सिनेमा, सौजन्य –
नोबेल पारितोषिक विजेते गुरु वर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली लघुकथेवरून प्रेरित होऊन बनलेला सचिन नागरगोजे दिग्दर्शित ‘दृष्टिदान’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. भावनिक नातेसंबंधांविषयी पूर्वानुगृहीत संकल्पनेला छेद देऊन जीवनाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देणारी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील ही एक अनोखी प्रेमकथा आहे, त्याविषयी..
एखाद्या लेखकाचे लेखन, त्यांच्या लेखनातून त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे जेव्हा काळाच्या ओघातही टिकून राहतात तेव्हा आपण त्या लेखकाला महान लेखक असे म्हणतो. अनेक दशके, शतके उलटून गेली तरीही असे लेखन चिरकाळ आपल्या स्मरणात राहते आणि लेखकाने आपल्या लेखणीद्वारे मांडलेल्या त्या गोष्टींचा, त्यांच्या विचारांचा आपण आत्ताच्या काळात ही नव्याने अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
मागच्या शतकातील असेच एक महान लेखक म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते गुरु देव रवींद्रनाथ टागोर. टागोरांच्या साहित्य कलाकृतीने भारतातील अनेक पिढय़ांना वैचारिकदृष्टय़ा समृद्ध केले आहे. त्यांच्या साहित्यावर आधारित अनेक गाजलेले चित्रपट यापूर्वी चित्रपटसृष्टीत होऊन गेले आहेत, पण आता मराठीत पहिल्यांदाच टागोरांच्या लघुकथेवर आधारित ‘दृष्टिदान’ नावाचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आव्हानात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत एक तरु ण दिग्दर्शक सचिन नागरगोजे. चित्रपट दिग्दर्शनाचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. पण ‘दृष्टिदान’ या चित्रपटाविषयी मराठी चित्रपटसृष्टीत आत्तापासूनच चर्चा सुरू झालेली असल्यामुळे या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘दृष्टिदान’ या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळात साधारणत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घडते. त्या काळानुसार लहान वयातच लग्न झालेल्या आणि एकमेकांवर अतीव प्रेम करणाऱ्या जोडप्याची ही कथा आहे. लग्नानंतर अंधत्व आलेल्या आपल्या पत्नीची सेवा करणारा पती आणि आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करणारी पत्नी यांच्या नात्यातील विलक्षण गुंतागुंत या प्रेमकथेद्वारे आपल्याला पाहायला मिळते. बालवयातच सुरू झालेला त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास सुखाने सुरू असतानाच, अतीव प्रेमापोटी त्यांनी केलेल्या काही चुकांमुळे अचानक त्यांच्या सुखी संसाराचा गाडा डगमगतो, आणि त्यांच्या आयुष्याला नाटय़मय कलाटणी मिळते. मग तिथून सुरू होतो त्यांच्या खऱ्याखुऱ्या संघर्षांचा प्रवास. हा प्रवास करत असताना, पतीधर्म किंवा पत्नीधर्म यांच्या पूर्वानुगृहीत संकल्पनेला छेद देऊन जीवनाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी या जोडप्याला लाभते अशी या चित्रपटाची थोडक्यात कथा आहे.
टागोरांच्या कथा या वरकरणी अतिशय साध्या सोप्या वाटल्या तरीही त्यामध्ये नात्यांची आणि मानवी भावभावनांची विलक्षण गुंतागुंत असते. कथेतील पात्र, त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती, तत्कालीन सामाजिक विचारपद्धती आणि मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या सर्वांचे अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेले चित्रण आपल्याला रवींद्रनाथांच्या कथेत परिणामकारकरीत्या मांडलेले दिसून येते. ‘दृष्टिदान’ ही कथा महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अगदी जवळची वाटावी यासाठी दिग्दर्शकाने मूळ बंगाली लघुकथेवर आधारित मराठी चित्रपटाची पटकथा लिहीत असताना मात्र कथेचा गाभा आणि आशय कायम ठेवून चित्रपटाच्या दृष्टीने त्यात आवश्यक ते बदल केलेले आहेत. रवींद्रनाथांच्या मूळ लघुकथेत कोलकाता शहरात राहणारे एक बंगाली दाम्पत्य दाखवले आहे, तर या मराठी चित्रपटात सातारा परिसरात राहणार तामणकर हे ब्राह्मण कुटुंब दाखवण्यात आलं आहे. तसं पाहिलं तर मूळ कथा ही खूप छोटी म्हणजे फक्त २२ पानांची एक लघुकथा आहे. त्यामुळे त्यातील गाभा कायम राखून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट बनवणं हे एक महाकठीणच काम होते. परंतु दिग्दर्शकाने कुठलीही तडजोड करायची नाही आणि मूळ कथेला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनेच त्यावर अतिशय मेहनत घेतल्याचे पदोपदी जाणवते. संवाद लेखनासाठी पारितोषिक विजेती लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने पटकथा लेखक-दिग्दर्शकास मोलाची साथ दिली आहे. मुळात अशा विलक्षण नातेसंबंधांवरचा चित्रपट तयार करण्यामागे दिग्दर्शक सचिन नागरगोजे याचा काय विचार होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तो म्हणाला, ‘‘माझ्या डोक्यात हे पक्कं होतं की जर मला चित्रपट दिग्दर्शित करायचा असेल तर तो चित्रपट आव्हानात्मकच हवा. आज मराठीमध्ये एवढय़ा चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनत आहेत की तुम्ही जर तुमचं सर्वोत्तम काम केलं नाही तर इथे तुमचा टिकाव लागणं कठीण आहे. त्यामुळे मी त्यादृष्टीने चांगल्या कथेच्या शोधात होतो, त्यासाठी भरपूर वाचनही करत होतो. अशातच टागोरांची ही कथा माझ्या वाचनात आली आणि बराच काळ मनात घोळत राहिली. त्यातील आव्हान सतत मला खुणावत होते, शिवाय निर्मितीमूल्यांमध्ये कुठलीही तडजोड करायला लागू नये यासाठी मी लेखन आणि दिग्दर्शनासहित या चित्रपटाची निर्मितीही स्वत:च करायची असं ठरवलं आणि माझ्या पद्धतीनं ‘दृष्टिदान’ बनवण्याचा निर्णय घेतला. आजचा आपला मराठी प्रेक्षक खूप प्रगल्भ आहे. त्यामुळे या कथेतील पात्राशी ते कुठेतरी स्वत:ला नक्कीच जोडू शकतील असा मला विश्वास आहे त्यामुळेच मी पूर्ण ताकदीनं या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे.’’
रॉयल लुकवर विशेष मेहनत
‘परिणीता’ किंवा ‘देवदास’ या चित्रपटात आपल्याला बंगाली संस्कृतीमधील रॉयल कुटुंबाची छाप दिसून येते. या चित्रपटांमधील भव्य बंगले, सेटस, भरजरी कपडे आणि आभूषण आपले लक्ष वेधून घेतात. मराठी चित्रपट करतानाही तसाच भव्य परिणाम साधता यावा यासाठी काळानुरूप आणि कथेच्या गरजेनुसार या चित्रपटाच्या रॉयल लुकवर विशेष मेहनत घेतलेली दिसून येते. कलादिग्दर्शक देवीदास भंडारे यांनी आकर्षक रंगसंगतीच्या साहाय्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी वातावरण तयार केलं आहे. यातील भरजरी कपडे, आभूषणे आणि गाडय़ा या खास करून चित्रपटासाठी तयार करण्यात आल्या आहेत. मेकअप डिझाइनर अमित म्हात्रे यांनी सर्वच कलाकारांच्या लुकवर मेहनत घेऊन त्यांना स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने दिसण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ उभा करण्यासाठी चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, सातारा, वाई तसेच मराठवाडय़ातील गंगाखेड (जि. परभणी), अंबाजोगाई (जि. बीड), रेणापूर (जि. लातूर) अशा महाराष्ट्रातील इतर वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले.
‘दृष्टिदान’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वीणा जामकर, श्रुती मराठे, कश्यप परु ळेकर, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे आदी मातब्बर कलाकारांचा समावेश आहे. मीरा तामणकर ही व्यक्तिरेखा साकारताना वीणा जामकरच्या अभिनयाचे विविध पैलू आपल्यासमोर येतात. बालविवाह होऊन आलेल्या मीराला लग्नानंतर अंधत्व येते आणि तिच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी एक एक करून बदलायला लागतात. तसं पाहिलं तर अशी भूमिका करणं कुठल्याही नटासाठी एक कठीण काम असत, कारण नटाला त्या पात्राच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावनिक पातळीवर काम करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं वीणानं ही भूमिका ताकदीने पेलली असल्याचं जाणवतं. तिला या भूमिकेबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘‘या चित्रपटामध्ये एका अंध मुलीची भूमिका करणं खरंच आव्हानात्मक काम होतं. मी यापूर्वी विजय तेंडुलकरांच्या ‘काळोख’ या एकांकिकेत अंध मुलीची भूमिका केली होती म्हणून तो एक अनुभव माझ्या पाठीशी होता, पण कधी कधी स्क्रीनवर अस पात्र कुरूप दिसण्याचा संभव असतो. त्यामुळे अशा ठिकाणी थोडं तंत्राचंही भान ठेवावं लागतं. रवींद्रनाथ टागोरांच्या कथेतील भूमिका मला मराठीमध्ये साकारायला मिळाली हे मी माझं नशीब समजते आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्यासाठी हा आनंद जास्त महत्त्वाचा आहे.  दिग्दर्शक सचिन नागरगोजेला पहिल्यापासून माहीत होतं त्याला काय करायचंय ते त्यामुळे मला काम करताना विशेष अडचण आली नाही. आत्ताच्या पिढीतले प्रेक्षक शतकापूर्वीच्या या गुंतागुंतीच्या प्रेमकथेला कशा दृष्टीने प्रतिसाद देतात याबद्दल मला उत्सुकता आहे. असे वेगळे चित्रपट बनत राहिले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.’’
टागोरांच्या कथेवर काम करत असताना अजून एका गोष्टीवर विशेष लक्ष देण्यात आलंय आणि ती म्हणजे चित्रपटातील गाणी. टागोर हे स्वत: कवी असल्याने या चित्रपटात इतर चित्रपटांसारखी गाणी न ठेवता टागोरांच्या कवितांचा अभ्यास करून गीतकार वैभव जोशीने त्याच पठडीतल्या सुंदर आणि छोटय़ा छोटय़ा कविता रचल्या आहेत. या कवितांना सुंदर चाली देण्याचं काम केलंय रोहित नागभिडे यानं तर संगीत संयोजन केलंय सुमीत बेल्लारी यानं.
हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार आहे. निर्माता दिग्दर्शक सचिन नागरगोजे सध्या त्यासाठीच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. चित्रपट बनवल्यानंतर तो योग्य पद्धतीने प्रेक्षकांसमोर यावा यासाठी त्याचा प्रयत्न आहे. तो म्हणतो, ‘‘मी नुसता चांगला चित्रपट बनवून उपयोग नाही तर आजच्या काळाच्या गरजेनुसार माझ्या चित्रपटाचे वितरण चांगल्या पद्धतीने व्हावे याचे मला भान आहे, अन्यथा इतक्या वर्षांंच्या माझ्या मेहनतीचा काहीच फायदा होणार नाही आणि म्हणूनच मी त्या गोष्टींवर माझे लक्ष केंद्रित केले आहे.’’   
भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचे स्थान, समाजातील पारंपरिक विचार आणि पुरोगामी विचार यांचा संघर्ष आणि नात्यांमधील अतिशय गहन भावनिक गुंतागुंत या सर्व गोष्टींकडे टागोर यांचा पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला  ‘दृष्टिदान’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळणार आहे. आपले मराठी प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हा एक उत्सुकतेचा विषय आहे. एका तरु ण दिग्दर्शकाने साकारलेली स्वातंत्र्यपूर्व काळातील ही एक अनोखी प्रेमकथा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट