्रोक, म्हणाले…
अभिनेते चेतन दळवी यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे आजारपण, त्यांचे करिअर यांबद्दल, तसेच आता सिनेसृष्टीत संधी मिळते की नाही याबद्दलही सांगितले. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके यांच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. चेतन दळवी त्यांच्या आजारपणाबद्दल काय म्हणाले, त्याबद्दल जाणून घेऊ…
चेतन दळवींना या मुलाखतीत विचारले गेले की, सध्या आयुष्य कसं सुरू आहे? त्यावर त्यांनी २०२२ मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, “शनिवार होता. मी एक-दीडला निघालो. विरारच्या पुढे गेलो. रात्री साडेआठदरम्यान मी हॉटेलला पोहोचलो. जेवण झालं. छान गप्पा गोष्टी झाल्या. साडेअकरा, १२ वाजता झोपलो. सकाळी उठून अंघोळ करून तयार झालो. त्यानंतर बसलो, त्यावेळी मला ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर मिरा रोडवरील एच. एम. हॉस्पिटलला माझ्यावर उपचार झाले. १५-१६ दिवस मी दवाखान्यात होतो. १७ व्या दिवशी घरी आलो. मी काय बोलतोय, हे मला कळत नव्हतं. कोणी काही विचारलं तरी मला कळत नव्हतं.”
ते असेही म्हणाले की, ब्रेन स्ट्रोकनंतर अनेक गोष्टी मी विसरलो. कोणी मला माझ्याच नाटकाबद्दल विचारले तरी आठवायचे नाही. आता हळूहळू सर्व काही आठवत आहे. सध्या मी निवांत आयुष्य जगत आहे.
दरम्यान, याच मुलाखतीत त्यांनी विविध नाटके, चित्रपटांत काम करण्याचा अनुभव सांगितला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर कशी मैत्री होती, याबद्दलही माहिती दिली.
