scorecardresearch

रायगडच्या दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी केली दमदार चित्रपटाची निर्मिती

प्रथमच रायगडच्या सुपुत्रांनी अशा दमदार, ऐतिहासिक व प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती केली.

रायगडच्या दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी केली दमदार चित्रपटाची निर्मिती
स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्माला आलेल्या दोन वीर बंधू मावळ्यांची कथा म्हणजेच हरिओम चित्रपट.

रायगडच्या भूमीपुत्रांचा मराठी चित्रपट विश्वात बोलबाला दिसून येत असून अतिशय डोंगराळ, दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केले आहे. रायगड जिल्ह्यातील हा पहिला व ऐतिहासिक चित्रपट असल्याने याकडे कुतूहलाने पाहिले जाते. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्माला आलेल्या दोन वीर बंधू मावळ्यांची कथा म्हणजेच हरिओम चित्रपट. विशेष म्हणजे प्रथमच रायगडच्या सुपुत्रांनी अशा दमदार, ऐतिहासिक व प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती केली.

शिवप्रेमाने प्रेरित झालेल्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नवं युगातील मावळ्यांची कथा असलेल्या हरिओम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्य व कर्मभूमी असलेल्या उंबरठ येथील पवित्र व ऐतिहासिक भूमीत अभिनेते हरिओम घाडगे व गौरव कदम यांनी ट्रेलर प्रदर्शित करून हरिओम चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांना समर्पित करण्यात आला. या चित्रपटात सलोनी सातपुते व तनुजा शिंदेही मुख्य भूमिकेत आहेत.

आणखी वाचा- नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणाऱ्या ‘हरि- ओम’चा ट्रेलर प्रदर्शित, व्हिडीओ पाहिलात का?

छत्रपतींचे निष्ठावंत मावळे म्हणून तानाजी व सूर्याजी हे दोघे भाऊ कायम स्वराज्य रक्षणासाठी प्राणपणाने लढत राहिले. शूरवीर तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने युद्धभूमी सांभाळली. याच इतिहासाची व बंधुप्रेमाची पुनरावृत्ती करणारा संदेश ‘हरिओम’ चित्रपटातून देण्यात आला. तसेच अन्याय अत्याचारावर प्रहार, भ्रष्टाचाराला मूठमाती, सुशिक्षित बरोजगारांना नवद्योजक बनण्याची प्रेरणा, मराठी माणसाचे हीत व दोन भावांचे बंधुप्रेम दाखविणारा दमदार असा ‘हरिओम’ चित्रपटाचा अफलातून ट्रेलर प्रदर्शित झाला असून येत्या १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती अभिनेते हरिओम घाडगे यांनी दिली.

मराठी माणसाला गर्व व अभिमान वाटेल अशा चित्रपटाची निर्मिती हरिओमच्या निमित्ताने झाल्याने मराठी चित्रपट विश्वाला एक नवी झळाळी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हरिओम चित्रपट आपण आपल्या कुटुंबियांसोबत देखील पाहू शकणार आहोत. आता प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेमींना आकर्षित करणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो. या चित्रपटात रायगडच्या ऐतिहासिक व क्रांतिकारी भूमीतून कलाकारांना अभिनयाची संधी देण्यात आली.

या चित्रपटात अभिनेता ओम याने हिरोची भूमिका बजावत तरुणांना निरोगी व सदृढ शरीरयष्टी चे महत्व पटवून दिले आहे. चित्रपटातील डायलॉग ऐकून धमन्याधमन्यातून रक्त सळसळते. यातील पात्र आणि प्रसंग मनाला भिडतात. शूटिंग आणि कॅमेऱ्याची कमाल तर लाजवाब दिसून येते. काही प्रसंग असे चित्रित केले आहेत की हाताच्या मुठी आवळल्या जातात. तर काही प्रसंग रडवून देखील जातात, क्षणभर मनोरंजनाची फोडणी देखील देण्यात आलीय. अशातच आक्रमकता, धाडस, शौर्य, साहस आदींचा मिलाप ओमच्या अभिनयातून दिसून येतो. या चित्रपटातील कलाकारांनी जीव ओतून भूमिका साकारल्या आहेत. ज्या भूमिका अभिनय नसून खऱ्या वाटत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या