Viju mane and Mangesh Desai On Pravin Tarde: सध्या अनेक सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये काही मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. घबाडकुंड हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. त्याबरोबरच सध्या आणखी एका सिनेमाची चर्चा सुरू आहे. ‘देऊळ बंद २’ असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाने कमाईचा हा टप्पा पूर्ण केल्यानंतर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिनेमाला यश मिळाल्यानंतर प्रवीण तरडेंनी एक सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती; तर काही राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती.

तेजस्विनी पंडित, मंगेश देसाई यांच्यासह अनेक कलाकार या सोहळ्याला हजर होते. प्रवीण तरडे व स्नेहल तरडे यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. या सोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता निर्माते व दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रवीण तरडेंबद्दल विजू माने काय म्हणाले?

विजू माने यांनी प्रवीण तरडे यांच्यासाठी लिहिले, “पव्या, कुठलीच असूया नाही, द्वेष नाही कसा आहेस रे तू? काल खरं तर मला खूप भावनिक व्हायला झालं होतं. माझे डोळे पाणावलेसुद्धा. तुझ्या इतक्या मोठ्या आनंदात तू मला इतक्या आपुलकीनं सहभागी करून घेतलंस. एवढंच नव्हे, तर बोलून आणि बोलावून मान दिलास. तुझ्या पायांना असलेला मातीचा स्पर्श आणि प्रतिभेला असलेला परिसस्पर्श चिरंतन राहो. तुझ्यासारखा मित्र लाभणं हीसुद्धा ईश्वराची कृपा म्हणायची. आभार वगैरे मानून तुझा अपमान नाही करणार; पण कृतज्ञता व्यक्त करूच शकतो”, असे म्हणत विजू माने यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हे लिहीत असताना त्यांनी कार्यक्रमातील स्नेहल तरडे व प्रवीण तरडे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

मंगेश देसाईंनी लिहिले…

त्याबरोबरच मंगेश देसाईंनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. प्रवीण तरडे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले, “१०० कोटी पार मराठी सिनेमाचा व्यवसाय नेणारा पहिला दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे. मित्रा, तू स्वतःची गुणवत्ता आणि स्वतःच्या जीवावर हा चमत्कार घडवला आहेस. कदाचित आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची ही सुरुवात असेल आणि इथून पुढे तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे दिग्दर्शकही पुढे येतील. पण, त्याची मुहूर्तमेढ तू रचलीस. तुझे मनापासून अभिनंदन!

पुढे त्यांनी लिहिले, “स्नेहलचेसुद्धा मनापासून अभिनंदन! स्नेहलचा तुझ्यावरचा विश्वास आणि तुझा तिच्यावरचा यांमुळेच ती आज १०० करोडच्या चित्रपटाची नायिका ठरली.”

‘देऊळ बंद २’ सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, अतुल कुडाळे, सविता मालपेकर अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.