सिनेमा, सौजन्य – 
‘विटी-दांडू’ या सिनेमातून आजोबा-नातू यांच्या माध्यमातून आजच्या बच्चेकंपनीला निसर्गाच्या सान्निध्यात राहून नदीत डुंबणे असो, झाडावर चढणे असो की रानोमाळ भटकणे असो, विस्मृतीत गेलेल्या अशा अनेक खेळांची गंमत पडद्यावरून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी चित्रपटांची संख्यात्मक आणि दर्जात्मक वाढ झपाटय़ाने होते आहे असे म्हणण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हिंदी चित्रपटांना तोडीस तोड टक्कर देत ‘टाइमपास’, ‘दुनियादारी’ या चित्रपटांनी गल्लापेटीवर अमाप यश मिळवून दाखविले. वेगळ्या वाटेवरचे ‘फॅण्ड्री’, ‘पितृऋण’, ‘नारबाची वाडी’, ‘सौ. शशी देवधर’ असे अनेक चित्रपट येऊन गेले. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतही एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील चित्रपटांची संख्याही लक्षणीय झाली आहे. त्याचप्रमाणे ‘७२ मैल एक प्रवास’, ‘नारबाची वाडी’ यांसारख्या चित्रपटांतून विशिष्ट काळातील कथानके रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्नही मोठय़ा प्रमाणावर केला जातोय.
‘पीरिएड फिल्म’ या चित्रपट प्रकाराला अलीकडच्या काळात मराठी-हिंदी आणि एकूणच भारतीय चित्रपटांमध्ये अग्रक्रम मिळताना दिसतो आहे. ‘विटी-दांडू’ हा चित्रपट ‘पीरिएड फिल्म’ या चित्रपट प्रकारातलाच आहे; परंतु चित्रपटाची सुरुवात आजच्या काळात होते आणि मग संपूर्ण चित्रपट ‘फ्लॅशबॅक’मध्ये घडतो.
‘विटी-दांडू’ या शीर्षकामुळे कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. विटी-दांडू हा खेळ हल्लीची बच्चेकंपनी खेळत नाही; परंतु ज्या लोकांनी हा खेळ आवडीने खेळला असेल त्यांना शाळुसोबत्यांबरोबर विटी-दांडू खेळण्याच्या मजेची आठवण मात्र चित्रपटाच्या शीर्षकामुळे नक्कीच जागी होईल.
दिग्दर्शक गणेश कदम यांच्याशी गप्पा करताना त्यांनीही विटी-दांडू शीर्षकाबद्दल सांगितले की, विटी-दांडू हा खेळ काय असतो, हे आजच्या बर्गर-पिझ्झाच्या जमान्यातील बच्चेकंपनीला दाखविणे याचा एक प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे; परंतु हाच केवळ चित्रपटाचा विषय नाही. चित्रपटाच्या छायाचित्रामधूनच आजोबा-नातू यांच्यातील नात्यावर चित्रपट आहे हेही वाचकांना त्वरित समजते. परंतु लोकप्रिय आजोबा दिलीप प्रभावळकर आहेत आणि त्यांचा ‘टिपरे..’मधील नातू साकारणारा विकास कदम या चित्रपटाचा लेखक आहे यामुळेही चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण न झाली तरच नवल.
चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना विशद करताना दिग्दर्शक गणेश कदम म्हणाले की, आजच्या काळातील आजोबा-नातवंडे यांचे नाते आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील आजोबा-नातवंडे यांचे नाते यात काळानुरूप खूप बदल झाले आहेत. चित्रपटाच्या पटकथेतून हे नाते उलगडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आजची बच्चेकंपनी झाडावर चढणे, मातीत खेळणे, विटी-दांडू, गोटय़ा, लगोरी, एवढेच काय लंगडीसारखा खेळही खेळताना दिसत नाही. मैदानी खेळांमध्ये फक्त क्रिकेट खेळतात. जुन्या काळातील मुले निसर्गाच्या सान्निध्यात सगळे खेळ खेळायची. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय सुदृढ वातावरणात गेले. एवढेच नव्हे तर त्याचा त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असायचा. निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी आज मुलांना नेचर कॅम्पला जावे लागते. नातू-आजोबा यांच्या माध्यमातून आजच्या बच्चेकंपनीला विस्मृतीत गेलेले खेळ, निसर्गाच्या सान्निध्यात राहून नदीत डुंबणे असो, झाडावर चढणे असो, रानोमाळ भटकणे असो, त्यातील गंमत पडद्यावरून दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. गोविंद नावाचा लहानगा आपल्या आजोबांना कसे जपतो, आजोबा त्याला कसे जपतात, देशप्रेम हा त्यांच्यातील समान धागा कसा असतो, याबाबत चित्रपट भाष्य करतो. छोटय़ा गोविंदची ही भूमिका निशांत भावसार या बालकलाकाराने साकारली आहे. त्याशिवाय शुभंकर अत्रे, राधिका देवरे ही कलावंत बच्चेकंपनीही यात आहे. तसेच मृणाल ठाकूर, यतीन कार्येकर, विकास कदम, रवींद्र मंकणी, गौहर खान यांच्याही भूमिका असलेल्या चित्रपटाचे संवादलेखन अभिराम भडकमकर यांनी केले आहे.
या ‘पीरिएड फिल्म’ची निर्मिती नीना देवरे यांची असून मालवण, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. कोकणचे निसर्गदर्शन यात पाहायला मिळणार असून एप्रिलच्या मध्यावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार आहे, असे गणेश कदम म्हणाले.