करोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींवर उपासमारीची वेळ आली होती. त्यापैकीच एक म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार’ची स्पर्धक नेहा मेठे आणि तिचे कुटुंब. नेहाचे वडील हे रिक्षाचालक आहेत. लॉकडाउनमुळे वाहतूकीवर निर्बंध आले आले आणि नेहाच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. पण आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहाच्या आईने स्वत:चं मंगळसूत्र विकलं.

करोना काळात आर्थिक चणचणीचा सामना प्रत्येकालाच करावा लागला. यात नेहाचे कुटुंबीय देखील होते. आर्थिक अडचणींचा सामना करत असताना वडिलांचं आजारपण समोर आले होते. त्याच वेळी नेहाला स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. या दोन्ही गोष्टींसाठी हातात पैसे नव्हते. मात्र आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं रहाण्यासाठी नेहाच्या आईने आपलं मंगळसूत्र विकलं.

दागिन्यापेक्षा मुलीच्या करिअरला महत्व देणाऱ्या नेहाच्या आईच्या या निर्णयाविषयी जेव्हा स्टार प्रवाह वाहिनीली कळलं तेव्हा त्यांनी नवं मंगळसूत्र पुन्हा नेहाच्या आईला द्यायचं ठरवलं. पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड यांच्या पुढाकाराने मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदित सराफ यांच्या हस्ते नेहाच्या आईला हे नवं मंगळसूत्र देण्यात आलं.

मुलांच्या कलागुणांना वाव देणारे पालक आहेत म्हणूनच असे नवे कलाकार घडत आहेत अशी भावना अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. नेहाच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद खुप काही सांगत होता. मी होणार सुपरस्टारचा मंच या आनंदात न्हाऊन निघाला होता.