वरवर सुखी दिसणारे संसार खरोखरीच तसे असतात का? आजचे? निदान गेल्या पिढीतले तरी? कारण त्या पिढीने घरसंसार, नोकरी-व्यवसाय, आलं-गेलं असं सग्गळं सांभाळून वरकरणी तरी ‘सुखी’ संसार केल्याचं रमणीय चित्र तरी निर्माण केलेलं दिसतं. आजची पिढी मात्र सर्वच बाबतींत सुखासंबंधी नको इतकी जागृत आहे. ती फक्त मी, माझं, मला यांचाच विचार करते. व्यक्तिस्वातंत्र्याची नको इतकी तीव्र जाणीव तिला आहे.स्रियाही याबाबतीत आता जागरूक झाल्या आहेत. त्यामुळेच असेल बहुधा – घटस्फोटांची संख्याही वाढताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर शिल्पा कांबळे लिखित आणि सतीश मनवर दिग्दर्शित ‘माझ्या बायकोचा रोबोट’ हे नाटक पाहण्याची संधी मिळाली. आणि एका वेगळ्याच विषयाला हात घालणारं हे नाटक आहे याची तीव्र जाणीव झाली. स्त्रीला आलेलं शारीरभान या नाटकाच्या केन्द्रस्थानी आहे. २५-२७ वर्षे संसार झालेल्या, अमेरिकेत स्थायिक झालेल्या दोन मुलांची आई असणार्या स्त्रीची (ममताची) ही कथा-व्यथा आहे. तिची नोकरी संपलेली. नवर्यानेही स्वेच्छानिवृत्ती घेतलेली.
त्यामुळे तोही सदा घरीच. अशात तिला डोकेदुखी, सांधेदुखी वगैरे त्रास सुरू होतात. त्यामुळे ती सतत नवर्यामागे कटकट करत राहते. बाकी सगळे तिचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. मग ही दुखणी आपल्यामागे का लागलीयत, हे तिला कळत नाही. नवरा मात्र आपल्या छंदात मग्न. जगातल्या युद्धग्रस्त देशांचा अभ्यास करणं यात तो दिवस-रात्र रममाण झालेला असतो. त्यापुढे बायकोची त्याला जराही फिकीर वाटत नाही. तिच्या सततच्या तक्रारी, वैतागणं याने त्याला काही ढिम्म फरक पडत नाही. ममताची धाकटी बहीण सुजाता तिच्या या दुखण्यावर उपाय म्हणून तिला एक सेक्स टॉय (लव्ह मशिन… डिकी) आणून देते. त्याने ममता तिच्यावर भयंकर चिडते… हे काय भलतंच तू आणून दिलंयस म्हणून! सुजाता ‘आता मला बाहेर जायचंय. सध्या तू हे मशिन ठेवून घे. दोन दिवसांनी मी ते परत करते,’ म्हणून तिला सांगते. आता हे नस्तं झेंगट नवर्यापासून लपवायचं कसं, तो यावर कसा रिॲक्ट होईल, आपल्या बायकोला भलताच ‘तरुणचळ’ लागलाय समजून संतापून तो आपल्या अंगावर येईल का, हे प्रश्न ममताला पडतात. पण कसंबसं ती ते प्लास्टिकचं खेळणं (सेक्स टॉय) लपवते.
मात्र त्याचवेळी त्याबद्दलचं तिचं कुतूहलही जागं होतं. ती ते लव्ह मशिन स्विच ऑन करते. आणि इतकी वर्षे आपण ज्या भावनिक, मानसिक शरीरसुखाला मुकलो होतो ते आपल्याला याच्याकडून मिळतंय याची तिला अचानक जाणीव होते. एकत्र कुटुंबात जबाबदार्यांच्या ओझ्याखाली आयुष्यात कधीच आपण खरंखुरं उत्कट शरीरसुख अनुभवलं नाही, आता ते प्रत्ययाला येतंय याचा तिला अननुभूत आनंद होतो. तिची डोकेदुखी, सांधेदुखी वगैरे कुठल्या कुठे पळून जाते.
पण आता तिच्यासमोर एक नवाच प्रश्न उभा ठाकतो. तिच्याच नकारामुळे सुजाता ते लव्ह मशिन विक्रेत्याला परत करणार असते. तिला लागलेल्या सुखाच्या चटकेचं काय होणार? आता काय करायचं? आपल्याला तर हे सुख हवंय! पण नवरा (अजित) घरीच असल्याने सुजाताचं लव्ह मशिन परत करणं टळतं. मात्र बायकोची किटकिट अचानक थांबल्याने अजितला संशय येतो. आणि रात्री तो बेडरूममध्ये आल्यावर ममताला त्या सेक्स टॉयबरोबर पाहिल्यावर त्याचं माथंच सणकतं. आपली बायको व्यभिचारी आहे, शरीरसुखाला हपापलेली आहे, या अकस्मात झालेल्या साक्षात्काराने त्याच्या अंगाचा तीळपापड होतो. तो ते लव्ह मशिन घराबाहेर काढायचं ठरवतो. त्यासाठी त्याच्या बॅटर्या काढून घेतो. त्याला कॉफिनमध्ये टाकतो. यामुळे ते सेक्स टॉय स्विच ऑफ होतं. आता बायको कशी काय त्याच्याशी सेक्स करते हेच त्याला पाहायचं असतं.
ममताचा त्यामुळे भलताच विरस होतो. ती नवर्याला ‘ते मशिन खराब होईल, परत करता येणार नाही,’ म्हणून खूप विनवू पाहते. पण त्याच्यावर काहीएक परिणाम होत नाही. शेवटी तीही संतापते. ‘मला तुमची गरज नाही. माझी मी जगायला समर्थ आहे. मी तुम्हाला घटस्फोट देईन,’ असं ठणकावून अजितला सांगते. आणि लागलीच सोशल मीडिया अकौंट उघडून नवा, खराखुरा बॉयफ्रेंड शोधण्याचं ठरवते. तसा तो तिला मिळतोही… रशियन बॉयफ्रेंड! आता ममताच्या या नव्या कर्तृत्वानं अजित आणखीनच हवालदिल होतो. अशानं आपली समाजात पुरती बेअब्रू होणार, या भीतीने तो गलितगात्र होतो. तशात मॉरल पोलीस त्यांच्या घरावर धाड टाकतात. सेक्स टॉयचा वापर हा नैतिक गुन्हा असल्याने अजित हवालदिल होतो. पण तो कसाबसा त्या मॉरल पोलिसांना घरातून हाकलून देतो…
पुढे काय? या त्रांगड्यातून अजित बाहेर पडू शकतो का? ममताची स्वस्वातंत्र्यासाठीची ही बंडखोरी यशस्वी होते का?… अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकातूनच मिळवणं योग्य.
माणसाच्या आयुष्यातील भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी सेक्स ही अनिवार्य गोष्ट आहे हे माणूस विसरूनच गेलाय. त्याच्या अनेकानेक समस्यांचं मूळ हे सेक्समध्येच आहे, असतं हे त्याच्या लक्षातच येत नाही. रूढी-परंपरा, नीतीनियम, जगण्या-वागण्याच्या पद्धतीत माणसं सेक्सला दुय्यम तरी समजतात, किंवा ती लपवून करण्याची गोष्ट आहे असं तरी समजतात. त्याचे भयंकर परिणाम अन्य मार्गाने त्याच्यासमोर उभे ठाकतात हे त्याचे त्यालाच कळत नाही. सेक्सला काहीतरी घाणेरडी, लपवाछपवीची गोष्ट समजण्याच्या वृत्तीमुळे आज समाजात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. स्त्रीची याबाबतीतली कुचंबणा आजही काळ बदलला तरी चालूच आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था आणि समाजाची नैतिक चौकट यामुळे ्त्रिरया ती व्यक्तही करू शकत नाहीत. अगदी आजची आधुनिक स्त्रीही! मात्र, त्याचवेळी स्वभानामुळे खडबडून जागी झालेली आजची पिढी स्वैराचारी सेक्समुळे भावनाविहीन, व्यवहारवादी बनून भलत्याच मार्गाला लागली आहे, हेही वास्तव आहेच.
या सगळ्याच समस्येकडे लक्ष वेधणारं हे नाटक आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही आयुष्यात सेक्स महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पण त्याची कुणालाच म्हणावी तितकी जाणीव असताना दिसत नाही. दुसरीकडे ममताची बहीण सुजाता हिला सेक्स नकोसा वाटण्याची समस्या आहे. हीसुद्धा उभयलिंगी असलेल्या बहुसंख्याक समाजातील आणखीन एक समस्या आहेच. लेखिका शिल्पा कांबळे यांनी या समाजवास्तवाकडे या नाटकाद्वारे आपलं लक्ष वेधलं आहे. बहुश: अस्पर्श, पण निकडीच्या अशा या विषयाला धाडसानं हात घातल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. काही वर्षांपूर्वी ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकात काहीशा दुरान्वयाने या विषयाला हात घातला गेला होता. हल्ली लिव्ह इन् रिलेशनशिपमध्ये स्त्री-पुरुषाच्या सर्व प्रकारच्या कॉम्पॅटिबिलिटीचा कस लागतो. त्यात सेक्सचाही समावेश होतो. मात्र, थेटपणे या विषयाला या नाटकात हात घातला आहे तो लेखिका शिल्पा कांबळे यांनी. स्त्रीची लैंगिक गरज आणि तिची पूर्तता विवाहातील सहजीवनात होते का, हा कळीचा प्रश्न त्यांनी यात उपस्थित केला आहे. ते सुख नवर्यापासून मिळत नसेल तर अन्यत्र शोधणं स्त्रीला सहज-सोपंही नाहीए. त्यावर सेक्स टॉय हा उपाय काही प्रमाणात असू शकतो. पण तो स्त्रीला संपूर्ण समाधान देऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे. कारण त्यात भावनिक आविष्कार नसतो, ती एक यांत्रिक क्रिया असते. स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, लैंगिक क्रियेतून शारीर भूकेबरोबरच भावनिक, मानसिक सुखही हवं असतं. ते यातून मिळणं शक्य नाही. शेवटी शरीरसुख मिळूनही स्त्री भुकेलेली राहूच शकते… भावनिक आणि मानसिकदृष्ट्या! ‘माझ्या बायकोचा रोबोट’मध्ये याचीच चर्चा होते. शेवटी स्त्री-पुरुषानं सर्वार्थानं एकमेकांना समजून घेऊन परस्परांच्या गरजांची पूर्तता करणं हीच अंतिमत: सुखी सहजीवनाची गुरुकिल्ली आहे… या नोटवर नाटक संपतं.
दिग्दर्शक सतीश मनवर यांनी या नाटकातील स्त्रीविषयक हा गंभीर विचार त्यातल्या उपहास-उपरोधासह यथोचितरीत्या मांडला आहे. या नाटकातल्या अजित आणि ममता या जोडप्यातला परस्परसंवाद सर्वार्थाने थांबला आहे. अजितने त्याच्या छंदात आपलं मन गुंतवलं आहे. ममताला मात्र संसाराच्या रूटिन जंजाळात एकटं, एकाकीपण खायला उठतं. एवढ्या वर्षांच्या संसारात तिची लैंगिक गरज भागवली गेली नाहीए. त्याचे दुष्परिणाम आताशा तिच्या शारीरिक व्याधींतून प्रकट होत आहेत. तिची बहीण सुजाता तिची ही गरज ओळखून तिला सेक्स टॉय आणवून देते. त्यानं तिची लैंगिक भूक भागली तरी भावनिक भूक तशीच राहते. आडमुठ्या नवर्याकडून कसलीच अपेक्षा तिला करता येत नाही.
त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. हे सगळं वास्तव प्रसंग, व्यक्तिरेखाटनातून दिग्दर्शकानं सादरीत केलं आहे. त्यांतले खाचखळगेही त्यातून ध्वनित होतात. सुजाताचा प्रॉब्लेम मात्र वेगळाच आहे. तिला शरीरसुखाची जरासुद्धा ओढ नाहीए. तिचीही ही वेगळी समस्या आहे. त्यावरही एखादं स्वतंत्र नाटक होऊ शकतं. स्त्रीचं शारीरभान, लग्नाकडून तिला असलेल्या अपेक्षा, त्यांची न होणारी पूर्ती, सेक्स टॉयकडून ती भूक भागवून घेतानाची होणारी तिची कोंडी या सगळ्याचा ऊहापोह नाटकात आहे. हा सशक्त आशय नाटकात घटना-प्रसंगांच्या मांडणीतून कौशल्याने येतो. यात मॉरल पोलिसांच्या पोलिसिंगचं हास्यास्पद रूपही अधोरेखित करण्यात आलं आहे. माणसाकडून असलेल्या अपेक्षा यांत्रिकतेतून मिळवण्याचा अट्टहास फिजूल आहे हेही शेवटी दाखवण्यात आलं आहे
नेेपथ्यकार डॉ. प्रवीण भोळे यांनी अजितचं मध्यमवर्गीय घर त्यातल्या तपशिलांनिशी उभं केलं आहे. विनोद राठोड यांची प्रकाशयोजना नाट्यात्म क्षण ठळक करणारी. अक्षता भट्ट आणि श्रेया गंधे यांचं संगीत प्रसंगांतील भावनिकता उठावदार करतं. आशीष देशपांडे यांची वेशभूषा आणि सुरेश कुंभार यांची रंगभूषा पात्रांना व्यक्तिमत्त्व बहाल करते.
हा अवघड विषय हलक्याफुलक्या रूपात तसंच गांभीर्यानं मांडण्यात सगळे कलाकार यशस्वी झाले आहेत. ममताच्या भूमिकेत लैंगिकदृष्ट्या अतृप्त, नवर्याच्या दुर्लक्षानं वैतागलेली, सेक्स टॉयमुळे काही काळ सुखावणारी, परंतु त्याच्याकडून भावनिक भूक भागत नसल्याने खंतावलेली प्रौढ स्त्री अश्विनी मुकादम यांनी अतिशय उत्कटतेनं साकारली आहे. तिचा आनंद, दु:ख, हताशा, आजारपण, विचारांतील स्थित्यंतरं त्यांनी सफाईनं दाखवली आहेत. आपल्या जगावेगळ्या छंदात मग्न असलेला, त्यापायी बायकोकडे दुर्लक्ष करणारा, पुरुषी ईगोचा अजित-नितीन धंधुके यांनी अफलातून वठवला आहे. त्यांच्या संवादफेकीचं टायमिंग, त्यातली बेफिकीरी लाजवाब. बायकोतील बदलांनी हळूहळू त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. हाही प्रवास त्यांनी छान दाखवलाय. रोबोट झालेले ज्ञानराज होले चपखल यांत्रिक हालचालींतून आणि प्रश्नांच्या फीड केलेल्या ठरावीक उत्तरांतून रोबोट यथार्थतेनं साकारतात. जान्हवी देशपांडे यांची सुजाता मोजक्पा प्रसंगांतून नीट ठसते. ओंकार सुपेकर आणि जान्हवी देशपांडे मॉरल पोलीस म्हणून ठाकठीक.
एकुणात आशयाच्या दृष्टीने मराठी रंगभूमीच्या कक्षा रुंदावणारं हे नाटक आहे यात तीळमात्र शंका नाही.
