पूर्वी दर २५-३० वर्षांनी पिढीबदल होत असे. ही आत्ता आत्तापर्यंतची गोष्ट होती. पण नव्वदीच्या दशकानंतर पिढीबदलातील हे अंतर झपाट्यानं कमी कमी होऊ लागलं. आता तर दर पाच वर्षांनी एक पिढी मोडीत निघते. आणि हा भयंकर वेग आजच्या पन्नाशी-साठीच्या पिढीला झेपेनासा झालेला आहे. तो स्वीकारणं तर दूरच. किंबहुना बघता बघता आपण कालबाह्य झालो आहोत हे सत्य पचवणं प्रत्येेक पिढीला तसं अवघडच जात असतं… आता तर त्याची कबुली देण्याइतपतही अवसर मोडीत निघणार्या पिढीला मिळेनासा झाला आहे. यावर साहित्य, कला, तसंच आर्थिक-सामाजिक क्षेत्रांत सतत विचारमंथन होत असतं. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असते.
पिढी-दर पिढी ही आपल्या आचार-विचारांनी कायमच बंडखोरी करत असते. आणि आधीची पिढी त्यावर कधी त्राग्याने, तर कधी नाइलाजाने या नव्या बदलांशी, विचार-आचारांशी पुढच्या काळात जुळवूनही घेत असते. या बदलांचा आणि पिढीगत संस्कृतीचा वेध घेणारं एक खुसखुशीत आणि त्याचवेळी अंतर्मुख(ही) करणारं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलेलं आहे… ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ अमोल पाटील लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित हे नाटक प्रचलित चाकोरीबाहेरील विषयावरचं आहे, हे प्रथमच मान्य करायला हवं… म्हणजे नाटकातून नवरा-बायकोतील नात्याबद्दलच्या त्याच त्या दळणाला यात फाटा मिळाल्यामुळे मनापासून हुश्श वाटलं. आणखीन एक गोष्ट म्हणजे एका गंभीर विषयाला आपण हात घालतो आहोत असा आव न आणता अत्यंंत हसत खेळत हा विषय या नाटकात मांडला गेला आहे. त्याला दिलेली ट्रीटमेंटही नेहमीपेक्षा वेगळी आहे… प्रेक्षकाला बांधून ठेवणारी आहे.
मालती आणि मधुकर गणपुले हे पुण्यातील कर्मठ सदाशिव पेठेत राहणारं जोडपं. मकरंद हा त्यांचा मुलगा. सगळ्या मध्यमवर्गीय माणसांचं जे स्वप्न असतं, तेच या जोडप्याचंही आहे. मुलाला भरपूर शिकवून परदेशात पाठवायचं. अर्थात ते मकरंद पुरं करतो. तो परदेशी जायला निघतो. पण जाताना त्याचे आई-बाबा त्याला ठणकावून बजावतात : तिथे गेल्यावर आपली संस्कृती विसरायची नाही. तिथल्या मुलीशी लग्न करायचं नाही. आम्ही बघून देऊ त्याच मुलीशी लग्न करायचं… म्हणजे मग आपली संस्कृती शाबूत राहील.
मुलगा सगळ्या गोष्टी कबूल करतो. पण तिथं गेल्यावर एका जर्मन मुलीच्या (गुंडा) प्रेमात पडतो. तिला आपले आई-वडील स्वीकारतील असं त्याला वाटतं. पण कर्मठ विचारांचे त्याचे आई-वडील या जर्मन सुनेला स्वीकारायला तयार होत नाहीत. आमच्याशी याउप्पर कसलेेही संबंध ठेवायचे नाहीत असं ते त्याला बजावतात. मकरंद निरुपाय होऊन बायकोला घेऊन इंग्लंडला परततो. अर्थात तोही हट्टी आई-बापाचाच मुलगा असल्याने तोसुद्धा त्यांच्याशी संबंध तोडून टाकतो. इकडे आई-बाप मुलाच्या या वागण्याने खंतावतात. पण त्यांचा ईगोही तितकाच तीव्र असतो. ते इकडे नव्वदीच्या दशकातील दूूरसंपर्क क्रांतीमुळे परिचय झालेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मुलगा आणि सुनेला रोज बघत असतात, पण त्यांच्या मनातील अहंपणा गेलेला नसल्याने ते मुलाशी संपर्क साधत नाहीत.
मात्र, एक दिवस असा येतो, की आईला मुलाच्या कुटुंबाचा फोटो पाहून राहवत नाही. ती त्या फोटोला ‘लाईक’ करते… आणि मग त्यांच्यातील विसंवादाची भिंत क्षणभरात कोसळून पडते. ते व्हच्र्युअल विश्वात मुलाशी संवाद साधू लागतात. मुलालाही आपल्या आई-वडलांची ओढ, प्रेम कुरतडत असतंच. तो लगेचच त्यांना लंडनला बोलावून घेतो. त्याप्रमाणे मधुकर-मालती जातात. पण त्या वेगळ्या संस्कृतीशी, तिथली राहणी, खाण्यापिण्याशी जुळवून घेणं मालतीला शक्य होत नाही. विशेषत: सुनेच्या खाद्यसंस्कृतीशी! ती मला आपलं आपलं परतीचं तिकीट काढून दे म्हणून मकरंदच्या मागे टुमणं लावते. मधुकरला मात्र तिथं राहायचं असतं. तिथली संस्कृती अनुभवायची असते. मकरंदची मुलगी मोना आता विशीची झालेली असते. ती पुढील शिक्षणासाठी फ्रान्सला जायचं ठरवते. मकरंद आणि गुंडा (मकरंदची बायको) तिला जायची परवानगी देतात. तद्नंतर इकडे मकरंद आईला पोहोचवायला पुण्यात आलेला असतानाच कोविडच्या भयंकर साथीनं सगळं जगच ठप्प होतं आणि तो इथेच अडकूून पडतो. वडील आणि मकरंदची बायको गुंडा तिकडे लंडनला असतात. मुलगी फ्रान्सला.
या अस्मानी सुलतानीपुढे कुणाचंच काही चालत नसल्यानं आहे ती वस्तुस्थिती स्वीकारण्यावाचून कुणालाच गत्यंतर नसतं. तिकडे गुंडाही मधुकरच्या कारनाम्यांनी हैराण झालेली असते. पण करणार काय?
मोनाला एकदा व्हिडीओ फोन लावलेला असताना तिच्याबरोबर एक अरब तरुण असल्याचं मकरंद आणि गुंडाला दिसतं. त्यामुळे ते हैराण होतात. मोनाला झडझडून जाब विचारतात. ती त्यांना खूप समजवायचा प्रयत्न करते. पण मकरंदला आपल्या मुलीनं आपले संस्कार आणि संस्कृती मातीमोल केली असं वाटून तो डोक्यात राख घालून घेतो. यामुळे मोनाचाही पारा चढतो. ती त्यांच्याशी संबंधच तोडूून टाकते. फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरेही बंद करून ठेवते. त्यामुळे मकरंद आणि गुंडा हवालदिल होतात.
ज्या तर्हेने मकरंद आपल्या आई-वडलांशी २० वर्षांपूर्वी वागला होता, तीच वेळ त्याच्या मुलीनं त्याच्यावर आणलेली असते. आणि आता तो स्वत: आपल्या वडलांच्या भूमिकेत गेलेला असतो. इतिहासाची पुनरावृत्ती झालेली असते…
लेखक अमोल पाटील यांनी तीन पिढ्यांचा हा संघर्ष अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीनं मांडला आहे. हे करताना कृृतक गांभीर्याचा आव न आणता त्यांंनी वस्तुस्थिती हसत खेळत मांडली आहे. त्याकरता त्यांनी आभासी तंत्रज्ञानाचा आणि जुन्या आख्यानरूपाचा साधन म्हणून वापर केला आहे; जेणेकरून पिढीतलं अंतर प्रस्थापित होईल. त्यांनी मनुष्यस्वभाव आणि त्यातील खाचाखोचांचा अत्यंंत सफाईनं उपयोग केला आहे. पिढीगणिक बदलणारी संस्कृती त्यांनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, व्यवहारांतून दाखवली आहे. संस्कृतीच्या लादलेपणातून काय होतं हेही त्यांनी पिढीबदलाच्या संघर्षात दाखवून दिलं आहे. प्रत्येक पिढीची आपली एक भाषा असते याचं भानही त्यांनी राखलं आहे. त्यांतलं वेगळेपण त्यांनी तपशिलांनिशी पेरलं आहे.
दिग्दर्शक अद्वैत दादरकर हे प्रत्येक नाटकासरशी अधिकाधिक पक्व होताना दिसतात. या नाटकाची जातकुळी प्रचलित नाटकांपेक्षा वेगळी आहे हे त्यांनी बिनचूक हेरलं आहे. त्यामुळेच निरनिराळ्या संस्कृतीतून आलेली माणसं, त्यांची भाषा, रहनसहन, पेहराव, वर्तन व्यवहारांतून वेगळी दिसली/ भासली पाहिजेत याचं उचित भान त्यांनी नाटकभर ठेवलं आहे. एक- उघडा शेख झालेल्या व्यक्तीचा अपवाद! अखेेरीस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचा कोलाज दाखवून त्यांनी नाटकाचा आशय अप्रत्यक्षरीत्या अधोरेखित केला आहे. परंतु त्यामुळेच हे पात्र व्यंगचित्रात्मकतेकडेही झुकलं आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तिरेखा ठाशीवपणे उभी करण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. त्यासाठी त्यांचे स्वभावविभाव, लकबी, बोलणं, वर्तन यांच्यात एक सुसंगती राहील हे त्यांनी पाहिलं आहे. विशेषत: गुंडा या पात्रावर त्यांनी खूपच काम केलं आहे. मात्र, मधुकर या पात्राच्या वर्तनात उत्तरार्धात झालेला १८० डिग्री बदल थक्क करणारा आहे. हे सगळं करत असताना रंजनाचा धागाही सुटू नये याचीदेखील खबरदारी त्यांनी घेतली आहे. गुंडाच्या आवाजातलं ‘या चिमण्यांनो, परत फिरा’ हे गाणं नाटकाचा कळसाध्याय ठरावं.
नाटकाचा प्रारंभ काहीसा कृत्रिम नोटवर होतो खरा, पण त्यानंतर नाटक आपल्या अंगभूत गतीनं विस्तारत जातं आणि त्यातलं कृत्रिमपण गळून पडतं. मात्र, एकुणात नाटक एक वेगळा, रंजक, पण अंतर्मुख करणारा अनुभव देऊन जातं, हे नक्की. विशेषत: देशातील आजच्या संकुचित, धर्मांध वातावरणाने विषाक्त बनलेल्या पार्श्वभूमीवर हे विशेषत्वानं जाणवतं.
संदेश बेन्द्रे यांनी सदाशिव पेठेतील मालती-मधुकरचं घर आणि लंडनमधील मकरंदचं घर यांतील फरक नेपथ्यातून उत्तमरीत्या दाखवला आहे. फक्त मोनाचं वास्तव्य दर्शवणारा कोपरा याला अपवाद आहे. अमोल फडके यांनी प्रकाशयोजनेतून घटना-प्रसंगांतील मूड्स ठळक केले आहेत. सौरभ भालेराव यांचं संगीत नाटकाच्या आशयाला तोलून धरणारं आहे. श्वेता बापट यांनी प्रसंगानुकूल वेशभूषा केली आहे.
सगळ्या कलाकारांची चोख कामं हे या नाटकाचं अर्धंअधिक यश निश्चित करतं. सुनील बर्वे यांनी कर्मठ विचारांचा सदाशिवपेठी मधुकर गणपुले साक्षात उभा केला आहे. त्यांचं तिरकस, थेट बोलणं, मध्यमवर्गीय शामळूपणा आणि उत्तरार्धात लंडनला गेल्यावर झालेलं त्यांचं मन आणि मतपरिवर्तन त्यांनी लीलया दाखवलं आहे. अधेमधे सूत्रधार कम् आख्यानकाची उत्तम गायनी कळाही त्यांनी प्रत्ययकारी केली आहे. हर्षदा खानविलकर खूप वर्षांनी रंगमंचावर अवतरल्या आहेत, पण त्या आपलं मूळ पीच विसरलेल्या नाहीत याचा प्रत्यय त्यांची मालतीची भूमिका पाहताना येतो. पुणेरी खुसपट काढणं, नवर्यावर दाब ठेवणं, मात्र मूलत: आपल्या अंतरंगातली आई हळूच उसळून येणं… या खुबी त्यांनी सहजतेनं दाखवल्या आहेत. मकरंद झालेले अक्षर कोठारी यांनी आपली भूमिका समजून उमजून केली आहे.
गुंडा झालेल्या शर्मिला शिंदे यांनी जर्मन युवतीचं वागणं, बोलणं, वावरणं, भाषा, त्यातली शब्दफेक, सर्वांगानं व्यक्त होणं यावर भरपूरच काम केलंय. त्यामुळेच त्या या भूमिकेला पूर्णपणे न्याय देऊ शकल्या आहेत. त्यांचं ‘या चिमण्यांनो…’ हे गाणं तर ‘वन्स मोअर’चा पुकारा करतं, यातच सगळं आलं. मोना झालेल्या वैष्णवी आंबवणे यांनी दोन संस्कृतींच्या चिमट्यात सापडलेल्या मुलीचा आक्रोश उत्कटतेनं प्रकट केला आहे. परदेशी जन्मलेल्या भारतीय मुलांची घुसमट त्यातून उफाळून येते. शंतनू ढवळी यांनी अरब शेखचं सोंग उत्तम वठवलंय. एकुणात, सगळ्या पिढ्यांना आरसा दाखवणारं हे नाटक एकदा तरी नक्कीच बघायला हवं.
