लंडनमध्ये चित्रित झालेला आणि एकटेपणावर मायेचा उतारा शोधणाऱ्या पाच जणांची गोष्ट सांगणारा ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारीला चित्रपटगृहांतून प्रदर्शित होत आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ या चित्रपटात उत्तम कथेबरोबरच मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, विजय केंकरे, डॉ. गिरीश ओक आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारख्या उत्तम कलाकार मंडळींचा अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना आकर्षित करते आहे. सध्या पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना पायरसीची समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे तुमचे आवडते कलाकार आणि विषय असलेला चित्रपट थोडे पैसे खर्चून चित्रपटगृहातच पाहा, पायरसीला थारा देऊ नका, असं आवाहन प्रेक्षकांना दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्यासह मुक्ता बर्वे, विजय केंकरे, डॉ. गिरीश ओक आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान केलं.
‘माया’ या चित्रपटाचा कथाविस्तार कसा झाला, याबद्दल आदित्य इंगळे यांनी माहिती दिली. ‘बाई ही पुरुषापेक्षा अधिक खंबीर असते. तिचं मन पुरतं कोणाला समजलेलं नाही आणि म्हणून त्याविषयी अधिक उत्सुकता असते. ‘माया’ ही स्त्रीची गोष्ट असली तरी ती प्रत्येकातल्या मायेची गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला कित्येकजण एकाकी असतात. अनेकदा कोणाच्या तरी सहवासात आल्यानंतर आपल्यातल्या एकटेपणाची जाणीव होते. या चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलं आहे. आपल्याकडे तुलनेने एकटेपणा कमी जाणवतो, नातेवाईक – मित्रमंडळी कोणी ना कोणी मदतीला असतं. परदेशात माणसं खरंच एकटी पडतात, त्यामुळे कथेसाठी एक चित्रपार्श्वभूमी म्हणून लंडन आहे. तिथे राहणाऱ्या आणि मनावर काही ना काही आघात झालेल्या पाच जणांची गोष्ट यात आहे. हे पाचजण जेव्हा आयुष्याच्या प्रवासात एकमेकांसमोर येतात, तेव्हा त्यांच्या मनातला सल, दुःख कसं कमी होत जातं आणि जगण्याची आशा बळावते याचं चित्रण या चित्रपटात आहे’, असं त्यांनी सांगितलं.
खरेपणा हा या चित्रपटाचा स्थायीभाव आहे
‘या चित्रपटातली पात्रं आणि त्यांची गोष्ट ही आजची आहे. कोणाबरोबरही अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे प्रेक्षकही स्वतःला त्या गोष्टीशी जोडून घेऊ शकतील. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितलं तसं की परदेशात खरोखरच तुम्हाला मदत करणारं चटकन कोणी मिळत नाही. त्यामुळे जी विसंगती आहे जगण्यातली ती योग्य रीतीने या गोष्टीत उतरली आहे. खरेपणा हा या चित्रपटाचा स्थायीभाव आहे’, असं अभिनेते विजय केंकरे यांनी सांगितलं. त्यातही या चित्रपटात भूमिका करण्यासाठी विचारण्याबरोबरच आदित्यने पटकथा हातात ठेवली. सगळ्यांना जोडून घेणारं, त्यांच्यातला संवादसेतू म्हणवता येईल असं माझं पात्र आहे. आणि दिग्दर्शकाने त्या भूमिकेसाठी माझाच विचार का केला? त्याला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे, हेही माझ्या ध्यानात आलं. त्यामुळे एकंदरीतच या चित्रपटाची प्रक्रिया माझ्यासाठी मजेशीर आणि निराळी होती, असंही केंकरे यांनी स्पष्ट केलं.
आता कुठे चांगल्या कामाची सुरुवात…
‘नटाला कायमच असं वाटत असतं की आता कुठे चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे अभिनयाचा प्रवास सुरू होऊन बरीच वर्षं झाली असली तरी आजवरच्या प्रवासाचं अवलोकन करावं इतका महत्त्वाचा टप्पा अजून गाठलेला नाही. नवं काही शोधण्याचा प्रयत्न करत हा प्रवास सुरू आहे. कधी कधी एक प्रकारचं साचलेपण आल्यासारखं वाटतं, तेच तेच काम करतो आहोत असंही वाटतं आणि कित्येकदा करतही असतो. तरी अजून काम करताना मजेशीर वाटतं आहे, काम करत राहावंसं वाटतं आहे’, अशी भावना चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने व्यक्त केली. चित्रपटाच्या कथेविषयी सांगताना, ही अगदी आजच्या काळाची गोष्ट असल्याचं तिने सांगितलं. आज रोजचं आयुष्य जगताना आपण कुठल्याही वयोगटातील माणसं ज्या गोष्टींचा सामना करतो आहोत, अचानकपणे तुमच्या आयुष्यात काही घटना घडतात, काही व्यक्ती येतात आणि तेव्हा तुम्ही त्या सगळ्या घटिताला सामोरं कसं जाता? यावर प्रकाश टाकणारी गोष्ट असल्याचंही मुक्ताने सांगितलं.
चित्रपट हे पूर्णत: दिग्दर्शकाचं माध्यम आहे…
सातत्याने काम करताना, तोचतोचपणाची भीती जाणवते का? याबद्दल अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सविस्तर मत मांडलं. ‘नाटकात मी सुदैवाने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, मालिका करताना तोचतोचपणा जाणवतो, कारण ते माध्यम हळूहळू पसरट होत जातं. अशा वेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी चित्रीकरणातून उरलेल्या वेळेत पुस्तक वाचणं, काही वेगळं पाहणं अशा प्रत्येकाच्या स्वत:च्या काही क्लृप्त्या कलाकार विकसित करत राहतात. नाटकातही पाचशे प्रयोग होतात आणि प्रत्येक प्रयोगागणिक तुम्हाला तेच संवाद म्हणायचे असतात, तेव्हा तोचतोचपणा आल्यासारखं वाटतं. पण मुळात नाटक हे माध्यम असं आहे की प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. त्यातल्या प्रयोगशीलतेला धक्का लागत नाही म्हणून नाटक आजही लोकांना आवडतं. चित्रपटात तोचतोचपणा जाणवण्याचा प्रश्न येत नाही. तुमचा शॉट एकदा दिग्दर्शकाने ‘ओके’ केला की तुमचं काम संपतं, पण तुम्ही पडद्यावर ते पाहता तेव्हा असं वाटतं अरे, मी इथे अजून चांगलं करू शकलो असतो. तुम्ही तुमचा शॉट दिला असला तरी त्यावर इतर संस्करण होणार आहे. संकलन, संगीत, डबिंग ही सगळी प्रक्रिया त्यात असते. त्या अर्थाने चित्रपट हे पूर्णत: दिग्दर्शकाचं माध्यम आहे हे कलाकार म्हणून मला माहिती आहे. उलट, नाटक हे कलाकाराचं माध्यम आहे. माझ्या नाट्य दिग्दर्शकाने भले काय म्हणायचं, कसे हातवारे करायचे हे ठरवून दिलं असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर ते मी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. त्यामुळे एक मालिका सोडली तर नाटक, चित्रपट या माध्यमातून तोचतोचपणा जाणवण्याचा प्रश्न येत नाही. आणि तरीही तसं जाणवत असेल, तर कलाकाराने तिथेच थांबायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
चित्रपटाच्या यशापयशाचं ओझं बाळगत नाही…
‘माझ्या कोणत्याही चित्रपटाच्या यशापयशाचं ओझं मी मनात बाळगत नाही. चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला किंवा तो फार नाही चालला, तरी जेव्हा तो चित्रपटगृहातून बाहेर पडतो तेव्हा माझ्या डोक्यातूनही त्याचा विषय निघून जातो. अर्थात, या यशापयाशचं गणित मी फक्त पुढचं काम आणि त्यासाठी मिळणारं मानधन याबाबतीत करतो. अन्यथा, त्या गोष्टींचा फार विचार करत बसत नाही’, असं अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने स्पष्ट केलं. ‘माया’ या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेचं नाव सिद्धार्थच आहे. आणि चित्रपटातल्या सिद्धार्थला कुठेतरी आतून एकटेपणा जाणवतो आहे. वास्तवात माझ्या आयुष्यात मी असा एकटेपणा कधीही अनुभवलेला नाही. सगळ्यांमध्ये असूनही एकटं असण्याची एक भावना असते आणि ती आपण कोविडदरम्यान अनुभवलेली आहे. त्या वेळी भले घरातली आपण सगळी चार-पाच मंडळी एकत्र घरातच होतो, तरीही प्रत्येकाला एकटेपणा जाणवत होता. तो घालवण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढावे लागले, एकटेपणाची ती विलक्षण भावना होती जी शब्दांत मांडणं अवघड. तो अनुभव वगळता, मी खऱ्या आयुष्यात मोजक्या का होईना फार जिवलग माणसांनी वेढलेलो आहे. ही माणसं मी कमावली आहेत, असं सिद्धार्थने सांगितलं.
समाजमाध्यमांचा वापर चुकीच्या कारणांसाठी…
नामवंत कलाकार वा व्यक्तींच्या विधानांचा, कृतीचा अनेकदा विपर्यास करून त्यांच्यावर समाजमाध्यमांवरून केली जाणारी टीका हा किळसवाणा प्रकार असल्याचे गिरीश ओक यांनी सांगितले. कोणताही चेहरामोहरा नसलेली माणसं या माध्यमांच्या आडून कोणावरही टीकेची झोड करतात, हे अत्यंत चुकीचं आहे. सचिन पिळगावकर यांच्यासारख्या मराठीतल्या उत्तम कलावंतावर नको त्या पद्धतीने टीका केली जाते, मात्र त्यांनी काय पद्धतीचं कर्तृत्व गाजवलं आहे याबद्दल कधीही जाणून घेतलं जात नाही, असं सांगतानाच विजय केंकरे यांनी अलीकडेच घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगितली. ‘फिल्मफेअर सोहळ्यात एका व्यासपीठावर सचिन पिळगावकर, निदा फाजली अशी मंडळी होती. त्याच वेळी व्यासपीठावर आलेल्या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी निदा फाजली यांना सांगितलं, ‘निदा… सचिन पिळगावकरजी से संभलके रहना… यह हमसे भी अच्छी उर्दू समझते हैं’. मग आपल्या कलाकारांच्या या चांगल्या गोष्टींबद्दल का बोललं जात नाही’ असा सवाल करतानाच समाजमाध्यमांसारख्या चांगल्या व्यासपीठाचा वापर चुकीच्या कारणांसाठी केला जात असल्याबद्दल केंकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
