Marathi Singer Proposal : गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने अभिनेता अंशुमन जोशीबरोबर लग्नगाठ बांधली. तर गीतकार संदीप खरे यांच्या लेक रूमानी खरेसुद्धा स्तवन शिंदेबरोबर लग्नबंधनात अडकली. अशातच एका लोकप्रिय गायिकेने प्रेमाची कबुली दिली आहे.

‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या शोमधून घराघरांत पोहोचलेली गायिका शरयू दातेने प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर तिने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करीत ही खुशखबर दिली आहे.

शरयू दाते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे स्वत:चे खास फोटो, तसेच गायनाचे व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने होणाऱ्या नवऱ्याने प्रपोज केल्याचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

गायिका शरयू दातेने दिली प्रेमाची कबुली

शरयू केनिया पर्यटनाला गेली असून इथले फोटो तिने शेअर केले आहेत. अशातच केनियातील मसाईमारामध्ये तिला बॉयफ्रेंडने प्रपोज केले. त्याचे नाव विभास वाटवे असं आहे. विभासने गुडघ्यावर बसून तिला अंगठी घातली. शरयूने शेअर केलेल्या फोटोंपैकी शेवटच्या फोटोत ती हातातली अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. प्रपोजलचे फोटो शेअर करीत शरयूने “हेलो इंटरनेट… भेटा माझ्या सर्वात जवळच्या मित्राला… जो आता माझा होणारा जोडीदार आहे”, असं म्हटलं आहे.

शरयूने शेअर केलेल्या या फोटोवर नेहा पेंडसे, अर्चना निपाणकर, प्रियांका बर्वे, मुग्धा वैशंपायन, सावनी रवींद्र, पूर्णिमा डे, स्पृहा जोशी, शमिका भिडे, सलील कुलकर्णी यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शरयूच्या चाहत्यांनीसुद्धा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शरयू दातेने शेअर केली इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, शरयू दाते मराठी कलाविश्वातली लोकप्रिय गायिका आहे. तिने मराठी मालिका आणि सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. तिने नाट्यसंगीत आणि सुगम संगीत (भावगीते, भक्तीगीते) गायली आहेत. मराठीबरोबरच तिने काही हिंदी प्रोजेक्टसाठीही काम केले आहे. ती ‘द व्हॉइस इंडिया’ (The Voice India) सारख्या राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेतही सहभागी झाली होती.

‘आनंदी गोपाळ’मधील ‘रंग मळियेला’, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील ‘इंद्रधनु’, ‘फुलराणी’मधील ‘चढविला पट्टा कमरेवरी’, ‘रमा माधव’मधील ‘हममा रे पोरा’ आणि अशी तिने गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. शिवाय नुकत्याच आलेल्या ‘तिघी’ सिनेमातसुद्धा तिचे गाणे आहे. शिवाय ‘चाहुल आणतो’, ‘माचवा झुलतय गो’सारखी काही लोकप्रिय अल्बम्स गाणीसुद्धा तिने गायली आहेत.