Marathi Singer On Mumbai Pune Express Way Traffic : ३२ तासांनंतर अखेर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील, प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक तत्काळ ठप्प झाली होती आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीदेखील झाली होती. आता हा टँकर हटवण्यात आला असून, मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारनंतर गॅस टँकरमधील ज्वलनशील गॅस छोट्या दोन टँकरमध्ये भरून हा टँकर इथून बाजूला करण्यात आला. वायुगळती रोखण्यात बुधवारी दुपारी काही प्रमाणात यश आल्यानंतर एमएसआरडीसीने मुबंई वाहिनीवरून पुणे आणि मुंबई अशा दोन्ही दिशांना जाणारी वाहतूक सुरू केली; मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल ३२ तास लागले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील या कोंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवाशांना त्रास झाला. या वाहतूक कोंडीवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. अनेकांनी या घटनेवर विविध माध्यमांतून संताप व्यक्त केला. अशातच मराठी गायकानंसुद्धा या वाहतूक कोंडीवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत संताप व्यक्त केला आहे.
मराठी गायक मंगेश बोरगावकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या गाण्याचे व्हिडीओ, तसेच फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. तसेच तो अनेकदा समाजिक आणि राजकीय परिस्थितीवरसुद्धा त्याची मतं स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतो. अशातच त्यानं मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर पोस्ट शेअर केली आहे.
मंगेश बोरगावकरने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
इन्स्टाग्राम स्टोरीवर मंगेशनं पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यानं असं म्हटलंय, “भारतातला सगळ्यात महागडा टोल असलेला रोड, जिथे काहीही एक्स्प्रेस नाहीये. आहे फक्त वाहतूक कोंडी… कोणतीही सोय नाही… आहेत फक्त हाल आणि वाहतूक कोंडी; पण बोलणार कोणाला? इथून पुढे नागरिक म्हणून आपण एकत्र आलो, तर काहीतरी घडेल. लोकांचे हाल झालेत; पण कुणालाच काळजी नाही. नागरिक सतर्क नसतील, तर हेच होणार.”

दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती व भविष्यात अशी घटना घडू नये आणि असं घडल्यास कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करून शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. तसेच या वाहतूक कोंडीवर राज ठाकरे यांनीसुद्धा पोस्ट शेअर करीत प्रवाशांचा टोल परत केला जावा, अशी मागणी केली आहे.

