‘मुंबईला आलो तेव्हाचा काळ खूप कठीण होता. पण मराठी माणसाने भरपूर प्रेम दिलं. त्यामुळेच शहरात स्थिरावलो, काम करू शकलो आणि मुंबईकर होऊन गेलो’, असं ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांनी सांगितलं. कुणाल विजयकर यांच्या ‘खाने में क्या है’ कार्यक्रमात बाजपेयी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला.
‘दिल्लीत अनेक वर्ष थिएटर केल्यानंतर आम्ही मित्रमंडळींनी मुंबईला जायला निर्णय घेतला. मुंबई आमच्यासाठी अजिबातच सोपं नव्हतं. कॉल करा आणि मग भेटायची वेळ आणि ठिकाण ठरवा असा इथला फंडा. माझ्यासाठी हे सर्वस्वी नवीन होतं. मी मितभाषी होतो. फार बोलायचो नाही. मी बोलायला सुरुवात करू शकत नसे. भूक लागली आहे हे सांगायलाही संकोच वाटायचा’, असं बाजपेयी म्हणाले.
‘मला मुंबई आवडू लागली. दहिहंडी, गणेशोत्सव हे सण पाहिले, आवडू लागले. कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठी संस्कृती असलेल्या परिसरात चाळीत राहायचो. अंधेरीतल्या डीएन नगर भागात राहायचो. आता तिथे सगळं रिडेव्हलपमेंटला गेलं आहे. सगळी मराठी जनता. मला अतिशय आवडायचं. त्या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. मी चाळीत राहायचो तिथे सगळ्यांची घरं उघडी असायची. कधीही कोणाकडे जाता यायचं. काही सण असेल, काही निमित्त असेल तर एकमेकांकडे जाणंयेणं व्हायचं. माझ्या बाजूला एक नवरा बायको आणि एक छोटा मुलगा असं कुटुंब राहायचं. तो मुलगा माझ्याकडे खेळायला यायचा. त्यांच्याकडे काहीही वेगळं खायला केलं की मला देत असत’, अशी आठवण बाजपेयींनी सांगितली.
मुंबईत काम करताना चांगली माणसं भेटली याचा संदर्भ त्यांनी दिला. ‘बॅंडेट क्वीनचे कॅमेरामन होते अशोक मेहता. त्यांना माझं काम अतिशय आवडायचं. त्यांनी मला सांगितलं, तुला भूक लागली तर माझ्या सेटवर येत जा. मी अनेकदा त्यांच्याकडे फक्त खायला जात असे. माझ्या सहाय्यकाचा नंबर घे, त्याला फोन कर. सेटवर ये. शूटिंग नसेल तर माझ्या घरी ये. जेवून जा. ते अतिशय रोखठोक बोलणारे होते. विद्वान सिनेमॅटोग्राफर होते. अतिशय उदार मनाचे होते’, असं बाजपेयी म्हणाले.
