Mayuri Deshmukh Reema Lagoo Savita Damodar Paranjpe AI Photo: मराठी नाट्यविश्वामध्ये ‘सविता दामोदर परांजपे’ हे अतिशय नावाजलेले नाटक आहे. रंगभूमीवर गाजलेल्या या नाटकामध्ये रीमा लागू यांनी कुसुम ही मुख्य भूमिका साकारली होती. तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक रंगभूमीवर परतले असून, त्यामध्ये अभिनेत्री मयूरी देशमुखने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या सुरू असलेल्या ८० च्या दशकातील AI रेट्रो लूकने रीमा लागू व मयूरी देशमुख यांचा एकत्रित फोटो पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर ८० च्या दशकातील AI रेट्रो लूक फोटो तयार करण्याचा ट्रेंड आला आहे. अनेक मराठी कलाकार यामध्ये सहभागी झाले असून, AI चा वापर करून जुन्या काळातील स्टायलिंगप्रमाणे फोटो तयार करून, ते फोटो पोस्ट केले जात आहे. त्यामध्ये आता अभिनेत्री मयूरी देशमुख व रिमा लागू यांचा एकत्र बसलेला फोटो बनवला गेला आहे. या फोटोच्या माध्यमातून दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

दोन काळ अन् दोन पिढ्या, पण एकच नाटक

सोशल मीडियावर ‘सविता दामोदर परांजपे’ नाटकातील रिमा लागू यांचा जुना फोटो आणि सध्या मयूरी देशमुख साकारत असलेल्या भूमिकेचा फोटो एकत्रित करून नवीन फोटो बनवला गेला आहे. त्यासह कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ट्रेंड वेगळा आहे… कारण- नाटकही वेगळं आहे! रंगमंचावरच्या अजरामर व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दोन ‘सविता’ आज एकाच फ्रेममध्ये…! १९८५ आणि २०२६…दोन काळ अन् दोन पिढ्या, पण एकच नाटक- ‘सविता दामोदर परांजपे’ आणि तंत्रज्ञानामुळे ही अनोखी पुनर्भेट शक्य झाली आहे.”

दिवंगत अभिनेत्री रिमा लागू व मयूरी देशमुख यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मयूरी देशमुखने लिहिले, “अशी संधी पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यात मिळावी, अशी माझी खूप इच्छा आहे. तर एका नेटकऱ्याने लिहिले की, हा एआयचा सर्वांत चांगला वापर आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, या दोघीही माझ्या सर्वांत आवडत्या अभिनेत्री आहेत. तर आणखी एका नेटकऱ्याने हा या ट्रेंडमधील सर्वांत सुंदर फोटो असल्याचे लिहिले आहे. अनेकांनी यावर रेड हार्ट इमोजी कमेंट्स करीत रिमा लागू व मयूरी देशमुख यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ पुन्हा रंगभूमीवर

दरम्यान, शेखर ताम्हाणे यांनी लिहिलेले ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आले होते. त्यावेळी याचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे यांनी केले होते. मन, नातेसंबंध, अपूर्ण इच्छा आणि मानसिक अवस्थांचा गुंता उलगडणाऱ्या मानसशास्त्रीय रहस्यनाट्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. रिमा लागूंची भूमिका असलेल्या या नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते. आता पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये ‘सविता दामोदर परांजपे’ नाटक रंगभूमीवर परतले असून, मयूरी देशमुख भूमिका साकारत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात’सविता दामोदर परांजपे’चे प्रयोग सुरू आहेत.