अलीकडे लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध निर्माण करायचे आणि नंतर काखा वर करून त्या मुलीला सोडून द्यायचं असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतात. कधी कधी तर अशा मुलीचे वा स्त्रीचे या प्रकारातील सहभागाचे व्हिडीओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडतात. अब्रूच्या भीतीने त्याविरुद्ध त्या मुलीला वा स्त्रीला आवाजही उठवता येत नाही किंवा पोलिसांतही जाता येत नाही. आणि हे पक्कं माहीत असल्यानं त्यांचं आणखीनच लैंगिक शोषण होत राहतं. अशी मुलगी किंवा स्त्री मग आपली बेअब्रू आणि कुटुंबीयांच्या भवितव्याच्या भीतीनं आत्महत्येचा शेवटचा मार्ग पत्करते. आणि जे पुरुष या गोष्टी करतात, ते मात्र उजळ माथ्याने समाजात वावरत राहतात… ही आपल्या समाजाची मोठीच शोकांतिका आहे. या विषयाला आजवर कुणी नाटकांतून फारसा हात घातलेला नव्हता. पण संदीप दंडवते लिखित-दिग्दर्शित ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाने हा भीषण विषय रंगभूमीवर आणला आहे.

अरुण पिंपळकर यांची आई, पत्नी रमा, मुलगी तन्वी आणि मुलगा चिराग असं छोटेखानी सुखी कुटुंब आहे. मुलगी तन्वीचं लग्न ठरलंय… अंकुर नावाच्या मुलाशी. लग्नाला पंधरा दिवस उरलेत. घरात लगीनघाई सुरू आहे. आणि अशात तन्वी एक नको तो प्रकार करून बसते. आपण मोठीच चूूक केलीय ही रुखरुख त्यामुळे तन्वीचं मन कुुरतडून खात असतंच.

आणि अशात चिराग घरी येऊन एक बॉम्ब फोडतो… ‘तन्वीच्या ‘त्या’ प्रकाराची क्लिप व्हायरल झाल्याचा’! या बातमीने सगळं घरच हादरतं. तन्वीला त्याबद्दल खडसावून जाब विचारला जातो. तिला नको नको ते बोल लावले जातात. आता ही क्लिप घराघरांत पोहोचेल आणि लोक आपल्याकडे कशा नजरेनं बघतील, या भीतीनंच घरातले सारे हवालदिल होतात. घराबाहेर पडायची त्यांना भीती वाटायला लागते. तन्वीलाही हा जबरदस्त धक्का असतो. कारण तिच्या नकळत ही क्लिप काढली गेलेली असते. आणि ती अंकुरनंच व्हायरल केली असणार याची तिला खात्री पटते. ती त्याबद्दल जाब विचारायला त्याला फोन करते, पण त्याचा फोन सतत स्विच्ड् ऑफ लागतो. याचा अर्थ काय, ते घरचे समजून चुकतात.

आता पुढे काय? दोघांचं ठरलेलं लग्न झटपट उरकून लोकांची तोंडं बंद करणं हाच एकमेव उपाय उरलेेला असतो. पण अंकुरचे वडील लग्नाआधीच नको त्या प्रकरणात गुंतलेल्या आणि त्यापायी आधीच बदनाम झालेल्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावून द्यायला साफ नकार देतात. त्यांंच्या या नकारामुळे तन्वी आणि पिंपळकर कुटुंब पार उद्ध्वस्त होतं. कुणाला काहीच सुचत नाही. मुलीनं आपल्यावर कोणती पाळी आणलीय… या विचारानं रमा आणि अरुण दोघंही कोलमडून जातात. चिराग तर बहिणीला डोळ्यांसमोरही धरायला तयार नसतो. सगळ्यांंच्या अंगातलं त्राणच जातं. आता पुढे काय? आपलं काय होणार? आणि आपण यातून कसे बाहेर पडणार? …विचार करकरून डोकं फुटायची वेळ सर्वांवर येते. उद्ध्वस्त झालेली तन्वी गळफास लावून घ्यायचा प्रयत्न करते. तो असफल झाल्याने रात्री घराबाहेर पडून आत्महत्येचाही विचार करते. यामुळे तरी आपल्या कुटुंबाची बदनामीतून सुटका होईल असं तिला वाटतं…

आता पुढे काय…? हा प्रश्न आ वासून सगळ्यांसमोर उभा ठाकतो. अगदी प्रेक्षकांसमोरही!
सध्याच्या घडीला या ज्वलंत समस्येचा कसा सामना करायचा, हा भीषण प्रश्न फसवल्या गेलेल्या अशा मुली/स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावताना दिसतो. अशा पीडित कुटुंबाच्या पाठीशी कुणीही उभं राहत नाही. त्या मुलीचं/स्त्रीचं आयुष्य आणि भवितव्य पार उद्ध्वस्त होतं. अशा कुटुंबाला समाजाकडून वाळीत टाकलं जातं.

पण या समस्येवर मार्ग काय? समाजाची यासंबंधातील जुनाट मनोवृत्ती कधी आणि कशी बदलणार? एखाद्या मुलीकडून अशी चूक घडली तर तिला आणि तिच्या कुटुंबाला एवढी मोठी शिक्षा? समाज म्हणून आपण त्या प्रकाराकडे हिणकस दृष्टीनं पाहणार. आणि अशा क्लिप मात्र आपण चवीनं चघळत पाहणार? मग हे कृत्य करणारा पुरुष आणि आपल्यात फरक तो काय उरतो? जो पुरुष हे कृत्य करतो त्याला मात्र त्याबद्दल काहीच शिक्षा होत नाही… अशा अनेकानेक प्रश्नांच्या गुंत्याभोवती हे नाटक फिरतं. अर्थात यावर एक उपाय आहे… पण तो त्या कुटुंबाच्या बदनामीसह त्यांचं उभं आयुष्य पणाला लावणारा आहे.

लेखक-दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी या नाटकाद्वारे सद्य:कालीन एका गंभीर समस्येला हात घातला आहे, हे निश्चित. या समस्येचे सगळे पैलू जरी यात हाताळले गेले नसले तरी त्यासंबंधांत बर्‍यापैकी मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. पण एक गोष्ट… ही समस्या जरी गंभीरपणे मांडली गेली असली तरी नाटकाच्या लेखनातलं काहीसं कच्चेपण मात्र दुर्लक्षिता येत नाही. पिंपळकरांच्या घरातलं हसतं खेळतं वातावरण दाखवताना त्यात सहजतेपेक्षा कृत्रिमता अधिक जाणवते आणि म्हणूनच ती खटकते.

तथापि एकदा का समस्येला तोंड फुटल्यावर घरातलं वातावरण संपूर्णतया बदलतं. ते स्वाभाविकही आहे. तन्वीच्या घराची कोंडी आणि त्यांची असह्य घुसमट यथार्थपणे नाटकात दाखवली गेली आहे. परंतु यातल्या दोन गोष्टी खटकतात : नातीने सांगितलेली लग्नाअगोदरची ‘ती’ घटना आजी ज्या सहजतेनं स्वीकारते, ते! आणि तन्वी अपरात्री घरातून निघून जाताना पाहूनही रमा तिला अडवत नाही, हे! या खरं तर ॲब्नॉर्मल गोष्टी आहेत. म्हणजे एक क्षण असं म्हणता येईल, की तन्वीनं जीव दिला तर घराची सुटका होईल, हा विचार किंचितक्षण रमाच्या मनात आला असेलही; नाही असं नाही. परंतु कुठली आई आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडणार्‍या मुलीला अडवल्याशिवाय राहील? तर ते असो.

बाकी उत्तरार्धात अरुण पिंपळकर ज्या तर्‍हेनं मुलीला या संकटाला सामोरं जाण्यासाठी सिद्ध करतात, ती धीरोदात्तपणाची कसोटी आहे. आणि हीच काळाची खरीखुरी गरज आहे. त्यातील बारकावे लेखकानं उत्तम टिपले आहेत. एकुणात नाटकात हाताळलेला विषय ज्वलंत आहे आणि त्याला संदीप दंडवते समर्थपणे भिडले आहेत… लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही! अशा संकटात सापडलेल्या कुटुंबाची हतबलता आणि त्यातून येणारी निष्क्रियता त्यांनी यथास्थित मांडली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कणखरतेची आणि धैर्याची या कुटुंबाला किती निकड आहे, हेही नाटकात पुरेपूर ठसतं.
संदेश बेंद्रे यांनी अरुण पिंपळकर यांचं प्रशस्त घर वास्तवदर्शी उभं केलं आहे.

ओपन किचन, बेडरूम, लिव्हिंग रूममध्ये पात्रांना हालचालींसाठी पुरेशी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. समीर म्हात्रे यांच्या पार्श्वसंगीतातून नाटकांतर्गत ताण चांगलाच निर्माण होतो. रत्नकांत जगताप यांच्या प्रकाशयोजनेतून दिवसाचे विविध प्रहर आणि त्यावेळच्या प्रसंगांतील ताणतणाव ठळकपणे अधोरेखित होतात. राजेश परब यांची रंगभूषा आणि अमृता काकतकर यांची वेशभूषा नाटकाची मागणी पुरविणारी.

डॉ. गिरीश ओक यांनी प्रा. अरुण पिंपळकर यांचा भारदस्तपणा, त्यांचं घरातलं सहज वावरणं आणि तन्वी प्रकरणाने त्यांचं कोसळून पडणं… आणि त्यानंतर मोठ्या कष्टानं हिंमत गोळा करून या संकटाला कणखरपणे सामोरं जाणं… हा सगळा प्रवास त्यांंनी प्रत्ययकारी केला आहे. त्यांची अवघी देहबोलीच त्यांची मन:स्थिती दर्शवते. रमा झालेल्या सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी टिपिकल गृहिणीचं वागणं, बोलणं, प्रसंगपरत्वे व्यक्त होणं अत्यंंत सहजतेनं दाखवलंय.

तन्वी प्रकरणानं त्यांना बसलेला धक्का आणि त्यांचं कोमासदृश स्थितीत जाणं पटण्याजोगंच. तरीही या संकटाविरुद्ध लढायला पाहिजे हे तिचं म्हणणं रमा ‘त्या’ धक्क्यामुळे नीटपणे व्यक्त करू शकत नाही. मात्र, अरुण पिंपळकरांच्या कृतीतून तो मार्ग सापडल्यावर तिला आपला आवाज गवसतो. ऐश्वर्या शेटे यांनी तन्वीची भूमिका उत्तम साकारली आहे. एक साधीसुधी मुलगी होणार्‍या पतीच्या एका विशिष्ट मागणीच्या बहकाव्यात येऊन एक चूक करून बसते आणि तिच्यासह सगळ्या कुटुंबाचं भवितव्य काळंकुट्ट होतं. याच्या परिणामांतून जातानाची तिची भावनिक आंदोलनं ऐश्वर्या शेटे यांनी उत्कटपणे व्यक्त केली आहेत. हा सारा भयाण भावनिक, मानसिक प्रवास त्यांनी शब्दश: जिवंत केला आहे. जान्हवी पणशीकर यांनी बोबड्या आजीच्या अंतरंगातील भावभावना मुद्राभिनयातून दाखविल्या आहेत. आकाश पाटील यांनी तन्वीचा भाऊ चिरागची कुतरओढ छोट्या भूमिकेतही नेमकेपणानं दाखविली आहे.
वर्तमानकाळातील एक भीषण समस्येचं हे रौद्र रूप निश्चितच भयावह आहे.