अलीकडच्या काळात एखाद्या नाटकाचे हजार प्रयोग होणं ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट झाली आहे. गेल्या काही वर्षांत तर ते अशक्यप्रायच झालेलं आहे. याची कारणं तीन : एक तर त्या ताकदीची नाटकंच हल्ली लिहिली जात नाहीएत. दुसरं- प्रेक्षकांचं अवधान खेचून घेणारी इतकी विविध माध्यमं आज त्यांना सहज उपलब्ध आहेत, की त्यांना नाट्यगृहाकडे खेचून आणणं अतिशय अवघड झालं आहे. तिसरं- कलाकारांनाही नाटकापेक्षा मालिका, चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्मचं अधिक आकर्षण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे फावल्या वेळात करायची गोष्ट म्हणजे- किंवा अगदीच काही हाताशी नसेल तर करायचं म्हणजे नाटक असं समीकरण कलाकारांमध्येही रूढ झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित आणि भरत जाधव यांची शब्दश: ‘चतुरस्रा’ भूमिका असलेलं नाटक ‘सही रे सही’ याचे ४४४४ प्रयोग होत आहेत हा एक विक्रमच म्हणायला हवा. एकाच कलाकाराने एकाच नाटकाचे इतके प्रयोग करण्याचाही बहुधा हा विक्रम असावा. येत्या १५ ऑगस्ट रोजी भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे ‘सही रे सही’चा हा विक्रमी ४४४४ वा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणार आहे. याच दिवशी भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ या नाटकाचा ५८ वा प्रयोग, तर ‘मोरूची मावशी’चा ८६२ वा प्रयोगही ठाकरे नाट्यगृहात सलगपणे होणार आहेत. एका कलाकाराच्या तीन नाटकांचे एकाच दिवशी तीन सलग प्रयोग हेदेखील या नाट्यमहोत्सवाचं आकर्षण असणार आहे. १५ ऑगस्ट २००२ रोजी निर्मात्या लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतामणी संस्थेतर्फे ‘सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. आणि आज २२ वर्षांनंतर त्याचा ४४४४ वा प्रयोग होत आहे. पहिल्या प्रयोगापासूनच त्याला हाऊसफुल्ल गर्दी होण्याचं भाग्य प्राप्त झालं आहे. असं सहसा कधी घडत नाही. पहिल्या वर्षात ३६५ दिवसांत ५६७ हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमी टप्पा पार करणारं हे नाटक त्यानंतर तब्बल २०१५-१६ पर्यंत हाऊसफुल्लचा बोर्ड कायम ठेवून होतं. या नाटकानं निर्मात्यांना तर धोधो पैसा दिलाच; पण त्याचे कॉन्ट्रॅक्ट शो लावणाऱ्या लोकांनाही प्रचंड पैसा दिला. ‘सही रे सही’चे नंतर हिंदी आणि गुजरातीतही प्रयोग झाले. अॅक्शनपॅक्ड ड्रामा असल्याने इतरभाषिक प्रेक्षकांनीही आवर्जून ‘सही रे सही’चे मराठी प्रयोग पाहिले. आजही पाहतात. पं. सत्यदेव दुबे त्यांच्या टीममधल्या कलाकारांना नेहमी सांगत की, ‘जा. जाऊन ‘सही रे सही’चा प्रयोग पाहा.’ हिंदी चित्रपट अभिनेते अमरिश पुरी हेही दुबेंच्या सांगण्यावरून ‘सही’चा प्रयोग पाहायला आले आणि खूश झाले. डॉ. श्रीराम लागूही या नाटकावर बेहद्द खूश झाले होते. ‘दिग्दर्शक आणि मुख्य कलाकार यांच्यातल्या उत्तम ट्युनिंगचं हे नाटक आहे. त्यांच्यातल्या मैत्रीचं प्रतिबिंब त्यात दिसतं,’ असे उद्गार त्यांनी तेव्हा काढले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तब्बल सहा वेळा हे नाटक पाहिलं होतं. हेही वाचा >>> समर्थ रामदासांच्या भूमिकेत अभिनेता विक्रम गायकवाड या नाटकाला रिपीट ऑडियन्स भरपूर आहे. एका प्रेक्षकाने तर तब्बल ५० वेळा हे नाटक तिकीट काढून पाहिलंय. काही प्रेक्षक असेही आहेत, की ज्यांनी पूर्वी हे नाटक पाहिलं होतं आणि आता ते आपल्या पोराबाळांना घेऊन हे नाटक पाहत असतात. नाशिकच्या एका प्रयोगाचा किस्सा भरत जाधव सांगतात : एका प्रेक्षकाने पाचशे रुपयांचं तिकीट घेतलं होतं आणि तो जागेवर जाऊन बसला. पण चुकून त्याला दोन तिकीटं दिली गेली होती. पण आता कुठे बुकिंग खिडकीवर परत जा आणि तिकीट परत करा, म्हणून त्याने ते तिकीट परत केलं नाही. तो प्रयोग हाऊसफुल्ल होता. प्रयोग झाल्यानंतर तो प्रेक्षक रंगपटात येऊन भरत जाधव यांना म्हणाला, ‘माझ्या आळशीपणामुळे तुमचा प्रयोग हाऊसफुल्ल असूनही एक जागा रिकामी राहिली. तेव्हा त्या रिक्त राहिलेल्या जागेच्या तिकिटाचे पैसे तुम्ही माझ्याकडून घ्या,’ असा त्याने जबरदस्तीने आग्रहच केला. असे प्रेक्षकांचे अचंबित करणारे अनेक अनुभव भरत जाधव यांना या नाटकाच्या प्रवासात आलेत. लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतामणीने ‘सही रे सही’चे १९६० प्रयोग केले. त्यानंतर ‘सुयोग’च्या सुधीर भटांनी त्याचे साडेपाचशेवर प्रयोग केले. आणि त्यापुढचे प्रयोग भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे आता होत आहेत. दरम्यानच्या काळात भरत जाधव अनेक चित्रपटांतूनही व्यग्र झाले. त्यांच्या ‘पछाडलेल्या’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘सही रे सही’फेम भरत जाधव’ अशा प्रकारे त्यांचा उल्लेख केला गेला आहे. जो सहसा उलटा असतो. अमुक तमुक चित्रपट स्टार म्हणून नाटकाच्या जाहिरातींत काही कलाकारांचा उल्लेख होत असतो. परंतु पहिल्या प्रथमच नाटकातील एका स्टार कलाकाराच्या वलयाचा उल्लेख चित्रपट श्रेयनामावलीत केला गेला! चित्रपटांत व्यग्र असूनही भरत जाधव यांनी नाटकाकडे दुर्लक्ष केलं नाही. जिथे त्यांचं चित्रीकरण असेल त्या आसपासच्या परिसरात ते नाटकाचे प्रयोग लावत राहिले. आपल्याला ज्या नाटकानं नाव आणि प्रसिद्धी दिली ते, ते विसरू इच्छित नव्हते. साहजिकच त्यांचे एकीकडे चित्रपट येत होते त्याच जोडीनं त्यांचे नाटकांचे प्रयोगही धडाक्यात सुरू होते. या प्रदीर्घ प्रवासात ‘सही रे सही’मध्ये भरत जाधव आणि जयराज नायर सोडल्यास बहुतेक कलाकारांची या ना त्या कारणांनी रिप्लेसमेंट झाली आहे. पण या नाटकाचं गारूडच असं आहे, की भरतच्या एकट्याच्या नावावरच ते अजूनही चाललं आहे. भरत जाधव यांनी आपली नाट्यसंस्था सुरू केल्यावर अनेक नाटकं काढली. त्यांतही तेच प्रमुख भूमिकेत होते. ‘सुयोग’ बंद झाल्यावर त्यांनी ‘मोरूची मावशी’चे प्रयोगही पुढे चालू ठेवले. विजय चव्हाण यांच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे हे नाटक त्यांनाच भरतने समर्पित केलंय. गेल्या वर्षी स्वप्नील जाधव यांनी लिहिलेलं ‘अस्तित्व’ हे नाटक अविनाश नारकर यांनी भरत जाधव यांना सुचवलं. त्यांनाच प्रमुख भूमिका देऊन ते करायचं असं भरत जाधव यांच्या मनात होतं. पण दरम्यान अविनाश नारकर मालिकांमध्ये बिझी झाले आणि ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तेव्हा भरत जाधव यांनीच त्यात काम करावं असं त्यांनी सुचवलं आणि भरत यातल्या प्रमुख भूमिकेत उभे राहिले. त्याच ‘अस्तित्व’वर यंदा राज्य शासनाच्या नाट्यस्पर्धेसह अनेक स्पर्धांतून पुरस्कारांचा वर्षांव झाला आहे. भरत जाधव यांची प्रचलित प्रतिमा पुसून टाकणारं हे नाटक प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून निर्माते आणि कलाकार म्हणून वेगळ्या अपेक्षा निर्माण करणारं आहे. या तीन नाटकांचा १५ ऑगस्टला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणारा एकत्रित महोत्सव हे याचंच द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही.