आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्पर्धात्मक चित्रपट विभागात मराठी चित्रपटाची निवड होणं. तिथपर्यंत तो पोहोचणं हा मराठी चित्रपटकर्मींसाठी आणि चित्रपटप्रेमींसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. यापुढचे पाऊल म्हणून आता अमेरिकेत मराठी चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. मराठी चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ या संस्थेच्या वतीने २७ – २८ जुलै दरम्यान कॅलिफोर्निया येथे मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चित्रपट महोत्सवाला अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून, त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अभिनेत्री अश्विनी भावे, अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी कलाकार मंडळी या चित्रपट महोत्सवास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात ‘निर्माल्य’, ‘अथांग’ आणि ‘पायरव’ या शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जातील. या शॉर्ट फिल्म अमेरिकेतच चित्रित करण्यात आल्या असून तेथील कलाकारांनीच साकारलेल्या आहेत.

हेही वाचा >>>Video: ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘देऊळ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी उभारण्याच्या दृष्टीने घोलप यांनी हे पाऊल उचलले आहे. ‘देऊळ’ या माझ्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान मिळाल्यानंतर काही चित्रपट मी भारतात केले. त्याच वेळेला मनात एक कल्पना घोळत होती की नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी. अल्पावधीतच ५०० हून अधिक सदस्य जोडले गेले. वर्षाअखेरीस २ शॉर्ट फिल्म्सची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून फिल्म क्लबच्या तयारीला लागलो. अनेक गुणी कलावंत, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. बरेच सदस्य नाटक आणि स्टेज परफॉर्मन्स करत होते. त्यांच्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय, टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून कार्यविस्तार होत गेला’ अशी माहिती अभिजीत घोलप यांनी दिली. या संस्थेचे पुढचे पाऊल ठरले ते लघुपट निर्मितीचे. ‘दोन लघुपटांच्या निर्मितीचे ध्येय समोर ठेवले होते. १४ सदस्यांच्या समितीने आमच्याकडे आलेल्या ६५ हून अधिक पटकथांमधून ५ कथांची निवड केली. आमच्याच सदस्यांमधून १७ निर्माते पुढे आले. आणि त्यानंतर ‘निर्माल्य’ व ‘पायरव’ या दोन लघुपटांच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली. ऑस्टिन, टेक्सास येथे एका चित्रपटाचे प्रॉडक्शन झाले तर फिनिक्स, अॅरिझोना येथे दुसरा चित्रपट चित्रित झाला.

आता २७-२८ जुलै २०२४ रोजी नॉर्थ अमेरिकेतील पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत आहोत, असे घोलप यांनी स्पष्ट केले. सॅन जोस येथे हा चित्रपट महोत्सव होणार असून मराठी सिनेसृष्टी परदेशात प्रगतिपथावर नेण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनीसांगितले.