सायफाय, नातेसंबंध आणि दुष्काळ

फेब्रुवारी महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीत हालचाल झाली ती ‘पोश्टर गर्ल’ आणि ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस् सदाचारी’ या दोन चित्रपटांमुळेच.

मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने मराठी सिनेमांसाठी तसे हॅपनिंग असतील. वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षकांसाठी हिंदी सिनेमांसह मराठीतही पर्याय उपलब्ध होणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीत हालचाल झाली ती ‘पोश्टर गर्ल’ आणि ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस् सदाचारी’ या दोन चित्रपटांमुळेच. बाकी महिना तसा शांततेत गेला. ‘एक होती राणी’, ‘बाबांची शाळा’ या संकल्पना चांगल्या असूनही त्यातून फारसं काही हाताला लागलं नाही. तर ‘पोश्टर गर्ल’ आणि ‘..सदाचारी’ या दोघांनी जेमतेम यश मिळवलं. ‘पोश्टर गर्ल’ची चर्चा बरीच झाली, पण ‘पोश्टर बॉईज’मध्ये असणाऱ्या निखळ करमणुकीची त्यात कमतरता जाणवत होती. काहीशा उपहासात्मक पद्धतीने जाणाऱ्या कथेत उगाच उपदेशात्मकपणा आणला की काय होतं; त्याचे ‘पोश्टर गर्ल’ चांगलंच उदाहरण म्हणावं लागेल. तर ‘सदाचारी’ने थेट दाक्षिणात्य सिनेमाची केलेली कॉपीदेखील फार काही खास नव्हती. मूळ दाक्षिणात्य कथानकाला मराठी बाज यावा म्हणून दिलेली शिवाजी महाराजांची जोड रुचणारी नव्हती. त्यातच वैभव तत्त्ववादी अशा भूमिकांमध्ये शोभत नाही हे तर कळलेच, पण प्रार्थनाही अजून कॉफीतच अडकली आहे की काय असे वाटते.

असो, मार्चमध्ये मात्र ही निराशा दूर होण्याची बरीच अपेक्षा आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीपासून पुढे ढकलण्यात आलेले ‘फुंतरु’ आणि ‘अनुराग’ एकाच दिवशी म्हणजे

११ मार्चला प्रदर्शित होत आहेत. तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळवलेला ‘रंगा पतंगा’ एक एप्रिलला येत आहे. त्याचबरोबर डिजिटल रूपांतर झालेला ‘पिंजरा’ १८ मार्चला पुन:प्रदर्शित होत आहे ही नोंद घेण्याची बाब आहे.

सायफाय वर्गात मोडणाऱ्या ‘फुंतरू’ने उत्सुकता बरीच ताणली आहे. तरुणांच्या भावविश्वाला हात घालणारे अनेक चित्रपट आपल्याकडे यापूर्वी आले आहेत, पण इंजिनीअिरगच्या विद्यार्थ्यांच्या जगण्यातील एक वेगळा बेफिकीरपणा, सायन्स फिक्शनला प्रत्यक्षात आणण्याची ओढ असं बरंच काही या चित्रपटातून प्रथमच मराठीत रुपेरी पडद्यावर येत आहे. स्वत: दिग्दर्शक सुजय डहाकेने इंजिनीअिरगचं जग एक वर्ष जवळून पाहिलेलं असल्यामुळे त्याच्यात दडलेला इंजिनीअर काय करतोय हे पाहणं रंजक असेल. त्यातच इरॉससारख्या मोठय़ा स्टुडिओचा निर्मिती प्रक्रियेत प्रथमपासूनच असलेला सहभागदेखील महत्त्वाचा आहे. इरॉसमुळे आर्थिक बाबी, प्रमोशन, वितरण या बाबतीतला व्यावसायिकपणाचा फायदादेखील या चित्रपटाला मिळत असल्याचे सुजय स्वत:च सांगतो. तुलनेने सुजयच्या आधीच्या ‘शाळा’ आणि ‘आजोबा’मध्ये त्याला या निर्मिती आणि निर्मितीनंतरचे काम या दोन्ही घटकांकडे बरेच लक्ष द्यावे लागले होते.

‘फुंतरु ’ अशा विचित्र नावात नेमकं काय दडलंय, हाच प्रश्न प्रथम निर्माण होतो. त्याबाबत सुजय सांगतो की, ‘फुंतरु’ ही आपल्याकडे काही ठिकाणी गॅरेजमध्ये वापरली जाणारी संकल्पना. (एखादं हत्यार मागताना चार नंबरचा फुंतरु दे असं म्हटलं जातं). थोडक्यात काय तर एक उपकरण, ज्याच्या माध्यमातून काहीतरी साध्य करता येतं, उलगडता येतं. तर दक्षिणेत फुंतरूचा थेट अर्थ वेडा माणूस (म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीच्या नादाने नादवलेला) असाच असल्याचे सुजय सांगतो. चित्रपटातील विद्यार्थी कलाकार मदन देवधर हा केतकीवर खूप प्रेम करत असतो, पण ती त्याच्यावर प्रेम करत नसते. सौंदर्याच्या दोघांच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. तिला प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्नातून ग्रे शेडमध्ये घडणारी आजची प्रेमकथा दाखविणारी कॉलेजवयीन फॅण्टसी म्हणजे फुंतरु असे सुजयचे मत आहे. त्यासाठी त्याने केलेला हा सायफाय प्रयोग आहे.

सुजयमध्ये दडलेल्या इंजिनीअरला यापूर्वीच्या चित्रपटात वाव नव्हता, तो नेमका येथे मिळाला आहे. इंजिनीअिरगच्या विद्यार्थ्यांमध्ये असणारा वेडेपणा, तांत्रिक करामतीच्या माध्यमातून फॅण्टसीच्या रूपात नेमका कसा बाहेर पडतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला असल्याचे तो सांगतो. तर त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध, अवलंबित्व, कोण कोणावर हावी होतंय का अशा अनेक घटकांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे तो सांगतो.

चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणजे कलाकाराने दिलेले अनेक लूक्स आणि या सगळ्यासाठी घेतलेला व्हीएफएक्सचा आधार. यापूर्वीच्या आजोबामध्ये सुजयने व्हीएफएक्सचा आधार केवळ दहा मिनिटांसाठी घेतला होता, पण ‘फुंतरु’चा उत्तरार्धातील एक तास व्हीएफएक्सने व्यापला आहे. अर्थात मोठी स्टारकास्ट नसल्यामुळे मर्यादित खर्चातदेखील हे शक्य झाले आहे. ‘फुंतरु’मध्ये वापरलेल्या तांत्रिक बाबीबद्दल तो म्हणतो की फॅण्टसीतलं तंत्रज्ञान कालांतराने बऱ्याच वेळी प्रत्यक्षात येत असतं. तसेच आर्टििफशिअल इंटेलिजन्सवर आधारित या तंत्रावर जगात अनेक ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. ‘फुंतरु’मध्येदेखील हाच प्रयत्न आम्ही केल्याचे तो नमूद करतो.

आजच्या तरुण पिढीचे नातेसंबंध सायफायच्या माध्यमातून उलगडण्याचा हा प्रयत्न पाहतानाच दुसरीकडे ११ मार्चला येणारा ‘अनुराग’ नातेसंबंधांना थेट खुल्या निसर्गाच्या कॅनव्हासवर नेताना दिसतो. ‘अनुराग’ची कथा म्हटलं तर नेहमीचीच, तरीदेखील काहीशी वेगळ्या वाटेने जाणारी म्हणावी लागेल. पण कथेची मांडणी हा त्यातील महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल. दोनच कलाकार आणि पाश्र्वभूमीला थेट १८ हजार फुटांवरील अफाट उंत्तुंग असा हिमालय. तोदेखील लडाखमधला. बर्फाच्छादीत शिखरं, त्याचबरोबर उजाड बोडके आणि तरीदेखील विविधरंगी डोंगर असं हे अनोखं कॉम्बिनेशन चित्रपटाच्या कथेला वेगळे परिमाण मिळवून देईल असे सध्यातरी ट्रेलरवरून जाणवते. अर्थातच मृण्मयी देशपांडे आणि धर्मेद्र गोहिल यांनी मांडलेला हा नातेप्रवास नेमका कसा आणि काय काय वळणं घेतो हे चित्रपट पाहिल्यानंतरच जाणवेल.

‘अनुराग’च्या बाबतीत एक मात्र आवर्जून मांडावे लागेल, ते म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मृण्मयीने निर्मितीत केलेलं पदार्पण. मृण्मयी क्रिएशन या स्वत:च्या बॅनरखाली तिचा हा निर्मिती प्रवेश भविष्यात आणखीन काहीतरी चांगले पाहायला मिळण्याची नांदी म्हणता येईल. तसेच इंग्लड, जर्मनी येथे या चित्रपटाचे खास प्रयोग करण्याचा एक नवीन प्रयोग दिसून आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या प्रवासात मैलाचा दगड मानल्या गेलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा.’ समाजाच्या सर्वच स्तरात गौरवलेला हा चित्रपट १८ मार्चला पुन:प्र्र्रकाशित होतोय तो डिजिटली माध्यमात परावर्तित होऊन. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या दर्जेदार अभिनयाने सजलेला आणि व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाने साकारलेला हा चित्रपट नव्या ढंगात पाहणं हे नक्कीच उत्तम स्मरणरंजन तर ठरेलच, पण मल्टिप्लेक्सच्या जमान्यातील पिढीलादेखील एक दर्जेदार कलाकृती अनुभवता येईल.

वडील आणि मुलामधल्या नात्यांचा एक हळुवार बंध उलगडणार आहे तो १८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘वेल डन भाल्या’ या चित्रपटातून. मुलाच्या शिक्षणाबरोबरच त्याच्या छंदाला, त्याच्यात दडलेल्या, काहीतरी करू पाहणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला, एक वडील कशा प्रकारे जोपासतात, त्याला पाठिंबा देतात हा प्रवास यात दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी केला आहे. संजय नार्वेकर यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे, तर नंदकुमार सोलकर याने मुलाची. रमेश देव, अलका कुबल, मिताली जगताप, गणेश यादव, शरद पोंक्षे अशी बरीच स्टारकास्ट यात आहे.

त्यानंतर एक एप्रिलला येणारा ‘रंगा पतंगा’ हा सर्वानाच अंर्तमुख करणारा एक उत्तम चित्रपट पाहायला मिळणारा आहे. दुष्काळी भागात थेट लोकेशनवरचे चित्रण, उपलब्ध असलेल्या आहे त्याच प्रकाशाचा वापर आणि जोडीला मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, नंदिता धुरी अशा दर्जेदार कलाकारांचा अभिनय यामुळे एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद हा चित्रपट देण्याची अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट म्हणून आधीच गौरव झालेला असल्यामुळे त्याबद्दल चांगलीच उत्सुकता लागलेली आहे.

रंगा पतंगाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. पहिल्याच प्रयत्नात वास्तववादी चित्रपटाला हात घालणं जरा अवघडच असतं. अशा वेळी निर्मिती खर्चापासून, कलाकार वगैरे सारे सांभाळणं तसं कठीणच. त्याबद्दल प्रसाद नामजोशी सांगतात की, मी जे काही आजवर शिकलो, काम केलं त्यातूनच हा चित्रपट साकारला आहे. चित्रपट गोष्ट सांगणारा हवा, त्यात रंजकता हवी आणि त्याचबरोबर तो वास्तववादीदेखील अशीच माझी धारणा आहे. पैसे देऊन दोन तास चित्रपटगृहात येणाऱ्यांचे पैसे सार्थकी लागले पाहजेत हे उद्दिष्ट तर असतेच, पण म्हणून चित्रपट लोकशरण देखील होता कामा नये हा माझा प्रयत्न राहिल्याचे ते आवर्जून नमूद करतात. अर्थातच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांनी आणि परदेशी ज्युरींनी दिलेली दाद पाहता, प्रसाद नामजोशींना जे हवं ते साध्य झालं असं म्हणायला हरकत नाही.

दुष्काळात होरपळणाऱ्या एका शेतकऱ्याची ही कथा. त्याची हरवलेली बैलजोडी शोधण्यासाठी मकरंद आणि संदीप पाठक या दोघांनी आठ दिवसांचा रानोमाळ केलेला प्रवास यात रेखाटला आहे. मात्र ते करताना एकाच वेळी अनेक संदर्भ घेत आम्ही दुष्काळाची तीव्रता, मीडियाची भूमिका, राजकारण, अंधश्रद्धेवर भाष्य अशा अनेक घटकांची मांडणी यात केली असल्याचे प्रसाद नामजोशी सांगतात. इतकेच नव्हे तर दुष्काळी पर्यटनाचा विषय आणि गोवंश हत्या बंदीसारख्या आज झालेल्या कायद्यावरदेखील त्यांनी दोन वर्षांपूर्वीच टिप्पणी केली आहे.

मकरंद अनासपुरे यांचे सध्या दुष्काळी भागाबाबत काम सुरू असताना हा चित्रपट येणे हा योगायोग म्हणावा लागले. खरं तर दोन वर्षांपूर्वीच हा चित्रपट चित्रित झाला आहे. मकरंदच्या आजवरच्या भूमिकांना थेट छेद देणारी अशी भूमिका यात आहे. पण मकरंदच्या आत दडलेला एक  संवेदनशील माणूस आणि कलाकार डोळ्यासमोर ठेवूनच ही भूमिका बेतली आहे आणि त्यात मकरंदने पूर्ण जीव ओतला आहे असं प्रसाद नामजोशी सांगतात. दुष्काळाची तीव्रता थेट जाणवावी म्हणून ठरवूनच अकोला जिल्ह्य़ातील मूर्तीजापूर तालुक्यातील दुष्काळी गाव निवडले आहे. व्हॅनिटी व्हॅनसारख्या कोणत्याही सुखसोयीच्या सुविधा नसतानादेखील तब्बल ४८ डिग्री तापमानात झालेले हे चित्रीकरण थेट अंगावर येणारे आहे असे ट्रेलरवरून जाणवते. त्याच वेळी त्या पीडित शेतकऱ्यांचा आत्मशोध आणि प्रेक्षकांचादेखील आत्मशोध अशी सांगड जमल्याचं दिग्दर्शकाचं मत आहे. अर्थात अशा चित्रपटांसाठी खर्च करायला निर्माते काहीसे उदासीन असतात, पण अमोल गोळेनी अतिशय उत्साहाने धडपड केल्यामुळे चित्रपट पूर्ण करणं शक्य झाल्याचं प्रसाद नामजोशी नमूद करतात. वास्तववादी मांडणी करायची असली तरी तो एक चित्रपट आहे भान न सोडता मला जे आवडतंय, जे उत्तम आहे ते मांडणारा चित्रपट साकारल्याचे दिग्दर्शक सांगतात.

त्यानंतर येणारा वृंदावन सध्या बराच चर्चेत आहे. अशोक सराफ, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे, मोहन जोशी, भारत गणेशपुरे, आरती सोळंकी, उदय टिकेकर अशी बरीच मोठी स्टारकास्ट असणारा आणि कौटुंबिक मालमसाला या सदरात मोडणारा दाक्षिण्यात दिग्दर्शक टीएलव्ही प्रसाद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. सध्या अनेक प्रमोशनमधून झळकतोय. मध्यंतराच्या बऱ्याच काळानंतर अशोक सराफ रुपेरी पडद्यावर दिसतील. अर्थात त्यांच्या नेहमीच्या पठडीतल्या विनोदी भूमिकेच्या बाहेरची ही भूमिका कशी असेल याची उत्सुकता नक्कीच आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @joshisuhas2

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चित्रवार्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi movies