इंडिया आणि खरा भारत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र त्याची प्रखरतेने जाणीव करून देण्याचा प्रयत्न अनेकदा सिनेमासारख्या कलात्मक मांडणीतून केला जातो. ग्रामीण भागाशी नाळ जोडले गेलेले लेखक – दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि उत्तम कलाकार एकत्र आले तर कित्येकदा गावाकडच्या म्हणून सोडून दिलेल्या गोष्टीही किती महत्त्वाच्या असतात याची जाणीव करून देणारी कलाकृती अनुभवायला मिळते. ‘गाभ’ या शब्दाचा अर्थही अनेकांना माहिती नसताना, ती प्रक्रिया मुळात किती महत्त्वाची आहे. प्राण्यांमधील प्रजननाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने मानवी नात्यांमधले ताणेबाणे-गुंतागुंत यावर खूप सहज भाष्य करणारा ‘गाभ’ हा अत्यंत वेगळा अनुभव आहे.

लेखक – दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी ‘गाभ’ चित्रपटातून एक महत्त्वाचा विषय तरलतेने आणि संवेदनशीलतेने मांडला आहे. म्हशीच्या पोटात गर्भधारणा होण्याची प्रक्रिया म्हणजे गाभ टाकणे. गावाकडे दुधदुभतं हवं म्हणून म्हैस पाळली जाते. म्हशीचा उपयोग अधिक. ती दूधही देते आणि पुढची पिढीही जन्माला घालते. त्या तुलनेत रेड्याचा उपयोग शून्य. त्याचा शेतीसाठीही काही उपयोग होत नसल्याने म्हशीला रेडकू झालं तर त्याचा खाटकाकडे बळी दिला जातो, मात्र त्यामुळे गावागावात रेड्यांची संख्या कमालीची आटली आहे. म्हैस माजावर आली की ती गाभण राहावी यासाठी तिला रेडा लावावा लागतो. हा रेडा मिळवण्यासाठी गावच्या गाव पालथं घालावं लागतं, त्यासाठी पैसे मोजावे लागतात. एकीकडे आपल्या फायद्यासाठी प्राण्यांचा वापर करून घेणारा माणूस त्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या नैसर्गिक जाणिवांचा अव्हेर करतो, त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतो. सगळा खेळ फक्त व्यवहाराचा… कोल्हापूरकडच्या एका गावात म्हैस माजावर आली की रेड्याच्या शोधासाठी होणारी वणवण, तिला इंजेक्शन टोचून अनैसर्गिक पद्धतीने गाभ टाकण्याचा प्रयत्न करत तिच्या शरीरस्वास्थ्याशी केला जाणारा खेळ या सगळ्या घटना मध्यवर्ती ठेवत एक उत्तम प्रेमकथा गुंफण्याचा प्रयत्न ‘गाभ’ या चित्रपटात अनुप जत्राटकर यांनी केला आहे.

Ishq Vishk Rebound movie directed by Nipun Avinash Dharmadhikari
मैत्री आणि प्रेमाचा जांगडगुत्ता
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
actor Darshan confessed borrowing money to destroy evidence in fan murder case
चपलेने मारलं, पुरावे नष्ट करण्यासाठी मित्राकडून घेतले उसने पैसे अन्…; चाहत्याच्या खून प्रकरणात अभिनेत्याने दिली कबुली
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
It has been announced that famous actor Anil Kapoor will host Bigg Boss 3 OTT instead of Salman Khan
‘सलमानची जागा कोणीच घेऊ शकत नाही’
kalki 2898 ad movie review prabhas overshadowed by towering amitabh bachchan
पटकथेत फसलेला भव्यपट
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

हेही वाचा >>>Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावरील अर्धवटराव व आवडाबाईचा डान्स पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे वास्तव समस्येची मांडणी करताना माणसाचं आणि प्राण्यांचं नातं यावर लेखक-दिग्दर्शकाने भाष्य केलं आहेच. मात्र नात्यांचा हाच धागा कथेतील मुख्य व्यक्तिरेखा दादू (कैलास वाघमारे) आणि त्याचं त्याच्या वडिलांशी, आजीशी असलेलं नातं, त्यांच्या नात्यातील गुंतागुंत याच्याशी सहज सुंदर पद्धतीने जोडून घेतला आहे. वडिलांकडे पैसे नसल्याने आपलं शिक्षण अर्धवट राहिलं याचा राग दादूच्या मनात आहे. दादूच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे, पण त्याबद्दलही सतत चिडचिड करणारा दादू शेतीत मन रमवतो आहे. त्याच्या आजीने म्हशीसाठी लावलेला लकडा त्याला मान्य नाही. तरीही आजीच्या आग्रहाखातर तो तिला म्हैस आणून देतो. मात्र त्यानंतर एकापाठोपाठ एक वेगाने घटना घडत जातात. गावात फक्त फुलवा आणि तिच्या वडिलांकडे रेडा आहे. वडिलांचा रेडा लावायचा व्यवसाय फुलवा समजून घेते आणि स्वत: करायलाही लागते, मात्र समाजात या व्यवसायाला मान्यता नाही. त्यात फुलवासारख्या तरुणीने हा व्यवसाय केला म्हणून समाज तिच्या नावाने बोटं मोडत राहतो. तिच्याशी लग्नाला कोणी तयार होत नाही. दादूची म्हैस आणि फुलवाचा रेडा यामुळे हे दोघंही एकत्र येतात. त्यांच्यातली प्रेमकथाही साधीसोपी नाही. त्यांच्या नात्यालाही अनेक पदर आहेत. या सगळ्याची सुरेख सांगड ‘गाभ’ चित्रपटात पाहायला मिळते.

‘गाभ’ची मांडणी करताना अनुप जत्राटकर यांनी चित्रपटातल्या दोन मुख्य व्यक्तिरेखा सशक्तपणे लिहिल्या आहेत. दादूचा स्वभाव, त्याची भूमिका आणि त्यामागे असणारी अनुभवाची, विचारांची चौकट जितकी ठोस आहे. तितकीच कुठलाही व्यवसाय कमी नसतो, म्हणत रेडा लावणारी आणि सन्मानाने पैसे कमावण्यासाठी धडपडणारी फुलवाची व्यक्तिरेखाही वरवर आक्रमक वाटली तरी अत्यंत प्रगल्भ आहे. आपल्याला व्यवसायासह मानाने स्वीकारणारा जोडीदार हवा हा ठाम आग्रह घेऊन जगणारी फुलवा प्रेमाचा स्वीकार करतानाही खूप विचाराने नातं सावरताना, जपताना दिसते. फुलवाची भूमिका सायली बांदकर या नवोदित अभिनेत्रीने केली आहे. चेहऱ्यावर किमान रंगभूषा आणि कमाल सहज अभिनयातून सायलीने फुलवाची भूमिका तिच्या ठसक्यासह झोकात साकारली आहे. दादूची भूमिका अभिनेता कैलास वाघमारे यांनी केली आहे. कैलास उत्तम अभिनेता आहे हे याआधीच्या त्यांच्या भूमिकांमधून त्यांनी सिद्ध केलं आहे. पण स्वतंत्रपणे पूर्ण लांबीच्या मुख्य भूमिकेत त्यांना पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. कैलास यांनी त्यांच्या सहजशैलीत दादूची व्यक्तिरेखा समजून-उमजून साकारली आहे. या दोघांबरोबरच फुलवाच्या वडिलांच्या भूमिकेत उमेश बोळके, किसन हेडीच्या भूमिकेत चंद्रशेखर जनवाडे, दादूचा मित्र जन्याची भूमिका साकारणारे विकास पाटील, आजी झालेल्या वसुंधरा पोखरणकर या सगळ्याच नव्या-जुन्या कलाकारांनी कमाल केली आहे. अतिशय हलकी-फुलकी, काहीशी ग्रामीण ढंगातली, पण आक्रस्ताळी नसलेली मांडणी आणि वडील-मुलगा, प्रियकर-प्रेयसी, मित्र-मित्र असे नात्यातील ताणेबाणेही कथेच्या ओघात अलवारपणे उलगडण्याचा केलेला प्रयत्न यामुळे ‘गाभ’ हा चित्रपट लक्ष वेधून घेतो. ठरावीक साचे वापरण्याचा मोहच झालेला नाही असं नाही, पण पूर्णपणे ग्रामीण बाजात साकारलेला असल्याने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तरी हा चित्रपट रंजक अनुभव देण्यात आणि वेगळा विषय मांडण्यात कमी पडत नाही.

गाभ

दिग्दर्शक – अनुप जत्राटकर

कलाकार – कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके.