Raja Shivaji Movie Vishwas Nangre Patil Post: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, राज्याचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या चित्रपटाबद्दल केलेली इन्स्टाग्राम पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. “राजा शिवाजी : एक अजरामर कलाकृती” अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाचे वर्णन केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण आणि स्वराज्याचा इतिहास रितेशने ज्या पद्धतीने मांडला आहे, त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. नांगरे पाटील यांच्या या प्रभावी रिव्ह्यूमुळे चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

राजा शिवाजी : एक अजरामर कलाकृती
महाराष्ट्र दिनी ज्वलंत, धगधगता शिव छत्रपतींचा बाल, युवा अवस्थेतील देदिप्यमान कालखंड या प्रचंड चित्रपटात पाहायला मिळाला. हा समर पट पाहताना अंगातील अनु रेणू स्फुल्लिंगीत होतात, रग पेटते, रक्त सळसळते. संवाद रोमांच उभे करतात.
वीर रसातील छत्रपतींची स्तुती ही सतत गुंजारव करते.
इतिहासाचा सखोल अभ्यास करून यातले प्रसंग उभे केलेले दिसतात. पूर्ण वेळ तुम्ही तुमची पाठ खुर्चीला टेकवू शकत नाही.
सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र यवनांच्या अंमलाखाली पिसत होता. महिलावर अत्याचार, हत्या, जबरदस्ती धर्म परिवर्तन आम बात झाली होती.
अहमदनगरच्या निजामशाहने खुलेआम जिजाऊ मातेचे पिता, काका आणि भावांची हत्या केली. फलटणचे शासक बालाजी निंबालकरांचे बीजापुरच्या सुल्तानाने धर्म परिवर्तन केले होते.
धर्मपरिवर्तन, गौहत्या और अत्याचारांच्या घटनांनी माँ जिजाऊचे हृदय पिळवटून निघत होते. त्या विचार करायच्या, ‘या अन्यायी राजवटीचा अंत का होऊ शकत नाही. माझ्या पुत्रामध्ये या राक्षसी वृत्तीला थोपवण्याचे सामर्थ्य येऊ शकेल काय!’
आणि मग झंझावात उभा राहीला. शिवजन्मापूर्वी आदिलशाहाने पुण्याला गाढवाच्या नांगराने खणले होते आणि शिवरायांनी त्याच भूमीत सुवर्णनांगर लावून पावन केले, सुजलाम सुफलाम केले. गनिमी काव्याने गनीमास नामोहरम केले.
शिवरायांची जडणघडण, त्यांचे माँ जिजाऊं, पिता शहाजी राजे आणि बंधू संभाजीशी असणारे भावनिक नाते, त्यांचे युद्ध कौशल्य, रयतेवरची त्यांची निष्ठा, सवंगडी मावळे, राजकारण, युद्ध नीती, कूटनीती आणि शेवटी खानाचा खात्मा! सगळं कस अप्रतिम, भव्य दिव्य! अजय अतुलचे संगीत तर अजेय !!
शिवाजी महाराज आणि शंभू राजे गेल्यानंतर महाराष्ट्र औरंगजेबासाठी सहज होता का? नाही.. तर राजा शिवाय हा महाराष्ट्र बलाढ्य मोगली सत्तेसमोर एक दोन नाही २५ वर्षे ठाम उभा राहिला. बेदरकारपणे भिडला आणि लढला! कारण शिवरायांनी स्थापन केलेले राज्य हे भोसल्यांचे नव्हते, एकही किल्ल्याचा सातबारा राजांच्या नावावर नव्हता. हे हिंदवी स्वराज्य होते, रयतेचे राज्य होते. हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा होती. या स्वराज्याची संकल्पना रितेश देशमुख यांनी दमदार स्वरूपात नव्या पिढीला समजावून सांगितली आहे. या टोलेजंग कलाकृतीला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम मिळेल, हे निश्चित ! जगदंब जगदंब !!

विश्वास नांगरे पाटील यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. नक्की बघू… इतिहास आम्ही लहानपणी, वाचला आता बघू, चित्रपट नक्की बघणार, उत्तम लिहिलंय अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी विश्वास नांगरे पाटलांच्या या पोस्टवर केल्या आहेत.