‘गोष्ट’ हा शब्द कानावर पडला की लगेचच कान टवकारले जातात. लहान-मोठय़ांना सर्वानाच आकर्षित करणाऱ्या गोष्टी वाचण्या, ऐकण्याबरोबरच रंगमंचावर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तुमच्या-आमच्या लहानपणी आपण खूप गोष्टी वाचल्या किंवा आजी-आजोबांकडून ऐकल्या असतील, पण आजच्या छोटुकल्यांना ही संधी फारशी प्राप्त होत नाही. हीच संधी त्यांना मिळवून देणारे हे बालनाटय़ म्हणजे ‘आजोबांच्या धमाल गोष्टी’.
‘नाटय़संस्कार कला अकादमी’ची निर्मिती असलेल्या या नाटकात २५ बालकलाकार आपल्याला प्राण्यांच्या दुनियेत घेऊन जातात. हे नाटक बघताना बच्चेकंपनी तर त्यात रमतेच, पण पालकही ‘नॉस्टॅलजिक’ होतात. ससा-कासव शर्यत, राजा आणि माकड, सिंह आणि उंदीर अशा विविध गोष्टींमधून मनोरंजन तर होतेच, पण त्याबरोबरच उद्याच्या पिढीबरोबरच आजच्या पिढीला आवश्यक असणारा बोधही मिळतो.




दुरावत जाणारे आजी-आजोबांचे नाते दृढ करायला हे बालनाटय़ मदत तर करतेच, पण त्याबरोबरच त्यांचे प्रेम, आपुलकी किती गरजेची असते हेदेखील या नाटकातून बघायला मिळते.
जुन्याच गोष्टी काय बघायच्या किंवा ऐकायच्या म्हणून आपण अशा बालनाटय़ाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा हे नाटक बघणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. आपण लहानपणी त्याच त्याच राजा-राणीच्या गोष्टी आजी-आजोबांकडून परत-परत ऐकल्या असतील. तसेच या नाटकातील गोष्टीदेखील आपल्याला माहिती असतील, पण त्यांच्या सादरीकरणातील अनुभव घेताना मुलांबरोबरच आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू या नाटकाबरोबर एकरूप होऊन जातात. जुन्याच गोष्टी मुलांची आजची भाषा वापरून केलेले सादरीकरण आणि बालनाटय़ासाठी दिलेले संगीत या गोष्टी प्रकर्षांने अनुभवाव्यात अशाच. नाटय़संस्कारचे संस्थापक प्रकाश पारखी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या बालनाटय़ाचे लेखन केले आहे राजश्री राजवाडे-काळे यांनी तर दिग्दर्शन केले आहे अमोल जाधव यांनी.
आजची मुले कायमच टीव्ही आणि कार्टूनमध्ये दंग असतात असे म्हणून आपण हा विषय तेथेच सोडून देतो, पण अशी संदेशात्मक नाटके मुलांबरोबर बघून त्यांना आभासी दुनियेतून वास्तवाच्या दुनियेत आणण्याची जबाबदारी हे नाटक घेते.
जुन्या गोष्टी वाचण्या, ऐकण्यापुरता वेळ उद्याच्या पिढीला तर दिला जातच नाही, किमान तो पाहण्याचा आणि ‘एन्जॉय’ करण्याचा आनंद त्यांना दिला जावा, हेदेखील हे नाटक बघताना जाणवत राहते. आता शाळांमधून सुरू झालेल्या नाटय़अभ्यासक्रमाचा पाया म्हणून अशा प्रयोगांकडे बघणारे पालक त्यांच्या सानुल्यांना मध्यंतरात नाटक म्हणजे काय असते, हे समजावून सांगत होते आणि त्यांना गोष्टी आवडत आहेत का असे प्रश्न विचारून त्यांची अभिरुची समृद्ध करण्याचा प्रयत्न करत होते, अशी बालनाटय़े सादरीकरणाचे यश आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
या नाटकासाठी रंगभूषेची जबाबदारी पार पाडली आहे शरदराज भगत यांनी, तर वेशभूषा आहे क्षितिजा आगाशे आणि लीना जोगळेकर यांची. शीर्षक गीत मिलिंद गुणे यांचे असून पाश्र्वगायन केतकी चंद्रात्रेय यांचे आहे.
इसापनीतीतील कथा जशा मुलांना खूप काही सांगून जातात, तसेच ‘आजोबांच्या धमाल गोष्टी’ या बालनाटय़ातून उद्याच्या पिढीला सहजतेने मार्गदर्शन करतात.
श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com