अलीकडच्या काळात नवरा-बायकोच्या नात्यावरील नाटकांचं एवढं पेव फुटलं होतं, की मराठी लेखकांना दुसरा विषयच सुचत नाही की काय असं वाटावं. पण आता परिस्थिती बदलू लागलीय. हळूहळू समाजात भेडसावर्णा या अन्य विषयांवरचीही नाटकं येऊ लागलीयत. ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’, ‘करुणाष्टके’, ‘सांगा, कसं जगायचं?’, ‘आता थांबवायचं कसं?’, ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’, ‘ॲनिमल’, ‘मी अश्वत्थामा… चिरंजीव’… प्रत्येक नाटकागणिक नवनवे विषय हाताळले जात आहेत. हे मराठी रंगभूमीच्या दृष्टीनं सुलक्षण आहे. मराठी रंगभूमीला प्रागतिक का म्हटलं जातं, हे यावरून सिद्ध होतं. या मालिकेत आणखीन एक नाटक समाविष्ट होतंय… ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ लेखक- सुदीप मोडक. दिग्दर्शक- नीरज शिरवईकर. सायकोथेरपीवर आधारित हे नाटक एका वेगळ्याच मुद्द्याकडे लक्ष वेधतं.
डॉ. अतुल मांकड हा प्रख्यात सायकिॲट्रिस्ट. पण स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असूनही पत्नीच्या अकाली निधनाने नैराश्यग्रस्त होऊन तो क्लिनिक बंद करायला निघालेला असतो. यादरम्यान त्याची एक सो-कॉल्ड एलिट मैत्रीण राधिका जोशी त्याच्याकडे बर्याच वर्षांनी येते. ती बहुधा कुठलं तरी काम घेऊनच आली असणार हा अतुलचा कयास बरोबर निघतो. ती सध्या ऑस्ट्रेलियन सायबर सेलची भारतातील प्रमुख अधिकारी असते. आणि त्याचकरता तिला अतुलची मदत हवी असते. भारतातील पेन्शनरांच्या फंडावर सायबर चाचे डल्ला मारणार असल्याची खबर त्यांना मिळालेली असते आणि त्यांचा हा बेत हाणून पाडण्यासाठी त्या दहशतवाद्यांचा हॅक कोड ‘क्रॅक’ करण्यासाठी मंगेश गायकवाड या हॅकर तरुणाची मदत तिला हवी असते. परंतु मंगेश ड्रग ॲडिक्ट असल्याने तुरुंगाची हवा खात असतो. त्याला या कामासाठी राजी करण्यासाठी तिला अतुलची मदत हवी असते. ती तुरुंगात मंगेशची भेट घेते आणि याकामी आपल्याला सहकार्य करावं असं त्याला विनवते. त्याकरता शासनातले आपले सोर्सेस वापरून त्याची सुटका करण्याचं आश्वासन ती त्याला देते. पण ड्रगसाठी आसुसलेला मंगेश तिला प्रथम तर उडवूनच लावतो. पण नंतर तिने आपल्याला ड्रग पुरवल्यास तिचं म्हणणं ऐकण्याचं तो कबूल करतो. मंगेशला या ड्रग्जच्या विळख्यातून सोडवून तिला आपल्या सायबर सेलसाठी त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायचं असतं. तिथे त्याला लठ्ठ पगाराची नोकरी देऊन आयुष्यात स्थिरस्थावर करण्याचं आमिष ती त्याला दाखवते. पण ड्रग्जच्या जाळ्यात अडकलेल्या मंगेशला याच्याशी काही घेणंदेणं नसतं. म्हणूनच त्याला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी राधिकाला अतुलची मदत हवी असते. अतुल शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतो, पण तिला आपण प्रॅक्टिस थांबवत असल्याने दुसर्या डॉक्टरांची नावं सुचवतो. परंतु तिनं आधीच सगळे पर्याय चाचपलेले असतात. आणि अतुलशिवाय दुसरा कुणीही मंगेशला ताळ्यावर आणू शकणार नाही, या निष्कर्षाप्रत ती आलेली असते. मंगेश धारावीतला आहे असं राधिकाच्या बोलण्यात येतं आणि मग कसलाही विचार न करता अतुल त्याला भेटायला तयार होतो.
मग सुरू होतो मनोरुग्ण मंगेश आणि डॉ. अतुल यांच्यातील संघर्ष. सुरुवातीला मंगेश त्याला बिलकूल दादच देत नाही. त्यांच्यातील झकाझकी टोकाला पोहोचते. पण अतुल मानसोपचारांत ‘मास्टर’ असल्याने मंगेशला कसं हाताळायचं हे त्याला चांगलंच माहीत असतं. मात्र घाई करणार्या राधिकाचा दबाव त्याला मान्य नसतो. मंगेशच्या कलानं घेत त्याला ताळ्यावर आणायला हवं, असं अतुलचं म्हणणं असतं. पण मंगेश अतुलकडे यायला टाळाटाळ करतो, तेव्हा अतुलच त्याच्या वस्तीत जाऊन त्याला त्याच्याच भाषेत समजवायचा प्रयत्न करतो. अतुलला धारावीतली रफ भाषा कशी येते, त्याला इथले आपले गुंड मित्र कसे माहीत, असा प्रश्न मंगेशला पडतो. तेव्हा मीही याच धारावीत लहानाचा मोठा झालोय हे अतुल मंगेशला सांगतो तेव्हा कुठे तो अतुलचं ऐकायला तयार होतो.
राधिका मंगेशला ऑस्ट्रेलियाला नेण्यासाठी घाई करत असते, पण मंगेश तोवर लापता होतो. ती सगळीकडे त्याचा शोध घेते, पण त्याचा अतापता लागत नाही, तेव्हा ती अतुलला शरण जाते. अतुल तिला घेऊन धारावीत जातो. आणि…
लेखक सुदीप मोडक यांनी मानवी प्रतिभा, सर्जनशीलता आणि तिचा आविष्कार हा देश-काल-परिस्थितीच्या पल्याड असतो आणि प्रतिभेला मानवी प्रज्ञा आणि करुणेची जोड मिळाली तरच ती सार्थकी लागते, हे वास्तव या नाटकातून मांडायचा प्रयत्न केला आहे. म्हटलं तर हे सायकोथेरपीवरील नाटक आहे, आणि म्हटलं तर ते जीवनविषयक तत्त्वज्ञानावरचंही आहे. त्याची मांडणी एकरेषीय नाही. गुंतागुंतीची आहे. उच्च आणि मध्यमवर्गीय जाणिवांना छेद देणारी ही कलाकृती आहे. त्यामुळे ती पाहताना सर्वसामान्य प्रेक्षकांना धक्का बसण्याचीही शक्यता आहे. यातले राधिका, अतुल आणि मंगेश हे उच्च, मध्यम आणि कनिष्ट वर्गांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात अंतर्विरोध आढळतो. त्यांच्यातील संघर्ष हा या नाटकाचा आत्मा आहे. आणि लेखक सुदीप मोडक यांनी तो तपशिलांत रचला आहे. त्यांनी यातली प्रमुख पात्रं ठसठशीतपणे चित्रित केली आहेत. त्यांच्यातले व्यवहार, संघर्ष उत्तरोत्तर कळसाप्रत जातो. मंगेशच्या धारावीतील पार्श्वभूमीने नाटकाला एक वेगळंच परिमाण मिळतं. मानवी अस्तित्व आणि त्याचं प्रयोजन याबद्दल नाटक काहीएक भाष्य करू पाहतं. राधिकाच्या रूपात त्यातील विसंगती समोर आणतं. अतुल आणि मंगेश तसंच राधिका यांचा जगण्याकडे पाहण्याचा आपापला भिन्न दृष्टिकोन हा नाटकाचा केंद्रबिंदू आहे.
दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी नाटकाची जातकुळी ओळखून त्याच्या सादरीकरणाची रचना केली आहे. नाट्यांतर्गत संघर्षाचे क्षण त्यांनी ठळक केले आहेत. पात्रांचे दृष्टिकोन, त्यांच्यातील परस्परविरोध त्यांनी अचूक टिपला आहे. संहितेतील आशयावर त्यांनी जोर दिलेला दिसतो. मात्र, नाटकातील दोन दुय्यम पात्रांचं नेमकं प्रयोजन काय, हे कळत नाही.
नेेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी डॉ. अतुलचं क्लिनिक कम् घर वास्तवदर्शी उभं केलं आहे. त्याचप्रमाणे धारावीतील मंगेशची बकाल वस्तीही तितक्याच तपशिलांत साकारली आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाट्यपूर्ण क्षण ठाशीव केले आहेत. तसंच धारावीतली वातावरणनिर्मितीही यथातथ्य केली आहे. राहुल रानडे यांनी पार्श्वसंगीतातून आशय गडद करण्याची कामगिरी केली आहे. शाल्मली टोळ्ये यांची वेशभूषा आणि राजेश परब यांची रंगभूषा पात्रांना ‘चेहरा’ देते.
डॉ. अतुल मांकडच्या भूमिकेत सतीश राजवाडे यांनी सायकिॲट्रिस्टचं धीरगंभीर व्यक्तिमत्त्व वागण्या-वावरण्यातून खंबीरपणे उभं केलं आहे. संवादोच्चारांतील ठामपणातून त्यांची जीवनाप्रतीची दृष्टी दृगोचर होते. मनुष्य हाताळणीतील त्यांचं कौशल्य राधिका आणि मंगेशबरोबरच्या व्यवहारांतून प्रतीत होतं.
मंगेश गायकवाड रंगवणारे सुदीप मोडक यांनी ड्रग ॲडिक्टचं विचित्र, विक्षिप्त वागणं, त्याचं अधूनमधून हायपर होणं, डॉ. अतुुलबरोबरची त्याची झकाझकी, राधिकाबरोबरचा त्याचा बेफिकीर व्यवहार आणि त्याची आपल्या वस्तीविषयीची हमदर्दी… असे भावभावनांचे चढउतार, त्याबद्दलच्या तीव्र संवेदना प्रत्ययकारीरीत्या व्यक्त केल्या आहेत.
राधिका झालेल्या चैत्राली गुप्ते यांनी उच्चवर्णीय अहंगंड, त्यातून उच्चपदी असल्याने अंगी आलेला सर्व काही ‘मॅनेज’ करण्याचा सत्तामाज आणि समोरच्याला कमी लेखण्याची वृत्ती यांचं संमिश्रण असलेली व्यक्तिरेखा तिच्या सगळ्या छटांसह उत्तम वठवली आहे. अभिजीत दळी (प्रकाश) आणि नरेश (विमल) यांना उल्लेखनीय असं काही काम नाही.
एका वेगळ्या विषयावरची ही लक्षणीय कलाकृती आहे, हे निश्चित.
