किशोर अर्जुन
हिंदी सिनेमा आणि होळी – रंगपंचमी यांचे नाते खूपच जुने आहे. उद्याही जेव्हा मुंबईसह विविध शहरांत रंगपंचमी साजरी होऊ लागेल तेव्हा वर्ष परंपरेनुसार प्रामुख्याने हिंदी सिनेमातील रंगपंचमीवरील गाणीच सगळीकडे आवर्जून वाजवली जातील. या गाण्यांचा मागोवा घेतल्यावर जाणवते की, मदर इंडिया (१९५७) या अजरामर सिनेमातील ‘होली आयी रे कन्हाई’ हे राजकुमार आणि नर्गिस यांच्यावर आणि शिवशंकराच्या भल्या मोठ्या मूर्तीसमोर चित्रित झालेले गाणे आजही जाणकारांच्या ओठांवर नक्कीच आहे. या गाण्यातून दिसणारी होळी आणि रंगपंचमी ही आनंदमयी असली तरी सिनेमाच्या एकूण आशय विषयाशी प्रामाणिक राहत या मातीचे, त्यातील श्रमाचे गायन म्हणून संगीतकार नौशाद आणि गायिका शमशाद बेगम यांनी हे गीत साकारले आहे.

कृषी जीवनाचा भाग म्हणूनच मदर इंडियातील होळी गीत येत असले तरी, पुढील साधारणतः दीड दशकातच शेती-मातीबरोबरचे सणांचे संबंध धूसर होऊन त्याला उत्सवी स्वरूप प्राप्त होऊ लागले. रंगपंचमीदेखील त्याला अपवाद नक्कीच राहिली नाही. कटी पतंग (१९७१) मध्ये ‘आज ना छोडेंगे..’ गाणे राजेश खन्नाच्या (सिनेमातील) व्यक्तिमत्त्वाला अधिक रोमँटिक करण्यासाठी येते. आर. डी. बर्मन,

आनंद बक्षी, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी या गाण्याच्या माध्यमातून रंगपंचमीला अधिक ‘युथफूल’ आणि कालातीत करून टाकले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुढे हिंदीतील खरा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलेल्या शोले (१९७५)मध्ये देखील या सदाबहार टीमने ‘होली के दिन खिल जाते है…’ म्हणत एकूण गेल्या ५० वर्षांपासून सगळा माहौल रंगीत आणि उत्फुल्ल केला आहे. याच दरम्यान, ‘आप की कसम’ (१९७४) मधील ‘जय जय शिव शंकर…’ या गाण्यामध्ये प्रत्यक्ष होळी किंवा रंगपंचमी साजरी होताना दाखवली नसली तरी, या होळीच्या भांगेला या गाण्याने निश्चितच सर्वदूर पोहोचवले.

या काळापर्यंत साधारणतः ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेली होली आणि रंगपंचमी १९८० च्या दशकानंतर हळूहळू शहरी तोंडवळा घेऊन येऊ लागलेली दिसते. ‘सिलसिला’ (१९८१) मध्ये हरिवंशराय बच्चन यांच्या ”रंग बरसे..” हे अमिताभ, संजीव कुमार, रेखा, जया यांच्यावर चित्रित झालेले गाणे याचेच महत्त्वचे उदाहरण ठरू शकेल. बाग, कारंजे यांची फक्त पार्श्वभूमीच नाही तर, त्यापूर्वीच्या सिनेमातील रंगबिरंगी कपडे जाऊन मुख्य कलाकारांसह सगळ्यांनाच पांढरे शुभ्र कपडे, आजवरच्या होळी गीतात असलेला एकूणच धसमुसळेपणा जवळपास नाहीसा करून शोलेतील लग्नाअगोदरची जया बच्चन जशी ‘बाबूजी की दो चुटकी कि होली’ म्हणते तशी माफक रंगांची पण सिनेमाचा कथाशय पुढे घेऊन जाणारी गीते या दशकात सुरू झाली.

मशाल (१९८४) या ‘अश्रूंची झाली फुले’ या वसंत कानेटकरांच्या नाटकावर आधारित सिनेमातील हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल…’ या त्यांच्याच मराठी गीतावरून संगीतबद्ध केलेले ‘होली आयी रे होली आयी रे’ हे अनिल कपूर, दिलीप कुमार यांच्यावरील गाणे मुंबईतील वर्गव्यवस्थेचे चित्रण करते. तर शाहरुख खानला न-नायक म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वाच्या ठरलेल्या ‘डर’ (१९९३)मधील

‘अंग से अंग लगाना…’ हे गाणे आजदेखील ‘होली टॉप टेन प्ले लिस्ट’मध्ये हमखास आढळते.

‘होरी खेले रघुवीरा’ ही बागबान (२००३) मधील रंगपंचमी यातील अमिताभ, हेमामालिनी, यांच्याबरोबर ज्येष्ठत्वाकडे झुकलेली दिसते. तर वक्त (२००५)मध्ये ‘डू मी अ फेवर, लेट्स प्ले होली’ या तलावामध्ये बोटींचा सेट करून साकारलेल्या अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या गाण्याने बदललेल्या आणि आता बोल्ड झालेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केलेली जाणवते. तत्पूर्वी मोहब्बते (२०००)मधील ‘सोनी सोनी’ गाण्याने या संकोचातून मोकळेपणाकडे जाण्याचा मार्ग थोडा प्रयत्न केलेला जाणवतो. पुढे पुढे मात्र एकूणच बदलत्या पिढीनुसार होळीचे संदर्भ जवळपास सगळ्याच गाण्यामध्ये अधिकाधिक बोल्डनेसकडे झुकू लागले. ये जवानी है दिवानी (२०१३) मधील ‘बलम पिचकारी..’ गाणे आणि ‘राम लीला’ (२०१३) मधील ‘लहू जो मुह..’ या दोन्ही गाण्यातील शहरी आणि पारंपरिक कपड्यामध्ये अनुक्रमे दिसली असली तरी, तिचे एकूण हावभाव हे बदलत्या आणि काळाच्या एकूण ओघात अधिक ‘एक्स्प्रेसिव्ह’ होत असलेल्या तरुणाईचेच प्रतिनिधित्व करताना दिसते. त्याच वेळी या काळात हेदेखील आवर्जून दिसते की, सुरुवातीच्या पुरुषप्रधान रंगपंचमी गाण्यांची जागा आता पडद्यावर दृश्यरूपात ‘अधिक नायिकाप्रधान’ झाली. याच दरम्यान, ‘वॉर’ (२०१९)मध्ये नव्या ‘जय जय शिवशंकर…’ गाण्याने जरा अधिक चकचकीतपणा आणला.

यातील बहुतांश सिनेमे कदाचित नव्या पिढीने कदाचित पाहिलेले नसतील, पण त्यातील ही रंगपंचमीची गाणी त्यांनी ऐकली नसतील असे मात्र नक्कीच म्हणता येणार नाही. प्रामुख्याने उत्तर भारताचा आणि त्यामुळेच हिंदी सिनेमात पाऊण शतकापासून महत्त्वाचे स्थान पटकावलेल्या रंगपंचमीला या गाण्यांनी अजरामर बनवले आहे. आणि इतक्या वर्षांत पिढ्या, रंगपंचमी साजरी करण्याची त्यांची पद्धत, स्वरूप सगळे बदलत गेले तरी या प्रत्येक पिढीची होळी-रंगपंचमीची प्ले लिस्ट मात्र साधारणतः तीच राहिलेली आहे.