बॉलिवूडमध्ये #MeToo मोहीम यशस्वी ठरत असून त्याचे परिणामसुद्धा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या मोहिमेची दखल घेत नैतिक जबाबदारी उचलत ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचंच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेरला एका संगीत कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राजस्थान सरकारने उदयपूरमध्ये दिवाळी निमित्त होणाऱ्या एका संगीत कार्यक्रमातून कैलाश खेरचं नाव वगळलं आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उदयपूर महानगरपालिकेकडून ‘सिंगर नाइट’ या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उदयपूरमध्ये ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात गायनासाठी कैलाश खेरला आमंत्रित करण्यात आलं होतं. पण #MeToo मोहिमेअंतर्गत त्याच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे आयोजकांनी त्याचं नाव काढून टाकलं.

वाचा : बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकचा सिक्वलसुद्धा येणार

याबाबत उदयपूरचे महापौर चंद्रसिंह कोठारी म्हणाले, ‘कोणताही वादविवाद निर्माण न करता आम्हाला लोकांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित करायचा आहे. सुरुवातीला नेहा कक्कर आणि कैलाश खेर यांच्या नावाचा विचार करण्यात आला. कैलाश खेर यांचं नाव निश्चित सुद्धा करण्यात आलं होतं. पण मीटू मोहिमेत त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना वगळण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यांच्या जागी आता दर्शन रावलला संगीत कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे.’

कैलाश खेरवर महिला पत्रकार, सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा आणि गायिका वर्षा सिंग धनोवा यांनी गंभीर आरोप केले होते.