|| सुहास जोशी

भटकंती हा प्रकार हल्लीच्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय होत असला तरी त्यामध्ये शोधक भटक्याचा (एक्सप्लोर्स) अभाव असतो. पण जेव्हा आजच्यासारखी वाहतुकीची साधनंच नव्हती तेव्हा एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणे, तेथे राहणे, तेथील राजव्यवहारातदेखील सामील होणे आणि पुन्हा परत मायदेशी येऊन त्याविषयीचे लिखाण करणे हे सारेच अतक्र्य वाटावे असे आहे. जगप्रसिद्ध शोधक भटक्या मार्को पोलोने हे केले. युरोपातील इटली ते अशियातील चीन असा त्याचा लांबलचक प्रवास त्याने १३ व्या शतकाच्या उतरार्धात केला. त्याचे अनुभव वाचणे हाच एक जिवंत दृश्यानुभव असतो, तीच कथा दृक्श्राव्य माध्यमात वेबसिरीजमध्ये पाहणे कधीही थरारक असते. नेटफ्लिक्सने दोन सीझनमध्ये मार्कोचा हा प्रवास चितारला आहे. त्यातील पहिल्या सीझनमध्ये सारा भर हा त्याच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातील मंगोल सर्वेसर्वा आणि चीनमधील युआन घराण्याचा पहिला सम्राट कुब्लाय खान (१२६०-१२९५)  याच्या दरबारातील आहे. मार्कोच्या आणि नेटफ्लिक्सच्या या मालिकेतीलदेखील ऐतिहासिक नोंदीबद्दल वाद असले तरी तो काळ पडद्यावर पाहणे हे नक्कीच रंजक आहे.

मार्कोच्या जन्मावेळी त्याच्याजवळ नसणारे त्याचे वडील त्याला थेट १७ व्या वर्षीच भेटतात या प्रसंगावर सिरीजची सुरुवात होते. मार्कोचे वडील व्यापारी असतात. वडील भेटल्यानंतर मार्कोदेखील त्यांच्याबरोबर पुढील प्रवासाला निघतो. हा प्रवास असतो सिल्क रूटवरचा. प्राचीन काळातील मंगोल, चीन या प्रदेशातून जाणारा. नैसर्गिक अडचणी तर भरपूर असतात, पण त्याचबरोबर त्या त्या प्रदेशातील सत्ताधारी आणि लुटेरे या दोहोंशी सामना करायचा असतो. त्यातूनच मार्कोला कुब्लाय खानच्या (खगान सत्ताधारी) दरबारात थांबावे लागते. पण त्याच्या हुशारीमुळे काही प्रमाणात तो कुब्लाय खानच्या विश्वासासदेखील पात्र ठरतो. कुब्लाय खान जरी स्वत:ला ‘खान ऑफ खगान’ असे म्हणवून घेत असला तरी शेजारच्या चीनच्या झॅगयांगचे साँग सत्ताधारी, त्याच्याच राज्यातील अन्य राजे आणि खुद्द त्याच्याच शहरात त्याच्यावर होणारा हल्ला यामुळे एकूणच हा सारा काळ प्रचंड शह-काटशहाचा आहे. त्यात अनागोंदी नाही, वरवर सारे आलबेल आहे, पण आतून बऱ्याच गोष्टी घडत असतात. मार्को या सर्वाचा साक्षीदार ठरतो. काही वेळा तो अगदी जिवावर बेततील अशा प्रसंगातून वाचतो, तर कधी कधी तो जिवावर बेतणाऱ्या अशा जबाबदाऱ्या कुब्लाय खानच्या आज्ञेमुळे स्वीकारतो. खानाच्या राज्यात अंतर्गत विरोधी प्रवाह असतात, तसेच ते शेजारच्या साँग सत्ताधाऱ्यांमध्येदेखील असतात. एकीकडे मार्कोची वाटचाल, तर दुसरीकडे हे सारे अंत:प्रवाह अशा अनेक गोष्टी या पहिल्या सीझनमध्ये दिसून येतात.

पिरियड कलाकृती असल्यामुळे या सर्वच सादरीकरणाला त्या काळाची स्वत:ची म्हणून अशी जी झालर असते ती येथेदेखील जाणवत राहते. मोठमोठे महाल, प्रचंड सैन्य वगैरे बाबी तुम्हाला त्या काळात न्यायला पुरेशा ठरतात. मार्कोचा एकूण प्रवास हा २४ एक वर्षांचा होता. इतका मोठा कालावधी पडद्यावर उतरवणे कठीणच असते. पण वेबसिरीज हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. तो वापरण्याचा बऱ्यापैकी चांगला प्रयत्न येथे झाला आहे. अनेक बारीकसारीक नोंदी त्यातून मांडणे शक्य झाले आहे. पण कधी कधी चित्रपटाच्या पद्धतीने एकदम एका दृश्यातून फार पुढच्या दृश्यात उडी मारणे हेदेखील झाले आहे. हे टाळता आले असते तर एकूणच या सिरीजचा परिणाम वेगळा ठरला असता. त्याचबरोबर सारा भर हा राजदरबारावरच अधिक राहिल्यामुळे नेमकी त्या काळात सर्वसामान्य परिस्थिती कशी होती याची कल्पना येत नाही.

मार्को पोलोच्या अनुभवांचे लिखाण हे तिसऱ्याच व्यक्तीने केले आहे. त्यामुळे जगभरात त्यावर अनेक तर्कवितर्क, वादविवाद आहेत. पण त्याचे अनुभव हे अनेकदा खूप साऱ्या छोटय़ामोठय़ा बाबींच्या नोंदी करतात. मार्को पोलोच्या आधीदेखील अनेकांनी या भागात प्रवास केला आहे. पण मार्को त्या प्रदेशात २४ वर्षे राहिला होता आणि इटलीला परत आल्यावर त्याने त्याचे जे अनुभव सांगितले, ते कागदावर शब्दबद्ध झाल्यामुळे पूर्वेकडील जगाची वेगळीच ओळख युरोपला होऊ  शकली. मार्कोच्या भटकंतीचे हेच खरे वैशिष्टय़ आहे. त्या दृष्टीने या सिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये खूपच कमी माहिती हाती येते. कारण येथे सारी कथा ही कुब्लाय खानाच्या भोवतीनेच फेर धरते. रंजकतेकडे नेण्याचा तो एक भाग असू शकेल.

नेटफ्लिक्सने ही सिरीज केवळ वेबकरताच तयार केली हेदेखील महत्त्वाचे आहे. नंतरच्या टप्प्यात निर्मितिगृहाबरोबर वाद आणि प्रचंड तोटा वगैरे सहन करावा लागल्याने मध्येच त्यातून अंगदेखील काढून घेतले होते, पण तरीदेखील मार्कोचे दृक्श्रावीकरण पाहायला उपलब्ध आहे हे दर्शकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

  • मार्को पोलो
  • सीझन पहिला, ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स