‘स्वर’ पुष्पा!

पुष्पाताईंचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव सातपाटी.

‘अगं पोरी सांभाल दर्याला’ गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी पुष्पा पागधरे व मोहमंद रफी संगीतकार राम कदम यांच्यासमवेत पुष्पा पागधर

एखादे गाणे ललाटी भाग्य घेऊन येते. जे ठरविलेले असते ते होत नाही, नियती वेगळेच काहीतरी घडविते आणि एखाद्याचे नशीब उजळते. दादा कोंडके यांच्या ‘सोंगाडय़ा’ चित्रपटासाठी वसंत सबनीस यांनी लिहिलेले आणि राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले ‘ते’ गाणे खरे तर लताबाई गाणार होत्या. दादांचीही तशी इच्छा होती. पण काही कारणाने लताबाई ते गाणे गाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे राम कदम यांनी ते गाणे अन्य एका पाश्र्वगायिकेकडून गाऊन घेतले. गाणे लोकप्रिय झालेच, पण त्या पाश्र्वगायिकेसाठी मराठी चित्रपटसृष्टीत पाश्र्वगायनाचे दरवाजे उघडले गेले. ललाटी भाग्य घेऊन आलेले ते गाणे ‘अहो राया मला पावसात नेऊ नका’ हे होते आणि ज्यांना गायची संधी मिळाली व ज्यांनी संधीचे सोने केले त्या पाश्र्वगायिका होत्या पुष्पा पागधरे..
‘पुनर्भेट’च्या निमित्ताने पुष्पाताईंच्या घरी गप्पांच्या ओघात या गाण्याविषयीच्या आठवणींचा पदर उलगडताना त्या भूतकाळात गेल्या. पुष्पाताई म्हणाल्या, दादांचा राम कदम यांना दूरध्वनी गेला. ‘सोंगाडय़ा’ चित्रपटातील या गाण्याचे चित्रीकरण कोल्हापुरात करायचे आहे. तेव्हा लताबाईंशी बोलून, त्यांची वेळ घेऊन गाण्याचे ध्वनिमुद्रण करून घ्या आणि गाणे घेऊन इकडे या. राम कदम लताबाईंकडे गेले. त्यांना त्या वेळी गाणे गायला जमणार नव्हते. त्यांनी नाही म्हटल्यानंतर राम कदम यांना माझी आठवण झाली व त्यांनी हे गाणे माझ्याकडून गाऊन घ्यायचे ठरविले. कदम यांच्याकडे ढोलकीवादन करणाऱ्या पंडित विधाते यांना त्यांनी माझ्या घरी पाठविले आणि मुंबईत बॉम्बे लॅबमध्ये ध्वनिमुद्रणासाठी यायला सांगितले. दादांच्या चित्रपटासाठी गाणे गायची संधी मिळाली याचा आनंद होताच, पण आपण चांगल्या प्रकारे गाऊ का, अशी भीतीही मनात होती. ध्वनिमुद्रणापूर्वी गाण्याची तालीम झाली. राम कदम यांनी तू गाणे चांगलेच गाशील असा आत्मविश्वास दिला आणि गाण्याचे ध्वनिमुद्रण पार पडले. गाण्याची टेप घेऊन राम कदम कोल्हापूरला गेले. उषा चव्हाण यांच्यावर हे गाणे चित्रित झाले. चित्रीकरण पार पडल्यानंतर राम कदम यांनी दादांना, हे गाणे लताबाईंनी नव्हे तर पुष्पा पागधरे यांनी गायले असल्याचे सांगून आपण हे गाणे पुन्हा लताबाईंकडून गाऊन घेऊ, असे सांगितले. पण दादांनाही मी गायलेले ते गाणे आवडले. त्यांच्या खास शैलीत त्यांनी राम कदम यांना, पुष्पाने गाणे छान गायले आहे. तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेले हे गाणे ठेवू या, असे सांगितले.
पुष्पाताईंचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव सातपाटी. त्यांचे वडील जनार्दन आणि आई जानकी चामरे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. वडील भजने गायचे. मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. पाच/सात वर्षांच्या असलेल्या पुष्पाताई वडिलांबरोबर भजनाच्या कार्यक्रमातून असायच्या. गाण्याचे बाळकडू त्यांना ravi05लहानपणापासून मिळाले. शाळेतील आर. डी. बेंद्रे या शिक्षकांचेही मार्गदर्शन त्यांना सुरुवातीला मिळाले. बेंद्रे सरांना संगीताचे व गाण्याचे चांगले ज्ञान होते. आम्ही कोळी समाजातील. आमच्या समाजात त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे ही दूरची गोष्ट होती. पण वडिलांमुळे बेंद्रे सरांकडे गाणे शिकायला जाऊ लागले. त्यांनी मला आवाज कसा लावायचा ते शिकविले. माझ्याकडून रियाज करून घेतला. कोणतेही शुल्क न घेता त्यांनी मला गाणे शिकविले. आमच्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात मला गाणे म्हणायची संधी मिळाली. ‘जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला’ हे गाणे गायले. कार्यक्रमाला मुंबईचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर आले होते. माझे गाणे ऐकून ते खूश झाले. त्यांनी मला मुंबईला यायला सांगितले. वडिलांबरोबर मुंबईला संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे गेले. त्या वेळी आकाशवाणीवर बडे गुलाम अली खॉं, अख्तर बेगम यांच्या ठुमरी, गझल लागत असत. त्या सतत ऐकत असल्याने माझ्या पाठ झाल्या होत्या. देसाई यांना मी म्हणून दाखविल्या. त्यांना माझे गाणे आवडले. त्यांनी मला अब्दुल रहेमान खाँसाहेब यांची भेट घडवून दिली. त्यांच्याकडे गझल, ठुमरीचे धडे गिरविले. पुढे गायक आर. एन. पराडकर यांच्याकडे भजने, भक्तिगीते, गोविंद पोवळे यांच्याकडे सुमग संगीत शिकले. आमच्या सातपाटी गावात स्थानिक मंडळी नाटक करायची. मी गाणे शिकते व गाते हे एव्हाना गावात माहिती झाले होते. त्यांनी बसविलेल्या ‘मंगळसूत्र’ या नाटकातील काही गाणी संगीतबद्ध करण्याची संधी मला मिळाली. या नाटकात चंद्रकांत पागधरे हे नायकाचे काम करत असत. त्यांनी मला मागणी घातली आणि मी पुष्पा चामरेची पागधरे झाले. लग्नानंतर त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी गाणे पुढे सुरू ठेवू शकले.
पुष्पाताई यांनी आकाशवाणीसाठी अनेक गाणी गायली. आकाशवाणी केंद्रांवर तेव्हा संगीत कार्यक्रम होत असत. मुंबईसह रायपूर, ग्वाल्हेर, इंदूर, लखनौ, गोरखपूर, नवी दिल्ली, जम्मू, पाटणा, रांची आदी विविध ठिकाणच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या व हिंदी गाणी, गझल, भजने सादर केली. गायक व संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे त्यांनी ‘जीव लावूनी माया कशी तुटली, सांगा पुरुषांची रीत ही कुठली’ आणि ‘तुमच्यावर लई लई प्रेम करू वाटतंय मला’ ही दोन गाणी गायली. ‘एचएमव्ही’ कंपनीने या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. संगीतकार राम कदम ‘गाढवाला भेटला गुरू’ या नाटकातील गाण्यांना संगीत देत होते. नाटकाच्या तालमी पुण्याला चालायच्या. पुष्पाताई व त्यांचे पती नाटकाच्या तालमीला जायचे. त्या वेळी पुष्पाताईंनी रामभाऊंना मला चित्रपटासाठी पाश्र्वगायन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. ते लक्षात ठेवून ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ चित्रपटातील ‘का हो तुम्ही येणंजाणं सोडलं, का हो तुम्ही एकाएकी नातं तोडलं’ हे गाणे गाण्यासाठी त्यांनी पुष्पाताईंना बोलाविले. याचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, राजकमल स्टुडिओत गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले. ध्वनिमुद्रणानंतर उत्सुकतेने माझे गाणे मी ऐकले आणि निराश झाले. कारण ते बेसूर झाले होते. तेव्हा राम कदम यांनी चित्रपटासाठी पाश्र्वगायन करण्याचे तंत्र खूप वेगळे असल्याचे सांगून आवाजावर अजून मेहनत घेण्यास सांगितले. गाणे चांगले न झाल्यामुळे मी रडवेली झाले होते. तेव्हा, अगं हे गाणे तू गाणारच नव्हतीस. ते आशा भोसले गाणार आहेत. पण पाश्र्वगायन म्हणजे काय हे तुला कळावे, अनुभव मिळाला म्हणून तुझ्याकडून हे गाणे गाऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे याच चित्रपटासाठी ‘तोतापुरी आंबा तोडू नका थांबा, त्याच्या कोयीत लपलाय भुंगा’ ही लावणी त्यांनी पुष्पाताईंकडून गाऊन घेतली. चित्रपटासाठी पाश्र्वगायन केलेले त्यांचे हे पहिलेच गाणे. पुढे राम कदम यांच्यासह पं. यशवंत देव, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, बाळ पळसुले, श्रीकांत ठाकरे, अशोक पत्की, स्नेहल भाटकर, राम लक्ष्मण आणि अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गैर चित्रपट गाणी गायली. ‘आला पाऊस मातीच्या वासात गं’, ‘नको नको रे पावसा असा धिंगणा अवेळी’, ‘नाच गं घुमा कशी मी नाचू’ (उषा मंगेशकर, चारुशिला बेलसरे यांच्यासह), ‘राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा’ ही त्यांची गाजलेली गाणी. ‘बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही’ (ज्योतिबाचा नवस), ‘रुसला का हो मनमोहना’ (आयत्या बिळात नागोबा) या दोन गाण्यांसाठी त्यांना पाश्र्वगायनासाठीचा राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. हिंदीमध्ये संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याकडे ‘खून का बदल खून’, ‘बीन मॉं के बच्चे’, ‘मुकद्दर की बात’ या तीन चित्रपटांसाठी त्यांनी पाश्र्वगायन केले. मराठी व हिंदीव्यतिरिक्त त्यांनी बंगाली, भोजपुरी, गुजराथी, मारवाडी, ओडिया, गुजरी आदी भाषांतूनही त्यांनी गाणी गायली असून आजवर गायलेल्या गाण्यांची संख्या सातशेहून अधिक आहे.
पुष्पाताई यांनी मोहमंद रफी यांच्याबरोबर गायलेले ‘अग पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी’ हे द्वंद्वगीत आणि ‘अंकुश’ चित्रपटातील त्यांनी गायलेले ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ या दोन गाण्यांशिवाय गप्पा पूर्ण होणे शक्य नव्हते. त्याविषयी बोलताना पुष्पाताई म्हणाल्या, ‘अगं पोरी’चे संगीत श्रीकांत ठाकरे आणि गीतकार वंदना विटणकर. ठाकरे यांनी मला हे गाणे रफीसाहेबांबरोबर गायचे आहे हे सांगितले तेव्हा मला भीती वाटली. इतक्या मोठय़ा गायकाबरोबर गायचे दडपण माझ्यावर आले. पण रफीसाहेबांनी मोकळेपणाने बोलून माझ्यावरील दडपण दूर केले. ते स्वभावाने खूप साधे होते. मोठेपणाचा थोडासाही गर्व त्यांना नव्हता. त्याचा प्रत्यय मला त्यांच्याबरोबर हे गाणे गाताना आला. त्या गाण्यातील एका कडव्यात ‘तू माझी नवरी’ अशी एक ओळ आहे. त्या ओळीला रफीसाहेबांनी शिट्टी वाजविली. पण नंतर लगेचच तुम्हाला राग नाही ना आला? असे विचारले. खरे तर ते इतके मोठे गायक. त्यांनी मला विचारले नसते तरी चालले असते, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा. ‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ याचे संगीत कुलदीप सिंह यांचे आहे. हे गाणे मी जेव्हा गायले तेव्हा ते इतके लोकप्रिय होईल, असे त्यांनाही वाटले नव्हते. पण आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. काही शाळांमधून आजही हे गाणे प्रार्थना म्हणून म्हटले जाते किंवा याची ध्वनिमुद्रिका लावली जाते. अनेकांच्या भ्रमणध्वनीवर हे गाणे ‘रिंगटोन’ किंवा ‘कॉलरटय़ून’ म्हणून ठेवलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांसमोर हे गाणे म्हटले तो अनुभव न विसरता येणारा. नवी दिल्ली येथील पंजाब नॅशनल बॅंकेत कार्यालयीन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी हे गाणे लावले जाते. त्यांचा गाण्यांचा कार्यक्रम या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
गायक तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मॉरिशसचा दौराही केला. गायक जयवंत कुलकर्णी यांच्या बरोबरही गाण्याचे अनेक कार्यक्रम केले. पुष्पाताई यांच्या आईने शंभरी पार केली असून मुलीचे सर्व कौतुक, प्रसिद्धी त्यांनी पाहिली. वयाच्या ७४व्या वर्षांत असलेल्या पुष्पाताई माहीम येथे मच्छीमार वसहतीमधील एका इमारतीत अगदी छोटय़ा घरात राहतात. राज्य शासनाकडे १९८७ मध्ये दहा टक्के कोटय़ातून घर मिळावे म्हणून त्यांनी अर्ज केला होता पण अद्याप त्यांना घर मिळालेले नाही. राज्य शासनाकडून दरमहा २ हजार १०० रुपये इतके मानधन मिळते, पण सध्याच्या काळात ते तुटपुंजे असल्याने आजही आपली तब्येत सांभाळून त्या गाण्याचे कार्यक्रम करतात.
विवाहित पुतणी व तिचे पती आणि बहिणीची दोन मुले त्यांच्या बरोबर राहतात. दररोज सकाळी काही वेळ त्या गाण्याचा रियाज आजही आवर्जून करतात. आमच्या काळात आम्हाला ‘मान’ मिळाला पण ‘धन’ फारसे मिळाले नाही, अशी खंत त्या व्यक्त करतानाच मातब्बर संगीतकार आणि गायक-गायिकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे त्या सांगतात. आकाशवाणीवरील गाण्यामुळे मिळालेली प्रसिद्धी आणि मी विस्मृतीत गेलेले असताना मला पुन्हा लोकांसमोर आणणारी प्रसार माध्यमे यांचा त्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. रसिकांच्या ओठावर आजही आपली गाणी टिकून आहेत याचा फार मोठा आनंद व समाधान त्यांना आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठीची ती शिदोरी आहे..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi singer pushpa pagdhare

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या