Yogesh Sohoni on Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ या सिनेमाची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली आहे; त्यामुळे हा सिनेमा, सिनेमातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सगळेच मोठ्या चर्चेत आहेत. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता योगेश सोहोनीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सिनेमाबद्दल वक्तव्य केले.

“त्यावेळी दुर्दैवानं तितका प्रतिसाद…”

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत “ऑस्करपर्यंत हा चित्रपट जाईल याचा एकाच व्यक्तीला विश्वास होता, दिग्दर्शक संतोष डावखर सरांना विश्वास होता. कारण त्यांचं समर्पण आहे, सिनेमाबद्दल त्यांना आत्मविश्वास होता.”

पुढे तो म्हणाला, “हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, त्यावेळी दुर्दैवानं तितका प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमाबद्दल लोकांना कळालच नाही. पण, ज्यांनी ज्यांनी तो सिनेमा पाहिला ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा स्वतःच्या कुटुंबाबरोबर सिनेमा बघायला गेले. पुण्यामध्ये एक स्क्रीनिंग झालं होतं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तिथे तीनशे लोकांसाठी जागा होती, तिथं साडेपाचशे लोक तो सिनेमा बघायला आले होते. लोकांनी खाली जमिनीवर बसून तो सिनेमा पाहिला.”

योगेश सोहोनी (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

तो असेही म्हणाला, “आपल्या इथे गोष्टींची उशिरा जाणीव होते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. आता हा सिनेमा ऑस्करला गेल्यानंतर प्रत्येक जण हे विचारत आहेत की हा सिनेमा कुठे बघायला मिळेल. पण, डावखर सरांचा खूप विश्वास होता की ऑस्करमध्ये सिनेमाला नॉमिनेशन मिळणार आहे, इतका हा सिनेमा चांगला बनलेला आहे. ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा बघितला, त्यांनी त्या सिनेमाबद्दल खूप लिहिलं. मुळात म्हणजे ६५ वर्षांनंतर कुठल्यातरी सिनेमाच्या दिग्दर्शकाला सिल्व्हर पिकॉक हा पुरस्कार मिळाला, जो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधला मानाचा पुरस्कार असतो तो सरांना मिळाला, त्यामुळे हे सगळं अविश्वसनीय आहे.”

योगेश सोहोनी (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही त्यावेळी तुमच्या काय भावना होत्या? या प्रश्नाचं उत्तर देत योगेश म्हणाला, “प्रचंड वाईट वाटायचं, प्रचंड त्रास व्हायचा. आम्ही प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरलो आहे. लोक त्यावेळी का बघायला गेले नाहीत याचं कारण मला माहीत नाही, पण हे सगळं दुःखदायक आहे. ज्या लोकांनी हा सिनेमा बघितला ते दुसऱ्या-तिसऱ्या वेळी सिनेमा बघायला गेले. याचा अर्थ त्या सिनेमात काहीतरी आहे, म्हणून ते लोक बघायला गेले. त्यावेळी आम्ही सगळ्या गोष्टी पद्धतशीर केल्या. व्यवस्थित नियोजन केलं होतं.”

योगेश सोहोनी (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

पुढे तो म्हणाली, “अविनाश भानुशाली, अमृता माने स्वतः डावखर सर सगळे जातीने लक्ष घालत होते, पण तरी काय चुकलं माहीत नाही. जेवढा प्रतिसाद मिळायला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्रास व्हायचा. पण, IFFI(International Film Festival of India) नंतर गोष्टी बदलल्या. फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही फिल्म जेव्हा गेली, तेव्हा प्रत्येक फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे नाव झालं, कौतुक झालं. पेपरमध्ये चित्रपटाबद्दल छापून आलं. सोशल मीडियावरती लिहून आलं; मग त्यावेळी लोकांना त्याबद्दल माहीत होऊ लागलं”, असे म्हणत सिनेमाला लोकांचा प्रतिसाद जेव्हा मिळाला नाही, त्याबद्दल वाईट वाटलं असे योगेश म्हणाला.