आई आणि मुलामधल्या नात्याची वीण अलवार उलगडणारा, मराठीच नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपटामध्ये पहिल्यांदा एआय आधारित पात्र असलेला, अनुभवी अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासह अभिनय बेर्डे-ऋता दुर्गुळे असं वेगळंच अभिनयाचं त्रिकूट आणि लेखक-गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्षितिज पटवर्धन यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला चित्रपट म्हणून ‘उत्तर’ विषयी चर्चा सुरू आहे. १२ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची वैशिष्ट्ये उलगडण्याबरोबरच एआय तंत्रज्ञानाला आपण धुडकावून लावू शकत नाही, मात्र हे तंत्रज्ञान मानवी सर्जनशीलतेची जागा कधीच घेऊ शकणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत क्षितिज पटवर्धन, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

नव्या चेहऱ्यांची गरज

अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे या दोन युवा कलाकारांना प्रमुख भूमिकेत घेण्यामागे त्यांच्याबरोबर आधी काम करताना आलेले अनुभव, त्यांच्या क्षमता या बाबींबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी मांडला. ‘मी या चित्रपटासाठी कलाकार निवडताना पुढच्या १०-२० वर्षांचा विचार केला. मराठी चित्रपटांना उत्तमोत्तम नव्या चेहऱ्यांची, नव्या शक्यता निर्माण करू शकतील अशा कलाकारांची गरज आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ऋता आणि अभिनय यांच्या अभिनयाचे विविध पैलू, क्षमता लोकांसमोर येतील. त्यांचं काम हे आत्ताच्या निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांना त्या दर्जाचं काम भविष्यात मिळेल आणि पुढची दोन दशकं त्यांचं उत्तम काम प्रेक्षकांना पाहायला मिळेल’ असा विश्वास क्षितिजने व्यक्त केला.

कलाकार म्हणून अभिनयची क्षमता अफाट आहे, त्याचं संवादफेकीचं टायमिंग, भूमिकेची समज खूप चांगली आहे, पण त्या तुलनेत त्याला वाव मिळालेला नाही. त्यामुळे या चित्रपटातून अभिनय आणि ऋतासारखे दोन तरुण कलाकार आणि रेणुका शहाणे यांच्यासारखी उत्तम अभिनेत्री एकत्र आले आहेत. या तिघांनीही भूमिकेची लांबी बघितली नाही, तर त्या भूमिकेतून त्यांना काय देता येईल हे शोधायचा प्रयत्न केला आहे. मी भाग्यवान आहे की दिग्दर्शक म्हणून पहिल्याच चित्रपटात या तिघांबरोबर मला काम करता आलं, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

पुरुषी वर्चस्ववादी प्रवृत्तीचं पेव माजलेलं आहे…

ओटीटी-चित्रपट-मालिका सगळीकडे आक्रमक कथानक, ॲक्शनपट अशा चित्रपटांची एकच गर्दी आहे. या गर्दीत आई आणि मुलाच्या हळुवार नात्याची गोष्ट सांगणारा आणि एआय आधारित पात्र असलेला ‘उत्तर’सारखा चित्रपट करण्यामागची भूमिका क्षितिजने स्पष्ट केली. ‘धूम्रपान करणारे, एकमेकांना शिव्या घालणारे, एकमेकांचं डोकं फोडणारे अशाच पात्रांच्या गोष्टी आपल्याला सध्या सगळ्या माध्यमातून दिसतायेत, पण मला प्रेक्षकांना हा प्रश्न विचारावासा वाटतो, आपल्यापैकी ९५ टक्के लोकांचं आयुष्य हे असं असतं का? आपण दररोज सकाळी उठून बंदूक घेऊन निघत नाही, सर्वसामान्य आयुष्य जगतो. आपल्या आयुष्यातलं नाट्य हेही त्या चाकोरीतलंच असतं. असं असताना गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या, पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता असलेल्या ५ टक्के लोकांच्या गोष्टी का पाहायच्या? तुम्ही कितीही उठाठेवी केल्यात तरी तुम्हाला तुमच्या मूळ आयुष्याकडे परत यावं लागतं आणि त्यावेळी तुम्हाला जगण्यातलं सौंदर्य दाखवून देणाऱ्या कथेचाच आधार वाटतो. आणि म्हणून आपण ‘लाइफ इज ब्युटिफुल’, ‘परस्युएट ऑफ हॅप्पीनेस’, हिंदीत ‘पिकू’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’सारखे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो’ असं त्याने सांगितलं. आपल्या आयु

नवोदितांबरोबर काम करायला खूप आवडतं

१९९० मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच माझे काम करण्याबद्दलचे काही निकष होते. मुळात मी मुंबईतच लहानाची मोठी झालेले होते, त्यामुळे कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात हा संघर्ष माझ्या वाट्याला नव्हता. मी कलाशाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं होतं. त्यामुळे चित्रपटात काम मिळालं नाही तर पीएच.डी. करून दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याचा पर्याय माझ्याकडे होता. त्यामुळे चित्रपट वा दूरचित्रवाहिनी कुठल्याही माध्यमात माझी भूमिका काय आहे? त्या भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचतं आहे? याचबरोबर मालिका असेल तर मला संबंधितांबरोबर त्या प्रक्रियेतही सहभाग घेता येतो आहे ना, अशा गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. दुसरं म्हणजे आशयाच्या बाबतीत मी पुरोगामी असल्याने विनाकारण स्त्रियांना दुय्यम भूमिका देणारा आशय वा पुरुषी वर्चस्ववादाला खतपाणी घालणारं काही असेल तर त्या भूमिका मी कधीच स्वीकारल्या नाहीत, असं अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितलं. मला कायम नवोदितांबरोबर काम करायला आवडतं, कारण दिग्दर्शक असो वा कलाकार त्यांच्या सुरुवातीच्या काळात एक तळमळ त्यांच्या कामात असते. अजून चांगलं काय करता येई

नायिकांच्या दिसण्याला खूप महत्त्व…

‘उत्तर’मध्ये जेन झी मुलीची भूमिका करणाऱ्या ऋताने अभिनेत्री म्हणून तिच्या आजवरच्या प्रवासाविषयी बोलताना दहा वर्षं या क्षेत्रात चुकतमाकत शिकून काय पद्धतीच्या भूमिका कराव्यात हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घेता येईल, अशा टप्प्यावर पोहोचले आहे, असं सांगितलं. ‘दुर्वा’ मालिकेपासून सुरुवात झाली, तेव्हा अभिनयाच्या क्षेत्रात यायचं ठरवलं नव्हतं. त्यामुळे सेटवरचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनी सांभाळून घेतलं आणि त्यांच्याबरोबर काम करता करता मला हे क्षेत्र समजत गेलं. पुढे ‘फुलपाखरू’ मालिकेने मला प्रसिद्धी मिळवून दिली. त्या मालिकेतलं काम पाहून अद्वैत दादरकर यांनी नाटकात काम करण्याची संधी दिली. एका कामातून दुसरं काम येत गेलं… पण मला वाटतं तुमची आर्थिक स्थिती, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्याचा विचार करून तुम्ही काय काम करायचं याचा निर्णय घेत असता. सुरुवातीला काम तुमची निवड करतं आणि मग हळूहळू तुमची ओळख निर्माण होते. आपल्याकडे अजूनही नायिकेचं दिसणं महत्त्वाचं ठरतं, ज्यात मला वाटतं माझं कलाकार म्हणून काहीच श्रेय नाही. माझंं अभिनय कौशल्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होईल, अशा पद्धतीच्या भूमिका करायला मला आवडतात

एका साच्यात अडकायचं नाही

२०१९ मध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा विशीत होतो. त्यामुळे नायक म्हणून कोणी निवडावं इतका प्रगल्भपणा चेहऱ्यावरही दिसत नव्हता. ‘ती सध्या काय करते’मुळे चांगल्या संधी मिळत गेल्या. दिग्दर्शकांनाही विश्वास वाटत होता की मी चांगलं काम करेन. त्यावेळीही मी सुरुवातीपासूनच निवडक भूमिका करायचं ठरवलं होतं. अर्थात, नंतर कोविडमुळे टाळेबंदी झाली आणि मग पुढची दोन वर्षं मिळेल ते काम करणं गरजेचं होतं, कारण नुसतेच घरी बसून होतो. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मनाला पटतील अशाच भूमिका करायचा हा निर्धार केला आणि दुसऱ्याच दिवशी क्षितिज पटवर्धन यांनी ‘आज्जीबाई जोरात’ नाटकाविषयी विचारणा केली. तेव्हापासून मी जाणीवपूर्वक नाटकातील भूमिकेवर जोर दिला आणि दोनच चित्रपट केले, एक ‘दशावतार’ आणि दुसरा ‘उत्तर’. त्यामुळे कुठल्याही साचेबद्ध भूमिका वा चित्रपटांमध्ये अडकायचं नाही ही मनापासून ठरवलेली गोष्ट यापुढेही कायम असेल, असं अभिनयने ठामपणे सांगितलं.