Vikas Samudre Suicide Post Clarification Mumbai Police: ‘फू बाई फू’ व ‘नवरा माझा नवसाचा’ यांमध्ये प्रभावी भूमिका साकारणारे अभिनेते विकास समुद्रे हे सध्या चर्चेत आले आहेत. ब्रेन हॅमरेज आजारातून बरे झालेल्या विकास यांनी सोशल मीडियावर जीवन संपवण्याच्या आशयची पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांची ही पोस्ट व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र, आता विकास समुद्रे यांनी स्वतः त्या पोस्टबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
विकास समुद्रे यांनी शुक्रवारी फेसबुकवर स्वतःला जीवे मारण्याची पोस्ट लिहिली. विकास समुद्रे यांनी फेसबुकवर “मी आत्महत्या करत आहे.” (I am committing Suicide) अशी पोस्ट केली होती. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची तातडीने दखल घेतली. त्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर सायबर टीमने विकास समुद्रे यांचे घर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
विकास समुद्रेंच्या फेसबुक पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी साधला संपर्क
सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनीही विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधला. रात्री ११.०३ वाजता सायबर लॅब, पाच सायबर अधिकारी आणि कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर रात्री १२.१५ वाजता पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी विकास समुद्रे सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. विकास समुद्रे यांनी, पोस्ट लिहिताना टायपिंगची चूक झाल्याने अशा आशयाची पोस्ट झाली, असे स्वतः स्पष्ट केले.


टायपिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे पोस्ट – विकास समुद्रे
विकास समुद्रे यांची आत्महत्या करणार असल्याची खळबळजनक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी व सिनेविश्वातून काळजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर विकास यांनी स्वतः पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट लिहीत या प्रकारामुळे स्पष्टीकरण दिले. विकास समुद्रे यांनी लिहिले, “मी आत्महत्या करीत असल्याची पोस्ट, टायपिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे झाली. मी एक नाटक करतोय (I am Doing Drama) अशी पोस्ट मला करायची होती. काळजी नसावी, मी सुरक्षित आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार.”
