दशमी क्रिएशन्सने आतापर्यंत ‘दुर्वा’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘बे दूणे दहा’ या मालिकांची निर्मिती केली आहे. या मालिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या होत्या. ‘दुर्वा’ या मालिकेची तर चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकांच्या यशानंतर दशमी प्रोडक्शन सिनेमांकडे वळले. ‘घंटा’ या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली होती. आता दशमी क्रिएशन्स त्यांची दुसरी सिनेनिर्मिती असलेला सिनेमा घेऊन येत आहे तो म्हणजे ‘मुरांबा’.
फेसबुकवरुन या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच या सिनेमाचे पहिले पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकरने केले असून, त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केले आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये एका मुलाचे आणि मुलीचे पाय दिसत असून दोघांनी पायात मोजे घातले आहेत. त्यांच्या हातात मद्याचा पेलाही दिसत आहे.

‘मुरांबा’ या सिनेमाची घोषणा जरी प्रोडक्शन हाऊसकडून करण्यात आली असली तरी या सिनेमात कोण कलाकार असणार याबाबत प्रोडक्शन टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.