scorecardresearch

मुलं आणि पालकांच्या अपेक्षांची ‘बेरीज वजाबाकी’

लाखो रुपये डोनेशन देऊन मोठय़ा शाळेतच मुलांना चांगले शिक्षण मिळते, हा जो पालकांच्या मनातला गैरसमज आहे तो आधी मोडून काढला पाहिजे.

मुलं आणि पालकांच्या अपेक्षांची ‘बेरीज वजाबाकी’
(संग्रहित छायाचित्र)

 

गेल्या काही वर्षांत मुलांच्या भावविश्वाचे चित्रण करणारे, त्यांच्या शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकणारे, मुलं आणि पालक यांच्यातील आशा-अपेक्षांवर बोलू पाहणारे असे अनेक मराठी चित्रपट आले. मुलांच्या शिक्षणाबद्दल काही वेगळे प्रयोग करू पाहणाऱ्या शिक्षकांवर आणि त्यांच्या अडचणींवर बोलू पाहणारे चित्रपटही आले. ‘उबुंटू’, ‘बारायण’, ‘कॉपी’, ‘परी हूँ मै’, ‘पळशीची पीटी’ असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यातील काही दुर्लक्षित राहिले, तर काही लक्षात राहिले. मात्र या चित्रपटांच्या यशापयशाचा विचार बाजूला ठेवला तरी मुलांच्या शैक्षणिक समस्या, काळानुसार न बदलणारी शिक्षण व्यवस्था आणि त्यामुळे मुलांचा साचेबद्ध पद्धतीने होणारा विकास हे विषय अजूनही मराठी लेखक-दिग्दर्शकांना खुणावत आहेत. राजू भोसले दिग्दर्शित आणि प्रताप देशमुख लिखित ‘बेरीज वजाबाकी’ हा याच प्रवाहातला आणखी एक वेगळा विषय मांडू पाहणारा चित्रपट म्हणता येईल.

आजच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा विचार करताना त्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी झाले पाहिजे, त्यांना अभ्यासाचा ताण येईल अशा पद्धतीची परीक्षा व्यवस्था नको, अशा अनेक अपेक्षा पालक व्यक्त करताना दिसतात. मात्र या अपेक्षा व्यक्त करताना मुळात मुलांना काय हवं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न पालक करतात का, असा सवाल दिग्दर्शक राजू भोसले यांनी उपस्थित केला. मुलं निरागसच असतात, मात्र जसजशी ती मोठी होत जातात तसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. अगदी घरातील आईवडिलांची क्षुल्लक भांडणंही त्यांचे विश्व बदलून टाकतात. घरातील वातावरण अस्थिर असेल तर मुलं अनेकदा चिडचिडी होतात, तापट होतात, कधी अबोल राहतात. हा जसा घरातील जडणघडणीमुळे होणारा परिणाम आहे, तसाच शिक्षणाचाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर तितकाच परिणाम होत असतो. याचा समतोल साधणं गरजेचं आहे, त्याचा विचारच आपल्याकडे केला जात नाही. त्यामुळे मुलांशी संबंधित असणारा आणि प्रामुख्याने मुक्तशाळासारखे जे वेगळे प्रयोग त्यासाठी होत आहेत, याकडे लक्ष वेधायला हवे, असा विषय गेली दोन वर्षे डोक्यात घोळत होता, असे त्यांनी सांगितले.

लाखो रुपये डोनेशन देऊन मोठय़ा शाळेतच मुलांना चांगले शिक्षण मिळते, हा जो पालकांच्या मनातला गैरसमज आहे तो आधी मोडून काढला पाहिजे. आणि त्यासाठी मुलं कोणत्या पद्धतीने ताणविरहित आणि अधिक अभ्यासात्मक पद्धतीने शिकू शकतात, याची जाणीव पालकांना होणे गरजेचे असल्याने या विषयावर अधिक अभ्यास करत चित्रपट केला असल्याची माहिती भोसले यांनी दिली. दोन वर्षे हा विषय मी आणि आमचे लेखक प्रताप देशमुख यांनी सततच्या अभ्यास-चर्चेतून विकसित करत पटकथा केली. पटकथेवर आम्ही जी मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कलाकारांच्या स्वरूपात मिळालं, असं त्यांनी सांगितलं. ‘बेरीज वजाबाकी’ या चित्रपटात अभिनेता नंदू माधव, मोहन जोशी, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार अशा नामांकित कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या प्रत्येक कलाकाराने केवळ पटकथेच्या जोरावर भूमिका करण्यासाठी होकार दिला. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना कोणतीही अडचण आली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यात मुक्तशाळासारखा वेगळा प्रयोग करणाऱ्या शिक्षकाची भूमिका नंदू माधव यांनी केली आहे, तर मोहन जोशी हे शिक्षणतज्ज्ञाच्या भूमिकेत आहेत. तब्बल अकरा मुला-मुलींनी या चित्रपटात काम केले असल्याची माहितीही भोसले यांनी दिली. चित्रपट क्षेत्रात साहाय्यक दिग्दर्शक, लेखक असा प्रवास केलेल्या राजू भोसले यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. येत्या शुक्रवारी राज्यभरात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या