एक लेखक आणि अभिनेता म्हणून नावारुपास आलेल्या चिन्मय मांडलेकरचा किताबखाना कसा असेल याविषयी अनेकांनाच कुतूहल होतं. चिन्मयचं लिखाण आणि त्याने साकारलेल्या भूमिका पाहता त्याला वाचनाची नक्कीच मदत झाली असणार यात काहीच शंका नाही. माझा किताबखानामध्ये आता सर्वांसमोर येणार आहे चिन्मय मांडलेकरचा भलामोठा किताबखाना. अडीच हजारांपेक्षा जास्त पुस्तकं असणाऱ्या किताबखान्यातील कोणा एका पुस्तकाविषयी सांगणं कठीण आहे असं म्हणत चिन्मयने त्याच्या भल्यामोठ्या किताबखान्याची ओळख करुन दिली. एक लेखक म्हणून चिन्मयचा काही विद्वानांच्या वक्तव्यावर पूर्ण विश्वास आहे. अशाच विद्वानांपैकी एका विद्वानांचं वक्तव्य चिन्मयला पटलं आहे. उत्तम लेखक होण्याआधी उत्तम वाचक होणं फार आवश्यक आहे, असं स्टीफन किंगचं म्हणणं चिन्मयला तंतोतंत पटतं.

वैचारिक, ललित, ऐतिहासिक, आत्मचरित्रपर अशा प्रकारच्या लेखनसाहित्याचं वाचन करण्याकडे त्याचा कल आहे. याविषयी सांगताना चिन्मय म्हणाला, ‘माझ्याकडे ऐतिहासिक पुस्तकांचाही भलामोठा संग्रह आहे. कारण, माझ्या वडिलांना त्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडायची. हिंदी, इंग्रजी आणि मराठी पुस्तकांचा संग्रह असणारा माझा किताबखाना हा एक प्रकारचा संमिश्र संग्रहच आहे असं म्हणायला हरकत नाही.’ हिंदी साहित्यामध्ये सादत हसन मंटो, इस्मत चुगताई, आचार्य चतुरसेन या लेखकांचं लिखाण आवडत असल्याचं सांगत आपला कॉमिक्स वाचण्याकडेही तितकाच कल असल्याचं चिन्मयनं स्पष्ट केलं.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

विविध प्रकारची पुस्तकं आणि त्याद्वारे भेटीला येणारे लेखक याविषयी चिन्मयला भलतीच आत्मीयता आहे. आवडत्या पुस्तकांविषयी सांगताना त्याची द्विधा मनःस्थिती झाली असली तरीही काही पुस्तकं वारंवार वाचण्यालाही तो प्राधान्य देतो हेही तितकच खरं. यापैकीच काही पुस्तकं म्हणजे, पु. लं. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ त्याचबरोबर ‘स्क्रिनप्ले’, ‘१०० इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ आणि ‘हॅरी पॉटर’ची संपूर्ण सीरिज वाचणं चिन्मयला आवडतं.

पुलं, जे.के. रोलिंग, जॉर्ज मार्टिन, जयवंत दळवी, शिरीष कणेकर या लेखकांची साहित्य वाचण्याची आवड असणाऱ्या चिन्मयने हल्लीच्या पिढीच्या वाचन सवयीबद्दलही सुरेख टिप्पणी केली. गेल्या काही वर्षांमध्ये आमिश त्रिपाठी, देवदत्त पटनायक या लेखकांच्या साहित्याचा तरुणाईवर जास्त प्रभाव दिसून येतोय. याविषयी सांगताना चिन्मय म्हणाला, ‘प्रत्येक लेखकाच्या लोकप्रियतेचा एक काळ असतो. जसं १९७० मध्ये हॅरॉल्ड रॉबिन्सची पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचली जात होती. त्यानंतर थेट गेल्या एक दहा वर्षांबद्दल सांगायचं झालं तर चेतन भगत, आमिश त्रिपाठी, देवदत्त पटनायक यांच्या साहित्याने अनेकांना वेड लावलं. मुळात त्यांचं हे साहित्य लोकप्रिय होण्यामागचं कारण म्हणजे त्यात इतरांना आवडेल, असा पुस्तकातील कन्टेन्ट. मुळात वाचकांना जे आवडतं ते पुस्तकातच असल्याशिवाय ही पुस्तकं आणि ते लेखक लोकप्रिय होणारच नाहीत.’ असं म्हणत चिन्मयने हल्लीच्या पिढीच्या वाचनाच्या सवयीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. त्यासोबतच वाचन महत्त्वाचं मग ते कोणत्याही प्रकारचं असो. दुकानावरच्या पाटीपासून ते अगदी ट्रकच्या मागे लिहिलेल्या काही विनोदी ओळींपर्यंत काहीही वाचा, पण वाचा. जे आवडेल ते वाचा.. पण, वाचा’, असंही चिन्मय म्हणाला.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com