सखा, सोबती, सवंगडी ही समानार्थी शब्दांची रांग शाळेतील अभ्यासात अशा सुरेख पद्धतीने स्मरणात राहिलेली असते विचारूच नका. पण, या शाब्दिक चौकटीपलीकडे जाऊनही मित्राची आणि मैत्रिची परिभाषा आहे, हे नाकारता येत नाही. कोणाला कोणत्या गोष्टीमध्ये मित्र दिसेल, याचा नेम नाही. अशाच चौकटीपलीकडच्या मित्रांच्या यादीमध्ये समाविष्ट असणारा किंबहुना या यादीत अग्रस्थानी असलेला एक मित्र म्हणजे ‘पुस्तक’. ‘पुस्तक’ कोणाचा मित्र असतं तर कोणाचं स्ट्रेस रिलिव्हर. कोणासाठी ते मार्गदर्शक असतं तर कोणासाठी ते नुसतंच आकर्षक असतं. पुस्तक आणि त्याकडे पाहणाऱ्या वाचकांचे बहुविध दृष्टिकोन पाहिले तर प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने या पुस्तकाने महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. हातात येणाऱ्या पदवीच्या प्रमाणपत्रापासून ते अगदी कोणाच्यातरी मनाचा ठाव घेण्यासाठीच्या तंत्रामध्ये पुस्तकराव आणि त्यातील शब्दांच्या माध्यमातून भेटायला येणारे लेखक त्यांची भूमिका काटेकोरपणे बजावत असतात.

तर मग पुस्तकाविषयी नेमकं आपल्या काही लाडक्या सेलिब्रिटिंना वाटतं तरी काय हा प्रश्न अनेकदाच पडत असेल. म्हणजे रंगभूमी, मालिका, चित्रपट, कथा, पटकथा आणि अशा प्रत्येक घटकामध्ये पुस्तकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते हेच खरं. सोशल मीडिया आणि किंडलच्या जमान्यात आजही असे अनेक वाचक कोणत्याही पुस्तकाची एखादीतरी प्रत स्वत:जवळ बाळगत असतात. त्यामुळे या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत पुस्तकांबद्दल बरंच काही. हो… पण, इथे अभ्यासक किंवा समीक्षक पुस्तकाविषयीची माहिती न देता मालिका, नाटकं अशा विविध मार्गांनी आपल्या भेटीला येणारे सेलिब्रिटी त्यांच्या वाचनाच्या सवयींबद्दल आणि आवडत्या पुस्तकांबद्दल सांगणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटी वाचकांच्या किताबखान्यातून त्यांचे पुस्तकी किस्से…

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या निमित्ताने शशांक केतकर हा पुणेरी अभिनेता रसिकांच्या घराघरात पोहोचला. त्याने साकारललेल्या ‘श्रीरंग गोखले’ म्हणजेच सर्वांच्या लाडक्या ‘श्री’च्या भूमिकेने त्याला फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनामनातही पोहोचवलं. स्वत:च्या वाचनाच्या आवडीविषयी सांगताना शशांक सांगतो की, ‘मी काही हाडाचा वाचक नाही. माझ्या कामाच्या निमित्ताने माझ्याकडून बऱ्याच चांगल्या साहित्याचं वाचन होतं. पण, त्यातही काही लेखकांची पुस्तकं मला फार आवडतात. व. पु. काळे, महेश एलकुंचवार यांची पुस्तकं मला फार आवडतात’. शशांकने वपुंच्या पुस्तकांचा उल्लेख करत त्याला भावलेल्या ‘वपुं’बद्दल म्हटले आहे की, ‘वेदना व्यक्त करणाऱ्या शब्दांतूनही वपुंच्या विनोदनिर्मिती करणाऱ्या शब्दांच्या ताकदीचा मी चाहता आहे. वेदनेतूनही विनोदनिर्मिती करणारे वपु आणि त्यांची ती लेखनशैली मला फारच आवडते. मी फारशी पुस्तकं वाचत नाही त्यामुळे माझ्या माहितीपलीकडे याविषयी मी टिप्पणी करणं चुकीचं ठरेल. पण, माझ्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये व. पु. काळे यांचं ‘मित्र’ हे पुस्तक मला फारच भावलं. त्यामुळे माझ्या वाचनामध्ये मी वपुंचं साहित्य जास्त वाचलं आहे असे म्हणू शकता’.

छाया सौजन्य- सोशल मीडिया
छाया सौजन्य- सोशल मीडिया

सध्या शशांक केतकर त्याच्या आगामी चित्रपटांच्या निमित्ताने आणि दोन नाटकांच्या निमित्ताने व्यग्र आहे. कामाच्या निमित्ताने वाचक झालेला आणि व. पु. काळे यांच्या लेखनाचा चाहता असणाऱ्या शशांकच्या किताबखान्यात मित्राच्या निमित्ताने आपल्याला सापडले आहेत कादंबरी आणि कथाकार व. पु. काळे. तेव्हा आता आपल्या पुढच्या किताबखान्यामध्ये कोणत्या कलाकाराचा पुस्तकी किस्सा उलगडणार हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा माझा किताबखाना..

 

शब्दांकन- सायली पाटील

sayali.patil@indianexpress.com