नवरात्रीचा उत्सव हा प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने साजरा करत असतो. कोणाच्या घरी देवीचे उपवास सुरु असतात, तर कोणाकडे देवीचा जागर. या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी आवर्जुन भोंडला, हादगा खेळून नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. मात्र अभिनेती आदिती द्रविडने यंदा एका वेगळ्या पद्धतीने नवरात्रीचा उत्सव साजरा करण्याचं ठरविलं आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ईशा अर्थात अभिनेत्री आदिती द्रविडने यंदा समाजकार्य करुन नवरात्र साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदितीने ‘फ्लाय फ्लाय’ ही समाजसेवी संस्था सुरु केली असून या संस्थेमार्फत ती समाजोपयोगी काम हाती घेत असल्याचं दिसून येत आहे.

नुकतेच तिने पुण्याजवळच्या किर्कवाडी येथील ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेला भेट दिली. या भेटीमध्ये तिने मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन असलेले स्वयंचलित मशीन दान केलं आहे.

‘नवरात्रीला आपल्याकडे कन्यापूजा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे ही पद्धत कायम ठेवण्यासाठीच मी हा नवा उपक्रम सुरु केला आहे. पद्धत जुनीच पण तिचं स्वरुप थोडं बदललं आहे. मासिक पाळी हा मुलींसाठी महत्वाचा विषय असतो. या काळामध्ये घ्यायची काळजीविषयी मुलींमध्ये जागृती करणं गरजेचं आहे. गावामध्ये अनेक वेळा मुली या मुद्द्यावर बोलायला लाजतात. सॅनिटरी नॅपकिनविषयी छोट्या गावातल्या मुलींना माहितीही नसते’, असं आदिती म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘शाळेत असताना मुलींना मासिक पाळी आल्यावर त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या शाळेत सॅनिटरी नॅपकिनचं मशीन दान केलं आहे. माझ्या संस्थेने शाळेला मशीन देऊन समाजकार्याची सुरुवात केली आहे. सॅनिटरी नॅपकिन मशिन दिल्यावर तिथल्या मुलींच्या चेह-यावरचा आनंद आणि त्यांनी मला दिलेलं थँक्यु ग्रिटींग कार्ड खूप काही सांगून गेलं. हजार कन्यापूजेपेक्षा १०० मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचे समाधान काही वेगळंच असतं’.