गेल्या १०-१२ वर्षांत आपल्याकडे उठसूठ कुठल्याही गोष्टीनं भावना दुखवायचा कंड अधिकाधिक जोमाने फोफावताना दिसतो. एवढ्या तेवढ्या कारणावरून कुणाच्याही- कुठल्याही व्यक्ती, समाज आणि गटाच्या भावना दुखावतात. आणि सरकारही त्या कथित भावना दुखावण्यास धार्जिणे असल्याने त्या मोठ्या प्रमाणात दुखावतात. धर्मनिरपेक्षतेकडून बहुसंख्याकवादाकडे आपली वाटचाल सुरू असल्याने संकुचिततावाद, तथाकथित अस्मिता, अन्याय, इतिहासाचं ओझं अशा नाना कारणांनी हे घडतं आहे. त्यामुळे विचारी, संवेदनशील लोक दिड़्मुढ झालेले आहेत. आपलं तेवढंच खरं, दुसर्याचं काहीएक ऐकून घ्यायचंच नाही, ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे.
देशाचं चरित्र आणि चारित्र्य बदलण्याचा घाट संकुचिततावादी लोकांनी घातला आहे. आणि मुकी बिचारी, अस्तित्वाच्या आणि केवळ स्वप्रगतीच्या लढाईत गुंतलेली जनता त्याला बळी पडते आहे. याबद्दल साहित्यातून हळूहळू काही मंडळी व्यक्त होत आहेत खरी, पण तो आवाज अगदीच क्षीण आहे. अशात या देशाचं पुुढे काय होणार, मूढमती जनता जागी होणार की नाही, हा प्रश्न संवेदनशील मनांना पडला आहे. याच विषयाला हात घालणारं ‘बोलविता धनी’ हे हृषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित एक अप्रतिम नाटक नुकतंच रंगभूमीवर आलेलं आहे.
या विषयाचा साकल्याने विचार व भाष्य त्यात मांडलेलं आहे. अशा प्रकारे भावना दुखावण्याच्या घटना भूतकाळात घडत नव्हत्या असं नाही, पण त्या हाताळण्याची सर्वसंबंधितांची सहिष्णु, समजूतदार वृत्तीही त्याकाळी दिसून येत असे. परंतु आज हे सगळंच हिंसेच्या, संबंधितांस संपवण्याच्या पातळीपर्यंत गेलेलं आहे. आणि हीच खरी अतिशय चिंतेची बाब आहे. तशात लोकांचा मूक पाठिंबा अशा दुष्प्रवृत्तींना मिळतो आहे ही त्याहूनही चिंताजनक बाब आहे. तर ते असो. या नाटकाचं कथानक दोन पातळ्यांवर फिरतं. नाटकातलं नाटक हा फॉर्म अतिशय लीलया यात वापरण्यात आलेला आहे.
एका चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना दोन-चार गुंड त्या ठिकाणी येतात आणि शूटिंग बंद करण्यास फर्मावतात. कारण काय, तर म्हणे चित्रपटातील खलनायकाने फुलांचा गुच्छ पायदळी तुडवला. त्यामुळे अखिल भारतीय फूलविक्रेते चिडले. त्यांच्या भावना दुखावल्या. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला- डीकेला फुलं पायदळी तुडवल्यामुळे कुणाच्या भावना कशा दुखावतात हेच मुुळी कळत नाही. तो शूटिंग बंद करण्यास नकार देतो. मग कुणा एका आमदाराकरवी आधी त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. तोही असफल झाल्याने नंतर पोलिसांकरवी दबाव आणण्याचा प्रयत्न होतो. त्यालाही डीकेनं दाद न दिल्याने डीकेच्या तोंडाला काळं फासून त्याला मारहाणही करण्यात येते. या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ झालेला दिग्दर्शकाचा असिस्टंट दिनकर ‘असे प्रकार पूर्वीही घडलेत, परंतु त्यावेळच्या लोकांनी ते आपल्या परीने कसे हाताळले हे वानगीदाखल ‘सं. शारदा’चं उदाहरण देऊन युनिटला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचे पणजोबा किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रॉम्प्टर म्हणून काम करत असताना घडलेला हा प्रकार…
त्यावेळची नाटक मंडळी, तिथले व्यवहार, नाटकाबद्दलची त्यांची पॅशन, नाटककार गो. ब. देवल यांचा दबदबा, त्यांच्या जरठ-बालविवाहावरील ‘सं. शारदा’ या नाटकावर सरकारकडून आलेला आक्षेप, समाजात त्यावरून उठलेला गदारोळ आणि संस्थानिकांकडून त्याला झालेला विरोध, लोकमान्य टिळकांनी या नाटकासंबंधात घेतलेली भूमिका, तद्पश्चात बरीच भवती न् भवती होऊन जरठ-बालविवाहबंदीचा झालेला ‘शारदा’ कायदा… हा सगळा इतिहास दिनकर साक्षात कथन करतो.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पणजोबांचे नट होण्याचे वेड आणि त्यांच्या नाटक कंपनीतील असफल प्रेमकहाणीचीही नाटकास जोड मिळते. त्यावेळच्या कलावंतांचा आपल्या कलेशी प्रामाणिक राहत समाजविरोधाला सामोरं जाण्याचा दृढनिश्चय आणि आज ती परिस्थिती पार बदलल्याने टोकाच्या हिंसक विरोधापुढे कलावंतांनी गलितगात्र होणं… या परस्परविरोधी बाबी दिनकर सगळ्यांसमोर ठेवतो. अशात चित्रपटाचा निर्माता आणि संबंधित कलाकारही गुंडगिरीने झालेल्या या विरोधापुढे घाबरून माघार घेतात.
तेेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शकासमोर चित्रपट बंद करण्यावाचून दुसरा मार्ग उरत नाही. पण त्याचवेळी त्याला नाटककार गो. ब. देवल यांचे धीरोदात्त शब्द आठवतात आणि त्याला प्रेरणा देतात. …आणि तो फिरून या आव्हानाचा सामना करायला सज्ज होतो. त्या घाबरट, वाढलेल्या वयाच्या, पण कथित नाववाल्या कलावंताच्या जागी आपल्या हरहुन्नरी, अननुभवी, पण पॅशनेट असिस्टंटला- दिनकरला उभं करून चित्रपट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा तो दृढनिश्चय करतो.
हृषिकेश जोशी यांनी एका महत्त्वाच्या विषयाला या नाटकाने वाचा फोडली आहे. सध्या हुळहुळ्या झालेल्या भावनांशी कसा सामना करायचा याचा मार्ग त्यांनी या नाटकातून दाखवला आहे. त्यासाठी जुना काळ आणि आजचा काळ, तत्कालीन वृत्ती-प्रवृत्ती, त्यांना सामोरे जायचे मार्ग यांची चिकित्सा त्यांनी यात केली आहे. त्याकरता नाटकातलं नाटक हा फॉर्म त्यांनी निवडला आहे आणि त्यास सर्वतोपरी न्याय दिला आहे.
संगीत नाटकांचा काळ, त्यावेळचं नाटक कंपनीतलं वातावरण, तिथलं राजकारण, माणुसकीचे व्यवहार, समाजमानस, प्रथा-परंपरेला हात घालणार्या नाटकास होणारा सर्वच स्तरांतील विरोध, त्याचा खमका प्रतिकार करणारे कलावंत… हा सगळा माहोल लेखक-दिग्दर्शकाने साक्षीत्वाने साकारला आहे. त्यांतले बारीकसारीक तपशील त्यांनी नाटकात खुबीने पेरले आहेत. त्याकाळची माणसं त्यांच्या विविध वृत्ती-प्रवृत्तीसह त्यांंनी उभी केली आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या काळातील भावना दुखावण्याचे तथाकथित आव्हान, त्यातले खाचखळगे, त्यातली हिंसकता त्यांनी यथातथ्य मांडली आहे. या सगळ्यातून एक साक्षात्कारी नाटक त्यांनी रचलं आहे.
मनोरंजन आणि प्रबोधनाचं असं दुहेरी शिवधनुष्य लेखक-दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी समर्थपणे पेललं आहे. व्यक्तिरेखाटन, प्रसंगरचना, त्यांतील गुंतागुंत आणि त्यांचा समन्वय त्यांनी अप्रतिम साधला आहे. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचे यातले योगदान शंभर टक्के आहे आणि ते खरोखरीच प्रशंसनीय आहे. प्रकाशयोजनाही त्यांचीच आहे आणि ती परिणामकारक झाली आहे. प्रदीप पाटील यांनी नेपथ्यातून काळबदल आणि त्यातले समांतर दुवे छान साधले आहेत. अजित परब यांचं पार्श्वसंगीत नाटकाचं वातावरण खुलवणारं आहे. राजेश परब यांची रंगभूषा आणि मयुरा रानडे यांची वेशभूषा काळाचे संकेत पकडणारी आहे. नाटकाच्या निर्मितीमूल्यांत त्याने भरच पडली आहे.
‘बोलविता धनी’तले सगळेच कलावंत अत्यंंत चपखल आहेत. क्षितीश दाते यांनी दामोदर आणि दिनकर या भूमिकांत आपलं सर्वस्व ओतलं आहे. एक प्रतिभावान कलावंत त्यांच्या रूपात रंगभूमीला मिळाला आहे यात शंका नाही. दोन्ही भूमिकांचे लहानसहान कंगोरे त्यांनी सुंंदररीत्या खुलवले आहेत. डीके आणि शंकरराव मुजुमदार या दोन विभिन्न भूमिकांत ओंकार कुळकर्णी भावभावनांचे असंख्य आरोह-अवरोह ताकदीनं पेलताना दिसतात. संग्राम साळवी यांनी नाटककार गो. ब. देवल यांचं करारी, भारदस्त लेखकीय व्यक्तिमत्त्व उत्तम साकारलं आहे.
पार्वती झालेल्या मयुरा रानडे लाघवी व्यक्तिमत्त्वासह वावरल्या आहेत. रमाच्या भूमिकेत सिमरन सैद भावभावनांचे तरंग उमटविण्यात यशस्वी झाल्या आहेत. अजिंक्य पोंक्षे हे रामा डवरी या पात्रात गाण्यातील आपल्या प्रभुत्वाने लक्षणीय ठरतात. निरंजन जावीर भाऊराव आणि तात्याराव सांगवीकर या दोन्ही भूमिकांत छाप पाडून जातात. सागर यार्दी (चिंतोबा/ टिळक/ नेता), प्रद्युम्न गायकवाड (कार्यकर्ता/ पांडू/ मुलीचा बाप), परमेश्वर गुट्टे (हरी/ डांगे वकील/ मॅनेजर जेरे), सिद्धेश देऊलकर (विष्णू), दीपक गोडबोले (भिलाजी/ मॅनेजर/ नातेवाईक) आणि निलेश गांगुर्डे (हवालदार) या सर्वांनीच आपापल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. सद्य:परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारं ‘बोलविता धनी’ हे कुणीही चुकवू नये असं नाटक आहे यात बिलकूल शंका नाही.

