मुंबई : गोव्यातील ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 गोदावरी नदीचा काठ आणि त्याच्याशी जोडलेले एका व्यक्तीचे भावविश्व उलगडणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा रजत मयूर पुरस्कार विभागून देण्यात आला. पणजी येथे आठवडाभर रंगलेल्या इफ्फी महोत्सवाचा समारोप रविवारी एका शानदार समारंभात करण्यात आला. करोनानंतर पहिल्यांदाच या महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्फीचा समारोप सोहळा रंगला.

जपानी ‘रिंग वॉन्डिरग’ला सुवर्ण मयूर..महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार जपानी दिग्दर्शक मासाकाझू कानेको यांच्या ‘रिंग वॉन्डिरग’ या चित्रपटाला देण्यात आला. युद्धग्रस्त जपानमधील विस्मृतीत गेलेल्या आठवणी उलगडणाऱ्या या चित्रपटाने परीक्षकांची मने जिंकली, तर झेक दिग्दर्शक वाक्लॅव कांद्रका यांचा ‘सेव्हिंग वन हु वॉज डेड’ हा चित्रपट इफ्फीत रजत मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

मानकरी

* निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट आणि रॉड्रिगो डी ऑलिव्हेरा दिग्दर्शित ‘द फस्र्ट फॉलन’ चित्रपटातील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा काव्‍‌र्हालोला विशेष परिक्षकांचा ‘रजत मयूर पुरस्कार’ विभागून. 

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्कार अभिनेते जितेंद्र जोशी यांना, तर स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना यांना ‘शार्लोट’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ‘रजत मयूर’ पुरस्काराची मानकरी 

* गीतकार प्रसून जोशी यांना ‘भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व – २०२१’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रजत मयूरचा इतिहास

इफ्फी महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार २०१० पासून सुरू करण्यात आला. १९७९ साली अभिनेते शंकर नाग आणि रघुवीर यादव यांना इफ्फीमध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१९ मध्ये अभिनेत्री उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रजत मयूर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर यंदा जितेंद्र जोशी हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

गोदावरीया चित्रपटाला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे. खूप वर्षांनी मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडला गेला आणि पुरस्काराचा मानकरी ठरला. हा अभिमानाचा आणि अत्युच्च आनंदाचा क्षण आहे.

– निखिल महाजन, दिग्दर्शक

गोदावरीही माझी पहिलीच निर्मिती. या चित्रपटासाठी दिग्र्दशक निखिल महाजन आणि आमचा चमू यांनी जी मेहनत घेतली, जो विश्वास दाखवला, त्याचाच परिपाक म्हणजे हा पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला.

– जितेंद्र जोशी, अभिनेता