काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनिमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.
प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. कथा एका महत्त्वाकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे.
दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे.
संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
