राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांच्या मराठी दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘लाडू’ याच्या विशेष स्क्रीनिंगनंतर प्रख्यात अभिनेते यशपाल शर्मा यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक करत त्याला “आजच्या काळात बनलेला अत्यंत धाडसी आणि मनाला भिडणारा सिनेमा” असे संबोधले. चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना यशपाल शर्मा म्हणाले की, “‘लाडू’ हे नाव सुरुवातीला साधं वाटलं, पण चित्रपट पाहिल्यानंतर त्यामागचा गाभा आणि भावनिक अर्थ प्रकर्षाने जाणवला.” ते पुढे म्हणाले, “आज ज्या काळात व्यावसायिक आणि वेगवान चित्रपटांचा बोलबाला आहे, त्या काळात असा आशयप्रधान आणि प्रामाणिक चित्रपट बनवणं हेच मोठं धाडस आहे. त्यासाठी शैलेंद्र सिंग आणि संपूर्ण टीमला सलाम.”
लाडू पाहणं हा अनुभव खूप उत्तम-यशपाल शर्मा
चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, छायाचित्रण, संकलन आणि संगीताचं कौतुक करत त्यांनी ‘लाडू’चा अनुभव एका कलाकृतीसारखा असल्याचं सांगितलं. हा चित्रपट पाहताना ऋत्विक घटक, श्याम बेनेगल आणि सत्यजित रे यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या सिनेमांची आठवण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.भावूक होत त्यांनी सांगितले, “मला चित्रपटामुळे नाही, तर आजच्या काळात असा चित्रपट बनवण्याचं धाडस कुणी दाखवलं, याचा विचार करून डोळ्यात पाणी आलं.” बॉस इंडिया एंटरटेनमेंट आणि ब्रेडविनर प्रोडक्शन्स प्रस्तुत, सत्य घटनेवर आधारित ‘लाडू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘लाडू’ची मूक आणि हेलावणारी कथा
मुंबई, ठाणे आणि कर्जतच्या मातीवर कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित झालेला हा १०३ मिनिटांचा मराठी चित्रपट मानवी संघर्षाची अत्यंत भावनिक आणि वास्तवावादी गाथा मांडतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठवला जात आहे.
शैलैंद्र सिंग यांनी केलं आहे दिग्दर्शन
भारतीय चित्रपटसृष्टीत २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे आणि १२ राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांनी आता ‘लाडू’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मराठी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शनाचे अनुभव गाठीशी असणारे शैलेंद्र सिंग यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बॉस एंटरटेनमेंट’ आणि ‘ब्रेडविनर प्रोडक्शन्स’ प्रस्तुत हा चित्रपट सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रचंड गाजतो आहे. प्रसिद्ध अभिनेते यशपाल शर्मा यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
