नव्वदच्या दशकात स्त्रीप्रधान विषय मांडणार्‍या ‘दामिनी’सारख्या व्यावसायिक हिंदी चित्रपटांची एक लाट आली होती. महिलांबरोबर कुटुंबात, समाजात घडणार्‍या दुर्दैवी घटना, अत्याचार, शोषण या घटनांचे संदर्भ घेऊन आणि पूर्णपणे व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेली नाचगाणी, अन्य घटकांचा पुरेपूर वापर करून हे चित्रपट तयार करण्यात आले होते. आजच्या काळाच्या संदर्भानुसार विचार करता महिलांवरच्या अन्यायकारक घटनांमध्ये बदल झाला आहे का? तर तो नाही. पण, त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. तंत्रज्ञानाने अन्याय-अत्याचाराचं हे गणित किती सोपं आणि तितकंच भयावह केलं आहे, याची जाणीव करून देणारा चित्रपट म्हणून अजय मयेकर दिग्दर्शित ‘मर्दिनी’कडे पाहता येईल.

एकटी राहणार्‍या आणि त्यातही एकल पालक म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या महिलांसाठी आर्थिक, सामाजिक घडी बसवत पुढे जाणं हे आजही तितकंच आव्हानात्मक आहे. प्रत्येक वेळी समोरून येणार्‍या संकटाची चाहूल लागणं कठीण, त्यामुळे सतत घरीदारी, कार्यालय, प्रवासादरम्यान सगळीकडे अतिशय जागरूक आणि दक्षतेने वावर करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या युगात सगळेच असुरक्षित आहेत, इथे स्त्री-पुरुष हा भेदाभेद नसला, तरी महिला मात्र सहज बळी होतात.

एका आयटी कंपनीत काम करणार्‍या अंजलीला तिच्या मुलीच्या दम्यावरच्या आजारासाठी ऑक्सिजनचे यंत्र घरातच आणून ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या यंत्राची किंमत अडीच लाखांच्या घरात आहे, एवढा खर्च परवडणारा नसल्याने अंजली कंपनीतल्याच एका सहकार्‍याच्या मदतीने आणखी कुठल्या संकेतस्थळावर हे यंत्र स्वस्त उपलब्ध होत आहे का, याचा शोध घेते. तिला एका लिंकवर हे यंत्र सव्वा लाखाच्या आसपास उपलब्ध होतं, ती ऑनलाइन पैसे भरून ते विकतही घेते. मात्र, प्रत्यक्षात ते यंत्र घरी आल्यावर बंद पडलेली गोष्ट आपल्या माथी मारून फसवणूक केल्याचं तिच्या लक्षात येतं. आत्तापर्यंतची बचत केलेली सगळी रक्कमही गेली आणि मुलीच्या आजारपणाचं संकटही वाढलं, अशा दुहेरी कात्रीत सापडलेली अंजली पुन्हा पुन्हा ती लिंक आणि फसवणूक करणार्‍याचा माग घेत राहते. तिचा हा शोध तिला गुन्हेगारापर्यंत पोहोचवतो खरा… पण, त्यानंतर आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची सुतराम कल्पना नसलेल्या अंजलीच्या आयुष्यात तिच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक भयंकर ससेमिरा सुरू होतो.

गर्दीत असूनही आणि वर्दीतल्या अधिकार्‍यांची मदत घेऊनही अंजली या दुर्दैवाच्या फेर्‍यात एकटी पडते. स्वत:च्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी लढणार्‍या एका आईचा हा संघर्ष ‘मर्दिनी’मध्ये पाहायला मिळतो.

‘मर्दिनी’ची आजच्या काळातील घटनांचा संदर्भ घेऊन लिहिलेली कथा आणि बर्‍यापैकी वास्तवाला धरून पुढे जाणारी मांडणी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. सायबर क्राइम हा त्यातला एक भाग आहे. चेहरा नसलेल्या या गुन्हेगारीचा फास सर्वसामान्यांच्या गळ्याभोवती अधिकाधिक आवळला जात आहे. वेगाने घडणार्‍या या गुन्ह्यांचं निराकरण करण्यासाठी तितकी वेगवान आणि मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेली पुरेशी पोलीस यंत्रणा नाही. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचं जणू पेव फुटलं आहे. ही असुरक्षितता किती आणि कशा स्वरूपाची आहे, याची छोटीशी झलक लेखक-दिग्दर्शक अजय मयेकर यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच काही छोट्या-छोट्या प्रसंगातून दाखवून दिली आहे.

कंपन्यांमध्ये कर्मचारी वापरत असलेले लॅपटॉप कोणाकोणाला पाहता येतात, अशा परवानग्या किती घातक ठरू शकतात, एखाद्याचा मोबाइल हॅक करून मेसेजेस करणं, अशा पद्धतीने समोर न येता किंवा चेहरा लपवत आपल्याला हव्या त्या माणसाची दिशाभूल करणं, त्याच्या मनात दहशत निर्माण करणं आणि या सगळ्यातून येणारी असहायता या सगळ्याचं यथार्थ चित्रण अजय मयेकर यांनी केलं आहे. अजय मयेकर यांनी याआधी अनेक मोठमोठ्या, गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलेलं असल्याने त्यांची मांडणीवरची पकड चित्रपट पाहताना जाणवते. अर्थात, काही कच्चे दुवे निश्चित आहेत.

एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल संशय वाढवणं आणि भ्रम निर्माण करणं या प्रकारात काही व्यक्तिरेखा अधिक चांगल्या करता आल्या असत्या, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. ‘मर्दिनी’ म्हणजे शब्दश: मर्दिनी रूपात नायिकेला दाखवण्यासाठी अगदी शेवटपर्यंत सांभाळलेल्या वास्तव मांडणीला खो देण्याचा प्रकार अनाकलनीय आहे. गुन्हेगाराचा खरा चेहरा उलगडताना दाखवलेलं दृश्यही तिकतंच ठोकळेबाज, अगदी शर्ट फाटण्याच्या प्रसंगातही तो इतक्या अचूक मापात आणि कुठेही वेडावाकडा न होता फाटणं म्हणजे किती योगायोग म्हणायचा…

या चित्रपटात अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य नायिकेच्या भूमिकेत तर बालकलाकार मायरा वायकूळ तिच्या मुलीच्या भूमिकेत आहे. सुुरुवातीच्या काही प्रसंगांत तुम्हाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका आठवल्याशिवाय राहणार नाही. पण, तो तितका भाग सोडला तर चित्रपटाला स्वतंत्र कथानक आहे. प्रार्थनाने अंजलीचा साधेपणा, हुशारी, मुलीच्या जिवावर संकट ओढवल्यानंतर होणारी ससेहोलपट आणि चहूबाजूंनी संकटाने वेढलं आहे हे लक्षात आल्यानंतर कोणाला न जुमानता उलटून वार करणारी आई अशा विविध छटांना उत्तम न्याय दिला आहे.

अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या परिचित रूपापेक्षा पूर्ण वेगळी भूमिका उत्तम साकारली आहे. जितेंद्र जोशीसारखा उत्तम नट हाताशी असूनही त्याच्या व्यक्तिरेखेला फार वाव मिळालेला नाही. चित्रपटाचा शेवट तसा परिचित पद्धतीचा असला, तरी तिथे पोहोचेपर्यंत चित्रपट प्रामाणिक मांडणीतून पुढे जातो. दुसरं म्हणजे संपूर्ण चित्रपटात उगाचच गाणी घुसडलेली नाहीत, त्यामुळे कथेची मांडणी वेगवान राहते. मनोरंजक पद्धतीने जाणारा आणि तरीही सद्य:स्थितीचे, वास्तव घटनांचे अवलोकन करत मांडलेली एक चांगली गोष्ट ‘मर्दिनी’च्या निमित्ताने पाहायला मिळते.

दिग्दर्शक – अजय मयेकर
कलाकार – प्रार्थना बेहरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, मायरा वायकूळ, राजेश भोसले.