-स्वाती वेमूल
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्टाइल स्टेंटमेंटसोबतच त्यांची केशभूषाही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेते. ‘जैसा देस वैसा भेस’ या म्हणीप्रमाणे ‘जशी भूमिका तशी केशरचना’ या कलाकारांना करावी लागते. हेअरस्टाइल हा शब्द सामान्य वाटत असला तरी एखाद्या भूमिकेला योग्य चेहरा देण्यामागे त्याचा मोठा वाटा असतो. म्हणूनच ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा रणवीर जेव्हा ‘पद्मावत’सारख्या चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारतो, तेव्हा त्याचा लूक सर्वकाही सांगून जातो. अशाच प्रकारे सैफ अली खानच्या आगामी ‘लाल कप्तान’ या चित्रपटातील त्याचा नागासाधूसारखा लूक अंगावर काटा आणतो. या दोन्ही बहुचर्चित लूकमागे आहे एक मराठमोळा चेहरा. दर्शन येवलेकर या मराठमोळ्या तरुणाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सुनील शेट्टीपासून, रणवीर सिंग, रणबीर कपूरपर्यंत अनेक कलाकारांची हेअरस्टाइल दर्शनने केली आहे. सैफचा ‘लाल कप्तान’मधील नागासाधूचा लूक सध्या विशेष चर्चेत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी साधलेला संवाद…
‘लाल कप्तान’ चित्रपटासाठी सैफला नागासाधूचं लूक देण्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक काय होतं?
– लूक कोणताही असो तो बनावट अजिबात वाटू नये याकडे माझा कल असतो. सैफ नागासाधूसारखा दिसला पाहिजे हेच सर्वाधिक आव्हानात्मक होतं. त्यामुळे त्याला आधी दाढी आणि केस वाढवायला सांगितले. लूक बनावट वाटला तर त्यात मजा येत नाही.
सैफच्या या लूकची तुलना ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’मधील जॉनी डेपच्या लूकशी केली गेली, त्याबद्दल काय सांगशील?
-नागासाधू म्हटलं की विभूती, लांब जटा, मोठी दाढी या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. वाराणसीत पाहिलेल्या नागासाधूंचा लूक डोक्यात ठेवून मी सैफचा लूक साकारला. उलट जॉनी डेपचा लूक नागासाधूंकडून प्रेरणा घेऊन केल्याचं आपण म्हणू शकतो. सेटवर एका दृश्यासाठी सैफला बंडाना बांधला होता. त्यामुळे त्या लूकमध्ये तो बऱ्याच अंशी ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’मधील जॉनी डेपसारखा दिसत होता. म्हणून कदाचित तुलना झाली असावी.
सैफचा लूक साकारण्यासाठी किती वेळ लागला?
-चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याच्या दोन-अडीच महिन्यापूर्वी सैफच्या लूकची तयारी केली. दररोज त्याचा लूक साकारण्यासाठी चार ते पाच तास लागायचे.
‘पद्मावत’मधील अल्लाऊद्दीन खिल्जीचा लूक साकारताना कोणतं आव्हान होतं?
-खिल्जी नेमका कसा दिसायचा याची माहिती फार कमी होती. किंबहुना नव्हतीच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्या भूमिकेचा पूर्ण अभ्यास मी केली. ते कुठे कुठे फिरत, दौऱ्यावर त्याच्यासोबत किती लोक असत यावरून त्याची केशरचना, दाढी कशी असेल याचा विचार केला. तो कुठून आला आहे, कसा राहतो या गोष्टी त्यात महत्त्वाच्या होत्या.
रणवीरच्या रेड कार्पेट, चित्रपट, मासिकाचे शूटिंग या सर्वांसाठी तू हेअरस्टाइल करतोस. प्रत्येक वेळी त्यासाठी कशी मेहनत घेतोस?
-रणवीर सिंग त्याच्या कपड्यांवर फार प्रयोग करतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्या कपड्यांनुसार हेअरस्टाइल करावी लागते. कार्यक्रमाचा मूड, इनडोअर आहे की आऊटडोअर, औपचारिक आहे की अनौपचारिक यानुसार प्रत्येक वेळी वेगळी हेअरस्टाइल, दाढी केली जाते. त्यासाठी आधी कार्यक्रमाचा पूर्ण अभ्यास मी करतो.
तुला या व्यवसायात किती वर्षे झाली?
-2003 पासून मी हा व्यवसाय करत आहे. आता १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सलमान खानपासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘सांवरियाँ’साठी रणबीर कपूरचं, ‘गुजारिश’साठी आदित्य रॉय कपूरचं, रितेश देशमुख, आयुष शर्मा, सुनील शेट्टी इत्यादी सेलिब्रिटींचे केस मी कापले आहेत.
तुझ्यामते बेस्ट ग्रूमिंग सेलिब्रिटी कोण आहे?
-माझा आवडता रणवीर सिंग
एखादा कलाकार ज्याची हेअरस्टाइल करायची इच्छा आहे?
-जॉनी डेप
कोणत्या अभिनेत्रीची हेअरस्टाइल करायची इच्छा आहे?
-कियारा अडवाणी, मी तिचा चाहता आहे.
कोणत्या मराठी कलाकाराची हेअरस्टाइल तुला आवडते?
-आदिनाथ कोठारे. मी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे फोटो पाहिले आहेत.
तरुणांसाठी काही खास टिप्स?
-तरुणांना मी हे आवर्जून सांगू इच्छितो की दाढी वाढवण्यासाठी बाहेरुन काही उपाय करू नका. त्यासाठी उत्तम आहार, वर्कआऊट आणि अर्थात आनुवंशिकता फार गरजेची असते.