महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्यात आलं आहे. मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई देखील करण्यात आली होती. तसेच अमराठी चालकांसाठी विशेष मराठी भाषा शिकवणी वर्गही आयोजित करण्यात आले होते. याबाबत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
अभिनेते विद्याधर जोशी यांनी स्पष्ट मत मांडत हे केवळ राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी भाषा सक्तीबाबत विद्याधर जोशी नेमकं काय म्हणालेत, जाणून घेऊयात…
विद्याधर जोशी आरपार ऑनलाइनशी संवाद साधताना म्हणाले, “टॅक्सीवाल्यांना मराठी यायलाच पाहिजे…हो यावं, माझी काही हरकत नाही. मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना मराठी यायला पाहिजे…पण, त्यांच्याकडे जाणारे कितीजण मराठीत बोलतात? मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा मोठ्या पदांवरच्या लोकांना भेटायला जाणारे मराठी लोक सुरुवातीला कितीवेळा मराठीत बोलतात? नाही बोलत. आता मी माझ्या बाबतीत सांगतो, मी असं ठरवलंय की… मी जेव्हा रिक्षा-टॅक्सीत बसतो, तेव्हा मी त्याला सांगतो…’अरे बाबा मला अंधेरीला जायचंय’. तो मला ‘आ…’ करून म्हणाला की, मला समजतं… त्याला समजलेलं नाहीये. तेव्हा मग मी म्हणतो, अंधेरी जाना है.”
“आता त्या रिक्षावाल्याला मराठी येतं की नाही याच्याशी मला फार काही देणंघेणं नाहीये, हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. कारण, हे राजकीय स्टंट आहेत, असं माझं मत आहे. तुमच्याकडे फारसे काही मुद्दे नाहीत…म्हणून मग या मुद्द्यांवर तुम्ही लोकांना जास्त भडकवायचं किंवा त्यांना Attract करायचं… आता त्यांना मराठी शिकवायला काहीच हरकत नाही. चार वाक्य असतात ती, त्यांना समजून सांगा…पण, त्यांनी मराठीत बोलावं यासाठी मी फारसा आग्रही नाही.” असं स्पष्ट मत विद्याधर जोशींनी मांडलं आहे.
