स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर चॅनेलने ही मालिका दुपारी प्रसारित होणार असल्याचे सांगत त्यावर स्पष्टीकरण दिले होते. या चर्चा बंद होत नाही तोपर्यत या मालिकेतील दोन कलाकरांनी या मालिकेला रामराम केला आहे.

अभिनेते अजय पुरकर यांनी फेसबुक पोस्ट करत ही मालिका सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता आंबिकर हिने ही मालिका सोडल्याचे समोर येत आहे. श्वेता ही या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती. ‘मराठी सिरियल्स’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने याबाबतचे वृत्त दिले आहे.

“मी काय बोलू…”, ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने अमृता खानविलकरसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील आर्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता आंबिकर हिने ही मालिका सोडली आहे. तिने ही मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही, असे त्यांनी यात म्हटले आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच आर्या हे पात्र चांगलेच लोकप्रिय ठरले होते.

श्वेताने ही मालिका नेमकी का सोडली? मालिका सोडण्यामागचे नेमकं कारण काय? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अवघ्या एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा ही मालिका चर्चेचा विषय ठरत आहे.

‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार की नाही? स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण

दरम्यान मुलगी झाली हो ही मालिका नवीन वेळेत दाखवली जाणार आहे. या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका बंद होणार नाही. त्याऐवजी दुपारी २ वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल, असे स्टार प्रवाहने सांगितले आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या जागी आता रात्री ९ वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे ही मालिका बंद होणार असल्याच्या अफवांवर पडदा पडला होता.