‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यावर आता लवकरच या बहुचर्चित कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘येरे येरे पैसा ३’ची प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर मे महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याशिवाय चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

दिग्दर्शक संजय जाधव यांनी साधारण महिन्याभरपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘येरे येरे पैसा ३’ची घोषणा केली. “कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी… पुन्हा मनोरंजनाचा पाऊस पाडायला येत आहोत…” असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं होतं. याशिवाय या कॅप्शनच्या खाली चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगण्यात आली होती.

हेही वाचा : ‘मुरांबा’ मालिकेतील सासू-सुनेची भन्नाट जुगलबंदी! शिवानी मुंढेकर अन् सुलेखा तळवलकरांच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

‘येरे येरे पैसा ३’ प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं असून चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे. नुकताच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मिळून एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हे कलाकार ‘येरे येरे पैसा ३’च्या शीर्षक गीतावर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘येरे येरे पैसा ३’मधले सगळे कलाकार या चित्रपटाच्या शीर्षक गीतावर एकत्र थिरकताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव सुद्धा या व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह काही कलाकार मंडळींनी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video : मराठमोळ्या ऋतुजा बागवेचा हिंदी अभिनेत्यासह ‘पुष्पा’ स्टाइल जबरदस्त डान्स! ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकले

‘येरे येरे पैसा ३’मध्ये सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले आणि वनिता खरात अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

पैसा मिळवण्यासाठी जीवनात कशी धडपड केली जाते. त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना याआधीच्या भागांमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. या दोन्ही चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटात आणखी वेगळं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे.