मराठी माणसाचे नाटय़वेड फार जुने आहे. नेहमी चित्रपटगृहापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या प्रेक्षकांसाठी वाहिन्यांनी आपल्या छोटय़ा पडद्याचा वापर करत चित्रपट घरापर्यंत आणले. ‘टेलिव्हिजन प्रीमिअर’ या नावाने सुरू केलेल्या या चित्रपट प्रयोगांना हिंदी आणि मराठीतही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र मराठी माणसासाठी केवळ चित्रपट आणि मनोरंजनाचे सोहळे टीव्हीवर पाहणं एवढीच त्यांच्या मनोरंजनाची व्याप्ती नाही. त्यांचं नाटकाचं वेडही तितकंच आहे हे पाहून स्टार प्रवाह वाहिनीने ‘वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रीमिअर’ या नावाने दर्जेदार मराठी नाटकं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं असून त्याची सुरुवात ‘नांदी’ या नाटकाने होणार आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रीमिअर’ नावाचा नवा उपक्रम सुरू केला असून, यात दर्जेदार नाटके वाहिनीच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळणार आहेत. या ‘वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रीमिअर’चे पहिले पुष्प दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य या चार निर्मात्यांनी मिळून के लेल्या ‘नांदी’ या नाटकाने ३० मेला संध्याकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सादर होणार आहे. मराठी रंगभूमीच्या दीडशे वर्षांच्या वाटचालीत स्त्री-पुरुष नातेसंदर्भावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती सादर झाल्या. ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ ते आत्ताच्या ‘चाहूल’ या नाटकापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने कालानुरूप हा विषय मांडण्यात आला आहे. या दीडशे वर्षांतील प्रत्येक दशकात या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या गाजलेल्या कलाकृ तींमधील निवडक प्रसंग घेऊन त्याची कोलाज पद्धतीची मांडणी ‘नांदी’ या नाटकात पाहायला मिळते.
मराठी रंगभूमीवर गाजलेले १० कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या २३ भूमिकांचे हे ‘नांदी’ नाटक शंभराव्या प्रयोगानंतर रंगभूमीचा निरोप घेणार आहे. अजूनही हे नाटक अनेक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही अजरामर नाटय़कृती पोहोचण्यासाठी ‘वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रीमिअर’च्या शुभारंभासाठी ‘नांदी’ या नाटकाची निवड करण्यात आली असल्याची माहिती ‘स्टार प्रवाह’च्या प्रवक्त्यांनी दिली. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषीकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी या दहा कलाकारांनी मिळून ही ‘नांदी’ सादर केली आहे.