अगदी मोजक्या व्यक्तिरेखा, ठरावीक ठिकाणी घडणारे मुख्य प्रसंग, कुठलेही फिल्टर नाहीत किंवा व्हीएफएक्स वगैरेच्या मदतीने रंगवलेला थरार नाही आणि तरीही एका छोट्या कथाबीजाच्या आधारे पाहणार्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल, असा चित्रपटही प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करू शकतो. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘दृश्य अदृश्य’ हा असा साधीसरळ मांडणी असूनही रंजक अनुभव देणारा चित्रपट आहे.
‘दृश्य अदृश्य’ या नावावरून भास-आभासाचा खेळ, काहीतरी वेगळीच मानसिक गुंतागुंत असलेली थरारकथा असावी, असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात, आपल्या जवळची, आजूबाजूची कुठलीही व्यक्ती अशा विचित्र परिस्थितीत सापडू शकते. आपल्या जिवलगांबरोबर आनंदाने वेळ घालवताना अचानक कुठलातरी जोराचा धक्का बसावा आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जावं, असा अनुभव देणार्या प्रसंगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. तन्वी प्रधान ही सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी तरुणी.
तन्वीचा नवरा त्याच्या कंपनीच्या कामानिमित्ताने महाबळेश्वरमध्ये आहे. त्याच्या वाढदिवसाला तरी आपण एकत्र असावं, या विचाराने तन्वी आपल्या मुलीला छोट्या ईशाला घेऊन महाबळेश्वरमध्ये तिने ठरवलेल्या हॉटेलवर येऊन पोहोचते. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ईशा गायब आहे हे तिच्या लक्षात येतं. ती सगळीकडे शोधते, मात्र ईशाचा पत्ता लागत नाही. तिथले कर्मचारी मात्र तन्वी हॉटेलवर मुलीबरोबर नव्हे तर एकटीच आली होती, असं सांगत हा गोंधळ आणखी वाढवतात. ईशा आपल्याबरोबर हॉटेलमध्ये आली हे सिद्ध करणारी एकही गोष्ट तन्वीला सापडत नाही.
तन्वी किंवा हॉटेलचे कर्मचारी दोघांपैकी कोणीतरी खोटं बोलतं आहे, पण नेमकं कोण खोटं बोलतं आहे? समोर दिसणार्या पुराव्यांवरून तरी पोलिसांना तन्वीवरच संशय येतो. त्यातच तिच्या नवर्याचाही शोध लागत नाहीये. खर्याखोट्याचं हे कोडं कसं सुटतं? तन्वी खरं बोलते आहे की तिला भास होत आहेत? या सगळ्याची हळूहळू उकल करत जाणारी रंजक कथा ‘दृश्य अदृश्य’ या चित्रपटात पाहायला मिळते.
तन्वी, तिची आई, तपास करणारे दोन पोलीस अधिकारी आणि हॉटेलचे मालक-कर्मचारीवृंद अशा मोजक्या व्यक्तिरेखांचा वापर करून दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी हे कथानक खुलवले आहे. कथा-पटकथा लेखन आणि दिग्दर्शन तिन्हींची जबाबदारी एकाच व्यक्तीने सांभाळली असेल, तर चित्रपटाचं कथानक कितीही गुंतागुंतीचं असलं तरी कागदावरची कथा आणि पडद्यावर दिसणारी कथा यात एकवाक्यता आढळते. ‘दृश्य अदृश्य’मध्ये हे प्रभावीपणे जाणवतं. दिग्दर्शक म्हणून मिलिंद लेले यांनी याआधी ‘बंदीशाळा’, ‘कुरुक्षेत्र’, ‘एबी आणि सीडी’ सारखे चित्रपट केलेले आहेत.
त्यामुळे त्यांचं अनुभवी दिग्दर्शन जाणवल्याशिवाय राहात नाही. कुठेही अनावश्यक व्यक्तिरेखा किंवा प्रसंगांना फाटे फोडत चित्रपटाची लांबी वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. नाही म्हणायला कथेला ज्या व्यक्तिरेखेमुळे वळण मिळतं तिची रचना फार काही उत्कंठा वाढवणारी नाही. एकदा कथेतला खलनायक लक्षात आला की मग मुख्य व्यक्तिरेखा त्याला शेवटापर्यंत कसं आणणार? हीच प्रक्रिया पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक दिग्दर्शकाने खूप उशिराने कथेतली ही खलनायकी व्यक्तिरेखा कोणाची हे गुपित उलगडलं आहे. त्यामुळे तोवर पुढे काय घडणार आहे, याविषयीची उत्कंठाही टिकून राहते.
चित्रपटाची अगदी साधी मांडणीही प्रभावी ठरली आहे. विनाकारण ॲक्शन दृश्यांना यात फाटा देण्यात आलेला आहे. एक हतबल आई, दु:खाने खचलेली पत्नी त्या परिस्थितीतून काय मार्ग काढेल, याचं वास्तवाच्या जवळ जाणारं चित्रण यात असल्याने कुठेही हे कथानक अतिशयोक्त वाटत नाही. आणि तिचा त्या अचानक आलेल्या संकटावर मात करण्याचा प्रवासही पाहावासा वाटतो.
अभिनेत्री पूजा सावंत हिने यात तन्वी प्रधानची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. तिने खूप सहजतेने अवघड परिस्थितीत अडकलेल्या आईची भूमिका साकारली आहे. मुख्य पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत अभिनेता अशोक समर्थ उठून दिसतात. हार्दिक जोशीसारख्या चांगल्या कलाकाराने इतक्या छोटेखानी भूमिका करण्याचं प्रयोजन काय हे लक्षात येत नाही. अक्षया गुरव, सुव्रत जोशी यांच्यासह अन्य कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. मात्र, कुठलाही भव्यतेचा सोस न करता, आटोपशीर आणि सरळसाध्या कथानकाला योग्य वळण देत सादर केलेला चांगला चित्रपट म्हणून पाहता येईल.
दिग्दर्शक – मिलिंद लेले
कलाकार – पूजा सावंत, अशोक समर्थ, सुव्रत जोशी, अक्षया गुरव, हार्दिक जोशी.
