Smriti Mandhana RCB lift second WPL Title : ‘महिला प्रीमियर लीग २०२६’ स्पर्धेतील अंतिम सामना ‘दिल्ली कॅपिटल्स’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ या दोन संघांमध्ये खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २०३ धावा केल्या होत्या. या धावांचा यशस्वी पाठलाग करत ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ने दिल्लीवर ६ गडी राखून विजय मिळवला आणि आरसीबीने दुसऱ्यांदा WPL च्या जेतेपदाला गवसणी घातली आहे.
‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघाची कर्णधार स्मृती मानधना असून तिने या अंतिम सामन्यात ८७ धावांची केल्या. गेल्या काही महिन्यांपासून स्मृती वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत होती. या कठीण काळात स्मृतीची मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जने तिला खंबीरपणे साथ दिली. यंदा जेमिमाने ‘दिल्ली कॅपिटल्स’च्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे स्मृती-जेमी या जिवलग मैत्रिणी आमनेसामने असताना अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता आरसीबीने दुसऱ्यांदा WPLची ट्रॉफी जिंकल्यावर या टीमवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
प्रसिद्ध मराठी गायक सलील कुलकर्णींनी स्मृती आणि जेमिमा यांच्या मैत्रीबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात…
सलील कुलकर्णींची पोस्ट
स्मृती आणि जेमिमा…
मैत्री ..खेळ…आधार …!!
दोघींनी भारताकडून वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता…
आता त्या WPL च्या फायनल मध्ये एकमेकींविरुद्ध जीव तोडून लढल्या…
स्मृतीच्या आयुष्यात वादळ आलं तेव्हा जेमिमा..ऑस्ट्रेलियाची लीग सोडून मैत्रिणीसाठी सांगलीत तिच्याबरोबर थांबली होती…
आता स्मृती बाद झाल्यावर कदाचित DC जिंकू शकते या आशेने जेमी आनंदून नाचली…
स्मृतीने आयुष्यातल्या सगळ्या वादळातून बाहेर येऊन या स्पर्धेत सर्वात जास्त धावा केल्या आणि RCB ने Cup जिंकला…
त्या दोघी पुन्हा मैत्रिणी म्हणून जवळ आल्या..
म्हणजे चांगली माणसं अजून आहेत…
आधार देणारी…
एकमेकांशी स्पर्धा करून सुद्धा मैत्री जपणारी…
छान वाटलं…
सतत….घणाघात…टोला..पर्दाफाश…फसवणूक..
हे वाचून..ऐकून…
ट्रॅफिक जॅम मध्ये जीव अडकला होता…
तो सुटला…
…मनाला…
चांगले काहीतरी वाटलं..!!
दरम्यान, सलील कुलकर्णींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “अगदी खरं आहे”, “वाह दादा काय लिहिलंय” असं म्हणत चाहत्यांनी सुद्धा जेमिमा-स्मृतीच्या निखळ मैत्रीचं कौतुक केलं आहे. यापूर्वी स्मृतीच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघाने २०२४ मध्ये ‘WPL’ची ट्रॉफी जिंकली होती.

