रवींद्र पाथरे

काश्मीर प्रश्न ही अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखी भारताच्या भाळावरची एक सनातन भळभळती जखम आहे. विद्यमान केंद्र सरकारने काश्मीरच्या स्वायतत्तेसंबंधातील घटनेचे ३७० कलम रद्द केल्यावर काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होईल असं अनेकांचं ‘विशफूल थिंकिंग’ होतं. परंतु अद्याप तरी तसं काही घडलेलं दिसून येत नाहीए. अजूनही तिथे दहशतवादी हल्ले होत आहेत. निरपराध माणसं बळी जात आहेत. आणि लष्करी बळावरच आपल्याला तिथली सत्ता टिकवून ठेवावी लागते आहे हे प्रखर वास्तव आहे.

demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

काश्मीर प्रश्नात मुळातच अनेक गुंतागुंतीचे तिढे आहेत. पेच आहेत. त्या पेचांचं सम्यक आकलन आपल्या कुठल्याच सरकारला एकतर झालेलं दिसत नाही, किंवा मग काश्मिरींनाच मुळात भारतात राहायचं नाहीए अशी साधार शंका यावी अशीच तिथली परिस्थिती आहे. भरीस भर म्हणजे भारताला संत्रस्त करण्यासाठी पाकिस्तानही काश्मिरात अतिरेक्यांच्या साहाय्याने सतत कुरापती काढीत असतो. तिथली स्थानिक नेते मंडळीदेखील नेहमी फुटीरतेला खतपाणी घालणारी वक्तव्यं करीत असतात. त्यांच्याही हेतूंबद्दल शंका वाटावी अशीच एकूण परिस्थिती आहे. भारतीय लष्कराबद्दल काश्मिरी जनतेला बिलकूल आपुलकी वाटत नाही. कारण भारतीय लष्करही त्यांच्यावर दमनतंत्राचा वापर करत असल्याच्या सर्रास तक्रारी आहेत. त्यामुळे काश्मीर प्रश्नाची सोडवणूक हे बहुसंख्य भारतीयांना दिवास्वप्न वाटत असेल तर त्यात त्यांची काही चूक नाही. आपण काश्मिरी जनतेला कधीच आपलंसं करू शकलेलो नाही, ही कटु वस्तुस्थिती आहे. ना आपल्या सरकारने असे प्रयत्न केले, ना तिथल्या नेत्यांनी यादृष्टीने पावलं उचलली. त्यामुळे काश्मीर प्रश्नाचं भिजत घोंगडं कायम धगधगतंच आहे. आज धाकदपटशाने आणि जोरजबरदस्तीने काश्मीरला आपलंसं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे जुलूम-जबरदस्तीचे प्रयत्न कसे काय यशस्वी होणार? असो.

नमनालाच हे असं घडाभर तेल ओतण्याचं कारण आहे.. मराठी रंगभूमीवर नुकतंच आलेलं ‘सफरचंद’ हे नाटक! गुजराती रंगभूमीवरील यशस्वी लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं बसवलेलं हे नाटक. स्नेहा देसाई- राजेश जोशी या दुकलीचं ‘कोडमंत्र’ हे नाटक याआधी गुजराती आणि मराठी रंगभूमीवरही चांगलंच गाजलेलं आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या याही नाटकाबद्दलची उत्सुकता वाढीस लागली होती. तशात हे काश्मिरातल्या माणसांचं जगणं मांडणारं नाटक म्हटल्यावर त्याबद्दलची उत्सुकता आणखीनच ताणली गेली होती. याचं कारण मराठी रंगभूमीवर इतरप्रांतीयांच्या जगण्याबद्दल अभावानंच चित्रण झालेलं आढळतं. कधी असलंच, तरी ते तोंडी लावण्यापुरतंच असतं. ऐतिहासिक नाटकांतून अशी पात्रं आढळतात; पण ती त्या नाटकांचा अविभाज्य भाग म्हणून येतात. अन्यथा खास अन्यप्रांतीयांवरच नाटक बेतलं गेलंय असं होत नाही. असो. पण हे नाटक एका वेगळ्या भौगोलिक प्रदेशात घडतं. स्वाभाविकपणेच तिथली माणसं, त्यांचं जगणं, त्यांच्या व्यथावेदना यात अनुभवायला मिळतात. ‘सफरचंद’ हे नाटकाचं नावही वेगळ्या अर्थाने अन्वर्थक आहे. काश्मीरच्या समृद्धीचं प्रतीक असलेल्या सफरचंदांच्या बागा.. ज्या खरं तर आज उजाड झालेल्या आहेत. तिथल्या माणसांच्या मनात भारताबद्दल, इथल्या माणसांबद्दल संशयाचं बीज आहे. त्यांना आलेल्या कटु अनुभवांनी ते फोफावलं गेलं आहे. अशा एका कडूजहर अनुभवाची ही कथा.. ‘सफरचंद’!

भारतीय लष्करातून निवृत्त झालेले मोहम्मद चाचा आणि पिढय़ानुपिढय़ा सफरचंदांची बागाईत जोपासणारे श्यामलाल हे सख्खे, जीवश्चकंठश्च मित्र. दहशतवादानं वैराण झालेल्या काश्मीरमधील एका खेडय़ात ते राहतात. दहशतवाद, गोळीबार, मृत्यूचं थैमान ते नित्यच अनुभवत असतात. तरीही आपली मैत्री ते टिकवून आहेत. पाकिस्तानी दहशतवादी, बेरोजगारी, गरिबी, अन्याय-अत्याचारांना कंटाळून दहशतवादी बनलेले स्थानिक विद्रोही तरुण, भारतीय लष्कराचं त्यांच्याकडे संशयानं पाहणं.. या सगळ्या धुमश्चक्रीत ते आपलं आयुष्य कंठताहेत.

अशाच एके दिवशी मोहम्मद चाचांच्या प्रांगणातच दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांत चकमक झडते. दोन्ही बाजूचे लोक त्यात कामी येतात. चकमक संपल्यावर मोहम्मद चाचांना त्यापैकी दोघांच्या प्राणांत थोडी धुगधुगी असल्याचं जाणवतं. ते माणुसकीच्या नात्यानं त्यांना श्यामलाल यांच्या मदतीने आपल्या घरी घेऊन येतात. त्यातला भारतीय जवान हा ‘तो’ नसून ‘ती’ असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. तर दुसरा- पाक दहशतवादी! ते दोघांवर उपचार करतात. त्यांना बरं होईतो आपल्या घरी आश्रय देतात. ते दोघं एकमेकांसमोर आले तर परस्परांचा जीव घेतील हेही मोहम्मद चाचांना चांगलंच माहीत असतं. त्यामुळे ते शक्यतो त्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्नात असतात. या दोघांमधली झेलम ही भारतीय सैन्यातल्या आपल्या नवऱ्याच्या पाक अतिरेक्यांनी केलेल्या निर्घृण हत्येचा सूड उगवण्याकरता सैन्यात भरती झालेली असते. तर अन्वर आपल्या भावाला (अल्ताफ) त्याचा काहीही गुन्हा नसताना भारतीय लष्करानं ठार केलं म्हणून बदला घेण्यासाठी पाकपुरस्कृत दहशतवादी बनलेला असतो.

मोहम्मद चाचाही एकेकाळी भारतीय लष्करात असले तरी त्यांना माणुसकीला काळीमा फासणारा काश्मिरातील हा खूनखराबा मान्य नसतो. म्हणूनच या दोघांना आश्रय देऊन ते त्यांना माणसात आणण्यासाठी धडपडतात. मात्र दोघांवरही खून स्वार झालेला असतो. मोहम्मद चाचांनी त्यांना बजावलेलं असतं : ‘माझ्या घरात असेतो तरी दोघांनी एकमेकांचा जीव घ्यायचा नाही.’ त्यामुळे नाइलाजानं अन्वर आणि झेलम एकमेकांना सहन करत असतात. मोहम्मद चाचा आणि श्यामलाल हे त्यांच्यातला दुवा बनतात. हळूहळू त्यांची परस्परांप्रतीची खुन्नस हळूहळू कमी होत जाते. तरी ती संपलेली नसतेच.

अर्थात पुढे नेमकं काय घडतं, हे इथं सांगणं उचित नाही. तो एक खचाखच योगायोगांनी भरलेला नाटय़ात्म एपिसोड आहे.

लेखिका स्नेहा देसाई यांनी ‘कोडमंत्र’नंतर लिहिलेलं आणि मराठी रंगभूमीवर आलेलं (बहुधा) त्यांचं हे दुसरं नाटक. ‘कोडमंत्र’मध्ये सैन्यातील रॅगिंगबद्दलचं पॉवरपॅक्ड नाटय़ होतं. मुक्ता बर्वे यांनी (मराठीत) ते शिवधनुष्य लीलया पेललं होतं.

काश्मीर हा विषय मुळात समजून घ्यायला महाकर्मकठीण. (आपल्या सरकारलाही जिथं अजून तो नीट आकळत नाहीए, तिथं आपणा सर्वसामान्यांची काय कथा?) तशात त्यावर कलात्मक टिपण्णी तर त्याहून अवघडच. असं असतानाही स्नेहा देसाई यांनी मानवतेच्या हळुवार भावनेनं या विषयास हात घालण्याचा प्रयत्न या नाटकाद्वारे केलेला आहे. स्वाभाविकपणेच त्यात रोमॅंटिसिझम येणं क्रमप्राप्तच. तो एक वेळ क्षम्यही म्हणता येईल. परंतु त्याच्या मराठी रूपात सच्ची ‘काश्मिरीयत’ आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला असताना मुग्धा गोडबोले यांच्या मराठी रूपांतरणातला संहितेचा शुद्ध बाज तांदळातील खडय़ाप्रमाणे बोचत राहतो. काश्मीर आपल्या डोळ्यांसमोर वास्तवदर्शी रूपांत उलगडत असताना तर ते फारच हतोत्साही करतं. एक मोहम्मद चाचांचा अपवाद वगळता आसमंतातील काश्मिरीयत प्रतीत होईल असा बोलीचा लहेजा नाटकात का वापरला गेला नाही, कळत नाही. (मूळ नाटक पाहिलं नसल्याने त्यात याबाबतीत काय स्थिती आहे कळायला मार्ग नाही.) बाकी वातावरणनिर्मितीपासून संगीत, वेशभूषा, रंगभूषा आदींत काश्मिरीयतचं नितांतसुंदर दर्शन घडतं. मराठी नाटकाला दृक -श्राव्य-काव्याचं वावडं असल्याचा नेहमी घेतला जाणारा आक्षेप या नाटकानं तरी खोटा ठरवला आहे.

लेखिका स्नेहा देसाई यांनी काश्मीर खोऱ्यात घडणारी एक रोमॅंटिक गोष्ट यात चितारली आहे. त्यातलं ‘नाटय़’ एकीकडे आपल्याला खिळवून ठेवत असलं तरी त्यातली योगायोगांची साखळी त्यातली कृतकताही अधोरेखित करते. लेखिकेनं पात्रनिर्मितीपासूनच ‘नाटय़’ योजलं आहे. त्यांच्यातले परस्परसंबंध हे नाटय़ अधिकच गडद करत जातात. सामान्यत: माणसामाणसांत माणुसकीचंच नातं असतं; परंतु प्राप्त परिस्थिती त्यात खोडा घालते याची लख्ख जाणीव करून देणारं हे नाटक आहे. दिग्दर्शक राजेश जोशी यांनी प्रयोगाची बांधणीही पुरेपूर नाटय़मय केली आहे. संदेश बेंद्रे यांच्या ‘खरंखुरं’ काश्मीर उभं करणाऱ्या फिरत्या नेपथ्यानं नाटकाला अत्यंत उच्च निर्मितीमूल्यं बहाल केली आहेत. काश्मीर खोऱ्यात भुरभुरणारा बर्फ, धुकं पांघरलेला गहन-गूढ आसमंत, सायंकाळची कातरवेळा, लालचुटूक सफरचंदांची बाग, दगडांची- लाकडी घरं, मातीच्या चुली, घराबाहेरची शेकोटी.. असं निसर्गसंपन्न, देखणं काश्मीर आपल्यासमोर उलगडत जातं. अशा मन हरखवणाऱ्या पाश्र्वभूमीवर हिंसाचार, गोळीबार, दहशतवाद, खंडणीखोरीच्या घटनांनी पाहणाऱ्याच्या मनांवर भीषण ओरखडे उमटत राहतात. काश्मिरातला हा कमालीचा विरोधाभास नकोसा वाटतो.

नाटकातील कलावंतांनी आपल्या भूमिकांना न्याय देण्याचा कसून प्रयत्न केला आहे. विशेषत: मोहम्मद चाचा झालेले शंतनू मोघे काश्मिरीयतचं चालतंबोलतं उदाहरण वाटतात. काश्मिरीचा लहेजा त्यांनी अचूक पकडला आहे. प्रमोद शेलार यांनी त्यांचे मित्र श्यामलाल नेमकेपणी उभे केले आहेत. शर्मिला शिंदेंनी सूडाग्नीने पेटलेली झेलम आणि हळूहळू तिच्यात होत गेलेलं परिवर्तन छान दर्शवलं आहे. संजय जमखंडींचा दहशतवाद्याच्या अंतरंगातलं ‘माणूस’पण दाखवणारा अन्वरही समर्पक. अक्षय वर्तक (झेलमचा पती वीरेंद्रप्रताप सिंह व दहशतवादी इब्राहिम), रूपेश खरे (मोहम्मद चाचांचा वाममार्गाला लागलेला मुलगा राशीद), राज आर्यन (अन्वरचा भाऊ अल्ताफ), अमीर तडवळकर (सुलेमान) यांनीही चोख कामं केली आहेत.

सचिन जिगर यांचं काश्मिरी पाश्र्वसंगीत, भौतेश व्यासांची नितांतसुंदर प्रकाशयोजना, तारा देसाईंची वास्तवदर्शी वेशभूषा, पात्रांना काश्मिरी ‘चेहरा’ देणारी राजेश परब यांची रंगभूषा यांनी हे ‘काश्मीर-नाटय़’ नेत्र व कर्णसुखद केलं आहे. काश्मीरला न जाताही खरंखुरं काश्मीर अनुभवायचं सुख देणारं हे नाटक उच्च निर्मितीमूल्यांसाठी नक्कीच पाहायला हवं.