Viju Mane education: विजू माने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर विविध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘प्रभो शिवाजी राजा’, ‘रेगे’, ‘गोजिरी’, ‘ती रात्र’, ‘बायोस्कोप’, ‘खेळ मांडला’, ‘शर्यत’, ‘शिकारी’, ‘पांडू’, असे विविध विषय आणि आशय असलेल्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले.

आता विजू माने त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. आयआयटी दिल्लीमधील हे फोटो आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “माने म्हणे IIT यन झाले? आयआयटी दिल्ली, जी देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे, तिथून शिक्षण घेणं हे ज्या वयात स्वप्न होतं त्या वयात ते पूर्ण करता आले नाही. पण, म्हणून स्वप्नांच्या मागे धावायचं नाही असं नाही.”

“मला भूतकाळात रमणं आवडत नाही…”

“येत्या काळात व्हर्चुअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी हा आपल्या मनोरंजनाचा अविभाज्य घटक होणार आहे म्हणून ते शिकावं असं वाटलं. मी महत्प्रयासाने या सर्टिफिकेट कोर्सला अॅडमिशन घेतली. महत्प्रयास यासाठी म्हणतोय की, कोर्सला अॅडमिशन घेताना पदवी मिळवल्याची प्रमाणपत्रं सादर करायची होती.”

“जी शोधताना इतका त्रास झाला की त्यापेक्षा पुन्हा एकदा कॉलेजला जाऊन शिकून पदवी मिळवली असती तरी परवडलं असतं. गेली अनेक वर्ष या भ्रमात होतो की आता मला डिग्री सर्टिफिकेटची काय गरज आहे, या भ्रमात मी गेली अनेक वर्षे होतो.”

पुढे त्यांनी लिहिले, “त्यामुळे सर्वाधिक दुर्लक्षित कागदाचा कपटा शोधायला अगदी थेट मला माझ्या कॉलेजपर्यंत जावं लागलं. असो, पण आनंद या गोष्टीचा आहे की वयाच्या ४६ व्या वर्षी मी आयआयटीमध्ये विद्यार्थी म्हणून पाय ठेवला.”

“खरंतर मला भूतकाळात रमणं आवडत नाही, पण अचानक आठवण आली की माझी बीएसस्सी पदवी पूर्ण झाल्यावर मला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. जमनालाल बजाजसारख्या एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजातून एमबीए वगैरे करावं असं खूप वाटायचं. पण, त्यावेळेला त्या महाविद्यालयाची फी ऐकून भीती वाटली होती. मग परिस्थितीच्या विद्यापीठातच पुढचं शिक्षण होत राहिलं.”

विजू माने यांनी पुढे असेही लिहिले, “अनुभवाच्या इयत्ता पार करत करत आज आहे त्या वर्गात पोहोचलो आहे. अजूनही माझी परीक्षा घेण्याची जीवनाची हौस फिटत नाहीये आणि माझाही वेगवेगळ्या परीक्षा देऊन पास होण्याचा कीडा काही वळवळायचा थांबत नाहीये. असो, आता खरंच परीक्षेची वेळ आली आहे. प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे. तुमच्या शुभेच्छा असतीलच, पण मेहनत मलाच करायची आहे”, असे म्हणत आयआयटी दिल्लीमध्ये ते सध्या शिक्षण घेत असल्याचे त्यांनी लिहिले.

त्यांनी लिहिलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये कलाकारांचादेखील समावेश आहे.

नेटकरी म्हणाले…

संतोष जुवेकर यांनी लिहिले, “खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन मित्रा, असाच शिकून खूप मोठा हो.” सुकन्या मोने यांनी लिहिले, “क्या बात है! शुभेच्छा कायम आहेतच”, कुशल बद्रिकेने लिहिले, “खूपच प्रेरणादायी”, स्पृहा जोशीने लिहिले, “किती भारी”, रसिका वेंगुर्लेकरने लिहिले, “सुपर”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, विजू माने अनेकदा विनोदी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या आणि कुशल बद्रिकेच्या विनोदी रील्सवर चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात.