Marathi Actor Virajas Kulkarni Birthday : छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेता विराजस कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने ‘आदित्य’ ही प्रमुख भूमिका साकारली होती. तो अभिनयाबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. ‘माझा होशील ना’ मालिका सुपरहिट ठरली होती, या मालिकेच्या यशानंतर विराजस पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळला. आज लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? विराजसचा खरा वाढदिवस आज नसतो…तरीही त्याला शुभेच्छा देण्यामागे एक खास कारण आहे.

विराजसचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला असतो… त्याचा जन्म लीप वर्षात झाला होता. आता २९ फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येते. त्यामुळेच इतर वर्षी विराजस त्याचा वाढदिवस २८ फेब्रुवारीला साजरा करतो.

यामुळेच आज खरा वाढदिवस नसूनही विराजसची आई मृणाल कुलकर्णी आणि पत्नी शिवानी रांगोळे यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

मृणाल कुलकर्णी लेकाबद्दल लिहितात, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा! तुझ्या कल्पनाशक्तीने आणि कलेमधल्या नवनवीन प्रयोगांनी आम्हाला सगळ्यांना खूप आनंद मिळतो, प्रेरणा मिळते. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती या सर्व आघाड्यांवर तुला रसिकांचं प्रेम लाभो. हेही वर्ष विविध रंगांनी, कल्पनांनी भरलेले जावो! तू नेहमी असाच सर्जनशील रहा, मस्त वेगवेगळे प्रयोग कर, आणि खूप मजेत राहा! खूप प्रेम!”

तर, पत्नी शिवानी रांगोळे विराजसबद्दल म्हणते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विराजस…तू नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतोस… कायम तसाच राहा. ज्यातून तुला समाधान मिळतं अशा प्रोजेक्ट्सवर कायम काम करत राहा…” या पोस्टसह अभिनेत्रीने त्यांचे फॅमिली फोटो शेअर केले आहेत.

mrinal kulkarni
मृणाल कुलकर्णींची लेक विराजससाठी खास पोस्ट

दरम्यान, विराजस कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो महेश मांजरेकरांच्या ‘फिल्टर कॉफी’ नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. यासाठी त्याला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय ‘वरवरचे वधू वर’, ‘शंकर जयकिशन’, ‘एक तिची गोष्ट’ या नाटकांचा दिग्दर्शक म्हणून त्याने जबाबदारी सांभाळली आहे.